अगदी लहान असतानाच यादवी संघर्ष सुरू असलेल्या सीरियातून त्याने पलायन केले, ते वय काही कळण्याचे तर नव्हतेच, पण समोर उभा होता मोठा अवकाश. ना शाळा.. ना पैसा, कुठे जायचे हे माहिती नाही, काय करायचे याचा पत्ता नाही. भरकटत तो लेबनॉनमधील निर्वासित छावणीत जाऊन पोहोचला. एवढय़ा लहान वयात मातृभूमी सोडून पाठीशी कुणी नसताना त्याने व्यक्त होण्यासाठी हातात कॅमेरा घेतला. तो छायाचित्रकला शिकला व नंतर त्याच छावणीत त्याने मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली. जगणं वेगाने अंगावर आदळावं अशी त्या पोराची अवस्था होती. या मुलाचं नाव आहे महंमद अल जाँद. वय वर्ष सोळा. त्याला मुलांसाठीचा शांतता पुरस्कार नुकताच मिळाला आहे, तोही शांततेची नोबेल विजेती मलाला युसुफझाई हिच्या हस्ते. त्याची आई त्या यादवी संघर्षांतही कृतिशील होती. त्यामुळेच तिचे तेथील राज्यकर्त्यांनी अपहरण करून ठार मारण्याची धमकी दिली. त्या वेळी सीरियातील हमा या शहरातून महंमद पळाला व तो लेबनॉनमधील बैरुतनजीकच्या एका शरणार्थी छावणीत राहू लागला. त्याची बहीण व आई-वडीलही बरोबर होते. वडिलांनी त्याची गाठ रमझी हैदर या छायाचित्रकाराशी घालून दिली. त्याने महंमदला छायाचित्रण शिकवले. दोन वर्षे तो शाळेत गेला नाही. छायाचित्रकला शिकत राहिला, त्यातून त्याच्या आयुष्यातील रितेपण काहीसं भरून आलं. त्याला व्यक्त होण्याची संधी छायाचित्रण कलेतून मिळाली. त्याचे वडील कलाकार, तर आई गणिताची शिक्षिका, त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहिती होते. सीरियात किमान १७ लाख मुले यादवीमुळे शाळेबाहेरच आहेत. त्याने आजूबाजूची परिस्थिती पाहिली तेव्हा त्याला स्वत:चे दु:ख फार किरकोळ वाटले व तो मुलांना शिकवण्याचे काम करू लागला. त्या मुलांनाही शिकण्याची आस होती. त्याने जेव्हा निर्वासितांची शाळा काढण्याचे ठरवले तेव्हा तो बारा वर्षांचा होता. त्यामुळे आपल्याला कुणी गांभीर्याने घेणार नाही हे माहिती असल्याने त्याने आईच्या नावाने शाळेचा प्रस्ताव मांडला. आज त्याच्या शाळेत २०० मुले आहेत. २०१४ मध्ये ही शाळा सुरू झाली ती शंभर विद्यार्थी व चार शिक्षकांसह. आज त्या शाळेचा व्याप वाढला आहे. आता त्याला ‘किड्स राइट्स फाऊंडेशन’चा ‘आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार’ मिळाला आहे.

त्याला शाळेत जायला मिळाले नाही, पण ते सुख त्याने इतर मुलांना मिळवून दिले. आता त्याला स्वीडन आश्रय देण्यास तयार आहे, पण त्याला काळजी आहे त्याच्या कष्टातून उभ्या केलेल्या बेक्का स्कूलची. त्याला ही शाळा केवळ स्वयंसेवी संस्थांच्या जिवावर चालते, असा समज होऊ द्यायचा नाही. पुरस्कार स्वीकारण्यासाठी कदाचित तो स्वीडनला जाईलही, पण आपल्यासाठी आयते काही घडून येईल असा त्याचा मुळीच गैरसमज नाही. शाळा ही काही केवळ लिहिणे-वाचणे शिकण्याची जागा नसते, ते असते बालपणीचे जग. तेथे असतात मित्र, आठवणी अन् तेथेच मिळतात जगण्याच्या पहिल्यावहिल्या ऊर्मी, हे महंमदला माहिती होते. त्याचे बालपण करपले, पण त्याने इतर मुलांना ते दिले. सीरियाचे भवितव्य मुलांवर अवलंबून आहे, तर मुलांचे शिक्षणावर.. त्यामुळे महंमद व त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक मुलांना हक्काची शाळा दिली. जगात सध्या २.८ कोटी मुले विस्थापित आहेत. त्यातील २५ लाख सीरियातील आहेत, त्यांना शिक्षणाची कोणतीही संधी नाही. या अंधारातून चालताना त्यांना महंमदने हात दिला, त्यामुळे प्रकाशाचा कवडसा त्यांच्यावरही पडला व त्यांच्याही आयुष्यात आशेची नवी पालवी फुटते आहे.