आरॉन बेक

सिग्मंड फ्राइड यांची ‘मनोविश्लेषण’ उपचार पद्धती शिकूनच आरॉन डॉक्टर झाले.

‘विचार बदला, आयुष्य बदलेल’ वगैरे सुभाषिते सांगायला सोपी असतात (व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड करायला तर फारच सोप्पी असतात!) पण हेच आचरणात कसे आणायचे? विचार बदलून खरेच आयुष्य बदलेल? आणि मुळात आपले विचार हे असे, तर ते बदलायचे कसे? – या प्रश्नांची उत्तरे देणारी मानसोपचार-शास्त्राची शाखा म्हणजे संज्ञानशास्त्रीय उपचारपद्धती किंवा ‘कॉग्निटिव्ह थेरपी’. ही शाखा विकसित करण्याचा मान ज्यांच्याकडे जातो, ते डॉ. आरॉन बेक निधन पावल्याची वार्ता तीन नोव्हेंबर रोजी आली. गेल्या जुलैतच त्यांनी १०१ व्या वर्षात प्रवेश केला होता!

सिग्मंड फ्राइड यांची ‘मनोविश्लेषण’ उपचार पद्धती शिकूनच आरॉन डॉक्टर झाले. आरॉन यांचा जन्म १९२१ चा, म्हणजे ते १९ वर्षांचे असेपर्यंत फ्राइड जिवंत होते. फ्राइडीय उपचारपद्धतीचा दबदबा तोवर वाढला होता. स्वत: बेकसुद्धा १९५० पर्यंत याच पद्धतीचा अवलंब करीत, पण दुसऱ्या महायुद्धानंतरचे प्रश्न नवे आहेत, नवी उत्तरे शोधली पाहिजेत, हे जाणवून त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यांच्या या ‘नव्या’ नोंदींमधून, १९६३ व ६४ सालांमध्ये जे शोधनिबंध रीतसर मानशास्त्राच्या शोधपत्रिकांमध्ये प्रकाशित झाले, त्यांमध्ये या ‘कॉग्निटिव्ह थेरपी’चा ऊहापोह होता. अर्थात त्या दृष्टीने काही प्रयोग त्यांनी आधीपासूनच सुरू केले होते. या प्रयोगांना यश मिळते ते कसे, याचा हा ऊहापोह होता.

‘कॉग्निटिव्ह थेरपी’ ही आज व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्यासाठी, खिन्नमनस्कतेतून बाहेर काढण्यासाठी सर्रास वापरली जाणारी उपचाराची पद्धत ठरली आहे. ‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी’ म्हणून ओळखली जाणारी वर्तनवादी उपचारांवर भर देणारी ही पद्धत, अखेर रुग्णाला स्वत:च्या विचारांमध्ये बदल करण्यास उद्युक्त करते.  स्वत:चेच ‘नकोसे’ विचार कोणते, हे ओळखायला शिकवते आणि हे नकोसे विचार कसे घालवायचे यासाठी काहीएक पर्यायी उपक्रम शोधण्याचा सल्ला देते. नकारात्मकतेवर मात करणे इतके सोपे नसते, या नकारात्मकतेमागे आयुष्यभराचा अनुभव असू शकतो. त्यामुळे रुग्णाच्या विचारांना आव्हान देणे, त्यांच्यात यापेक्षा निराळ्या विचारांचे प्रवर्तन करणे हेदेखील या उपचारपद्धतीत अभिप्रेत आहे, अशी मांडणी डॉ. बेक यांनी विविध शोधनिबंधांतून केली. एकंदर ६०० शोधनिबंध आणि २५ सहलिखित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

मानसशास्त्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘सिग्मंड फ्राइड पुरस्कार’ २०१० मध्ये डॉ. बेक यांना मिळाला. त्याखेरीज अनेक अमेरिकी, युरोपीय पुरस्कारही त्यांना मिळाले होते. पेनसिल्व्हानिया विद्यापीठात त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून अनेकांनी ‘कॉग्निटिव्ह थेरपी’ पुढे नेली!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Profile aaron beck american psychiatrist akp

ताज्या बातम्या