हवामानातील बदलांचे भाकीत आपण सहजासहजी करू शकत नाही, फुलपाखरांची जी रंगसंगती असते त्याची गुंफण एका कुठल्या सूत्रात करता येत नाही. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे कोविड-१९ ची साथ कशी, कुठे पसरत आहे, ती वाढेल, कमी होईल याचे कुठलेही भाकीत करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत गणितातील जी शाखा मदतीला धावून येते ती म्हणजे ‘केऑस थिअरी’. हा सिद्धांत जीवशास्त्र, हवामानशास्त्र यांसह कुठल्याही विज्ञान शाखेला लागू करता येतो. रॉबर्ट बॉब मे हे या क्षेत्रातील तज्ज्ञ! बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे गणिती परिससंस्थाशास्त्रज्ञ मे यांचे अलीकडेच निधन झाले.

जैवविविधता, लोकसंख्याशास्त्र, संसर्गजन्य रोगशास्त्र यांतील प्रश्न ते गणितीय प्रारूपाच्या मदतीने सोडवत. त्यातूनच त्यांनी जीवशास्त्रातील खरे सौंदर्य टिपले होते. परिसंस्थाशास्त्राचा अभ्यास त्यांनी विश्लेषणात्मक विज्ञानाच्या पातळीवर नेला. १९९५ ते २००० या काळात ते ब्रिटिश सरकारचे वैज्ञानिक सल्लागार होते. जनुकीय पिके, हवामान बदल, होमिओपॅथी, संसर्गजन्य रोग अशा अनिश्चिततेचा स्पर्श असलेल्या अनेक विषयांवर त्यांनी नेहमीच मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचा जन्म व शिक्षण ऑस्ट्रेलियातील सिडनीत झाले. रसायनशास्त्राकडून ते भौतिकशास्त्राकडे वळले नंतर अतिवाहकता विषयात विद्यावाचस्पती पदवी घेऊन ते सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ झाले. सामाजिक जबाबदारी म्हणून परिसंस्थाशास्त्रज्ञ चार्लस् बिर्च यांच्या गटात काम करताना, रॉबर्ट मॅकआर्थर या सैद्धांतिक परिसंस्थाशास्त्रज्ञाशी त्यांची गाठ पडली व नंतर ते प्रिन्स्टन विद्यापीठात प्राध्यापकी करण्यास गेले. स्पर्धात्मक प्रजातींचे समुदाय विविधता वाढत असतानाच्या काळात स्थिर राहू शकत नाहीत, असा सिद्धांत त्यांनी ‘स्टॅबिलिटी अँड कॉम्प्लेक्सिटी इन मॉडेल इकोसिस्टिम’ या पुस्तकात मांडला होता. १९८८ मध्ये ते ब्रिटनला परतले. इम्पीरियल कॉलेज, रॉयल सोसायटी या संस्थांत कार्यरत झाले. रॉय अँडरसन यांच्यासह त्यांनी मांडलेल्या साथरोगांच्या प्रारूपावर आधारित ‘इन्फेक्शियस डिसीजेस ऑफ ह्य़ूमन्स- डायनॅमिक्स अँड कंट्रोल’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. एखादा साथीचा रोग रोखण्यासाठी किती लोकांचे लसीकरण करावे लागेल याचा गणिती ठोकताळा त्यांनी मांडला होता. बँकिंग व्यवस्थेत आंतरजोडणी मर्यादित असावी, स्थिरतेसाठी भांडवली राखीव साठा वाढवावा असे उपाय २००८च्या आर्थिक पेचप्रसंगात  त्यांनी  गणिती आकडेमोड करून सांगितले होते.  शिवाय सामूहिक उन्हाळी भटकंती हा उपक्रम त्यांनी ४० वर्षे राबवला. विज्ञानाच्याच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्शणाऱ्या प्रतिभावान गणितज्ञास आपण मुकलो आहोत.