तब्बल दोन दशकांहून अधिक काळापासूनच्या तिच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत जेवढे हितचिंतक तिला मिळाले, त्यापेक्षा तिला शत्रूच अधिक होते. अनेक स्थानिक, आणि विदेशांतीलही राजकीय नेत्यांचे आणि उद्योगपतींचे तिने आपल्या बातमीदारीतून अक्षरश: वस्त्रहरण केले होते. माल्टासारख्या लहानशा देशातील अनेकांची ती रोल मॉडेल होती, आणि राजकीय वर्तुळाला मात्र तिचे अस्तित्व काटय़ासारखे सलत असे. माल्टातच नव्हे, तर देशापलीकडच्या पत्रकारितेच्या विश्वात तिच्या कामगिरीचा आदराने उल्लेख होत असे. म्हणूनच  परवा तिच्या घराजवळच झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात मोटार उद्ध्वस्त होऊन त्यातच तिचा दारुण अंत झाला, तेव्हा जगभरातील असंख्य चाहते हळहळले. डॅफनी कॅरुआना गलिझिया या ५३ वर्षांच्या धडाकेबाज पत्रकार महिलेचा करुण अंत झाला आणि  भ्रष्टाचार आणि गुंडगिरीच्या विरोधात तलवारीसारखी तळपणारी तिची लेखणी एका भ्याड दुर्घटनेमुळे म्यान झाली.

तिच्या कारकीर्दीत तिने अनेक नेते, व्यावसायिकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आणून त्यांचे मुखवटे टराटरा फाडले होते. माल्टामधील ऑनलाइन गेमिंग उद्योग आणि माफिया यांच्यातील भ्रष्ट हातमिळवणीबरोबरच, आर्थिक गैरव्यवहारांत गुंतलेल्या बँकांचे पितळही तिने मोठय़ा धाडसाने उघडे पाडले होते. गेल्या दोन वर्षांत कॅरुआना गलिझिया हे नाव पनामा पेपर्समुळे जगभरात अक्षरश: गाजत राहिले होते. मोझ्ॉक फोन्सेस्का या जगातील बलाढय़ अशा कायदेविषयक संस्थेकडील कागदपत्रांच्या खजिन्यातून माल्टामधील सरकार, राजकीय नेते आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांचे लागेबांधे उघड करण्यासाठी तिने अक्षरश: जिवाचे रान केले होते. माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कॅट यांची पत्नी पनामामधील एका बडय़ा कंपनीची मालकीण असून अझरबैजानमधील खात्यातून तिला मोठी रक्कम मिळाल्याचा दावा करून तिने माल्टामध्ये खळबळ उडवून दिली. माल्टामधील मस्कॅटच्या साम्राज्याला हा प्रचंड हादरा होता. या गौप्यस्फोटामुळेच माल्टाला मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. मस्कॅट आणि त्यांच्या पत्नीने पुढे गलिझियाचे सारे आरोप फेटाळून लावले. माल्टा लेबर पार्टीमधील भ्रष्ट व्यवहारांच्या विरोधात तर गलिझियाने जोरदार मोहीमच उघडली होती. विरोधी नॅशनॅलिस्ट पार्टीचे नेते अ‍ॅड्रियन डेलिया यांच्याशी संबंधित अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश करताना तिची लेखणी जरादेखील कचरली नाहीच.  समाजात संभावतिपणे वावरणाऱ्यांचे बुरखे असे फाटू लागले, की साहजिकच त्यांच्यातील अस्वस्थताही वाढू लागते. गलिझियाला त्या अस्वस्थतेचे चटकेही बसू लागले होते. तिच्याविरुद्धच्या जुन्या खटल्यांची मालिका पुन्हा सुरू झाली.  एका बडय़ा उद्योगपतीने तर तिच्याविरुद्ध तब्बल १९ खटले दाखल केले होते. गलिझियाभोवतीच्या या आरोपांचा, तिच्या व्यवहारांचा आणि तिच्या व्यावसायिक संबंधांचा तिच्या गूढ मृत्यूशी काही संबंध आहे का, याची आता स्थानिक पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. तिच्या मोटारीत बॉम्ब पेरून त्याचा स्फोट घडविला गेला, की रस्त्याकडेला पेरलेल्या एखाद्या बॉम्बच्या रिमोटद्वारे घडविलेल्या स्फोटात तिची मोटार उद्ध्वस्त होऊन त्यामध्ये तिचा अंत झाला, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. तिच्या मृत्यूचे  गूढ उकलेपर्यंत मात्र, माल्टामधील प्रसारमाध्यमे, राजकीय वर्तुळे आणि न्यायसंस्थांवरही जनतेच्या नजरा आता खिळल्या आहेत. गलिझियाच्या मृत्यूमुळे माल्टामधील पत्रकारितेच्या विश्वाला एक वेगळे वळण लागले आहे, एवढे मात्र निश्चित!