ज्या कुष्ठरुग्णांचं अस्तित्वच समाजाने नाकारलं होतं अशा लोकांनी आपल्यासारख्याच इतरही वंचित घटकांना सोबत घेऊन जगाच्या नकाशावर स्वतंत्र अस्तित्व असलेलं स्वत:चं एक गाव.. ‘आनंदवन’ निर्माण केलं. आनंदवनाचा ६७ वर्षांचा विलक्षण प्रवास रेखाटणारे सदर..

बाबा आमटेंच्या आईचं नाव- लक्ष्मीबाई. बाबा म्हणत, ‘‘माझ्यातील ‘शिस्त’ ही वडिलांकडून आलेली असली तरी माझ्यावरचे सगळे ‘संस्कार’ माझ्या आईचे आहेत.’’ बाबांची आई अशिक्षित होती. पण तिने केलेल्या संस्कारांचा प्रभाव बाबांच्या आयुष्यावर कायम राहिला. बाबांनी एके ठिकाणी असं म्हटलं आहे की, ‘‘माझ्या आईमधली समर्पणाची भावना, तिची विचारी आणि त्यागाची प्रवृत्ती, तिची दुसऱ्यांसाठी जगण्याची वृत्ती एखाद्या ‘स्पंज’सारखी मी स्वतमध्ये शोषून घेतली. तिच्या रोजच्या वागण्या-बोलण्यात येणाऱ्या या सगळ्या गोष्टींचा माझ्या अंत:करणावर खोलवर परिणाम झाला. आज मी जो काही आहे तो माझ्या आईच्या सुंदर संस्कारांमुळे आहे.’’

Can a woman ever retire from housework
समुपदेशन : बाई रिटायर्ड होते?
Tata Institute of Social Science, Suspends Dalit Ph.D. Student, Ramdas KS, Misbehavior, Anti National Stance, tiss mumbai, tiss suspends phd student, mumbai tiss, tiss Suspends Dalit Student, tiss controversy,
‘टिस’कडून दोन वर्षांसाठी दलित विद्यार्थ्याचे निलंबन, वारंवार गैरवर्तन आणि देशविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

बाबा त्यांच्या लहानपणी घडलेला एक प्रसंग आवर्जून सांगत.. ‘‘ते दिवाळीचे दिवस होते. सगळीकडे रोषणाई झगमगत होती. आम्हा सर्वाच्या उत्साहाला नुसतं उधाण आलेलं होतं. आमच्या आईनं माझ्या गळ्यात सोन्याचा गोफ आणि हातात अंगठी घातली. खूप सारी नाणी देत ती मला म्हणाली की, या रस्त्याने सरळ बाजारात जा आणि हे सगळे पसे संपवून ये. (ती आधीच त्या रस्त्यावरनं जाऊन आली होती.) मी ते पसे घेऊन खुशीत निघालो. पुढे भरउन्हात रस्त्याच्या कडेला बसलेला एक आंधळा भिकारी मला दिसला. ‘आंधळ्याला पसा दे भगवान..’ असं म्हणत तो येणाऱ्या-जाणाऱ्यांची विनवणी करत होता. त्याच्या हातात एक गंजलेलं टिनाचं वाडगं होतं. आजूबाजूची लोकं त्याच्या वाडग्यात खडे टाकून त्याची टिंगल करत होती. त्यामुळे तो खूप वैतागला होता. त्याक्षणी मला जाणीव झाली : माझ्या आनंदी, झळाळत्या जगापलीकडे आणखी एक जग होतं. दु:ख आणि वेदनांनी भरलेलं जग. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्यानं हातात पकडलेल्या वाडग्यात मुठी मुठी भरून माझ्याकडची सगळी नाणी टाकली. नाण्यांचं वजनच एवढं होतं, की त्याच्या हातातलं वाडगं निसटून खाली पडता पडता राहिलं. यावर तो वैतागून म्हणाला, ‘‘अहो, मी एक अंध भिकारी आहे. माझ्या वाडग्यात दगड टाकून माझी चेष्टा का करता तुम्ही?’’ त्याची अगतिकता बघून माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मी म्हणालो, ‘‘अहो बाबा, हे दगड नाहीत, ही नाणी आहेत. तुम्ही हवं तर चाचपून बघा.’’ त्याचा विश्वासच बसेना. तो परत परत हाताने नाणी चाचपून बघत, मोजत राहिला. आणि जेव्हा त्याचा विश्वास बसला, की हे दगड नसून नाणी आहेत, त्याच्या चेहऱ्यावर आत्मिक समाधानाची भावना पसरली. त्या समाधानाच्या तेजापुढे मला दिवाळीचा लखलखाट अगदीच फिका वाटला.

आईने ही परीक्षा घेतली होती का माझी? तिने आजवर माझे सगळे लाड, सगळे चोचले पुरवले होते. पण कुठेतरी तिला हे बघायचं होतं का, की मी त्या पशाचा कसा उपयोग करतो? त्या दिवशी आईने मला शिकवलं, ‘‘It is good to get, but better to give’’ या ‘better to give’ मधलं अत्युच्च समाधान मला या प्रसंगाने दिलं.’’

त्या काळातसुद्धा बाबांच्या आईने एक तत्त्व कायम जपलं. घरातले संडास स्वच्छ करणाऱ्या महिलेला तिने नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. घरात अन्न शिजल्यावर ती ते अन्न प्रथम त्या महिलेला आणि तिच्या कुटुंबाला वाढत असे; आणि मगच घरातल्यांना. ती बाबांना म्हणायची, ‘‘मी अन्न शिजवणारी आहे, ती विष्ठा साफ करणारी आहे. पण विष्ठाही अन्नातूनच निर्माण होत असते. म्हणून आपल्याआधी तिला जेवू घालायला हवं.’’ पुढे समाजाने उपेक्षिलेल्या, अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या जातींतल्या श्रमिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी बाबांनी स्वत: डोक्यावरून मला वाहून नेला, नाल्या उपसल्या. काठावर राहून निरीक्षण करण्यापेक्षा त्यांच्यातला एक बनून कष्टकऱ्यांचे प्रश्न, त्यांचं दुख समजून घेतलं. दलितांतले दलित आणि पीडितांतले पीडित अशा कुष्ठरुग्णांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी मिळवून दिली. मानवी हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी सतत आग्रही असणाऱ्या बाबांना ‘प्रत्येक माणसाला सुखाने आणि सन्मानाने जगण्याचा पूर्ण हक्क आहे..’ हे बाळकडू त्यांच्या आईकडूनच मिळालं असणार.

पुढे बाबा साधारण विशीचे असताना एका पारिवारिक घटनेचा तीव्र परिणाम झाल्याने बाबांच्या आईचं मानसिक संतुलन ढासळलं. त्यावेळी बाबांना त्यांच्या आईला नागपूरच्या वेडय़ांच्या इस्पितळात भरती करावं लागत असे. पण इस्पितळाच्या गजांआडही त्यांची आई कधीच स्वस्थ बसली नव्हती. आपल्या घरासारखे कत्रेपण ती तिथंही गाजवू लागली होती. कोण काय करतं आहे, आणि कुठे काय चाललं आहे, याकडे तिचं बारीक लक्ष असे. इस्पितळात अनेक तरुण, सुंदर मनोरुग्ण मुलीही भरती असत. आणि त्यांच्या असहायतेचा फायदा घेणारे विकृत डॉक्टरही असत. पुष्कळदा याच आमिषाने ते वेडय़ांच्या इस्पितळात नोकरी धरत. बाबांच्या आईने हे अचूक हेरलं आणि या प्रकाराविरुद्ध तिनं खुलं बंडच पुकारलं. इस्पितळाची पाहणी करायला आलेल्या अधिकाऱ्यापुढे तिने सर्व साक्षीपुरावे ठेवले. त्याचा परिणाम एका तरुण डॉक्टरची उचलबांगडी होण्यात झाला.. आणि बाबांची आई त्या इस्पितळाची ‘हीरोइन’ झाली! या इस्पितळातील मुक्कामात तिने अनेक नाती जोडली, अनेक असहाय, पीडित स्त्रियांना आधार दिला. याबाबतीत बाबा म्हणत, ‘‘In this Insane world, the most Sane person is my mother’’

कालांतराने बाबांच्या आईला डिस्चार्ज मिळाला..

यासंदर्भात बाबांनी लिहिलेल्या ‘माझ्या आईचे वेड’ या लेखात एका हृदयद्रावक प्रसंगाचा उल्लेख आहे. तो प्रसंग मी इथे तसाच नमूद करतो- ‘‘वेडय़ांच्या इस्पितळात जाऊन आलेल्या माझ्या आईला साऱ्याच वेडय़ांबद्दल एक जवळीक निर्माण झाली होती. तसे वडिलांपुरते तिचे पागलपण अजून कायम होते; पण इतरांशी वागण्यात ती शहाण्यांहून शहाणी होती. एक होती सोनपिशी. उंच, धिप्पाड, सुंदर अशी ब्राह्मणाची पोर. आपले मूल पाजत ती रस्त्यावर नग्नावस्थेत फिरायची. ती सार्वजनिक नळावर आंघोळ करायची तेव्हा तिच्या शरीरावर नजरा वखवखून तुटून पडत. पण पुढे पाऊल टाकण्याचे कोणाचे धाडस होत नसे. कारण बाजूलाच कुठेतरी तो रुमाल बांधलेला, आडमाप देहाचा गुलाब कादीर उभा असे! तो पहारेकऱ्यासारखा सतत तिच्याभोवती असायचा. पागलपण आणि पशुत्व यांतले कवच होऊन.. कुजलेल्या मनांपासून त्या वेडय़ा आईचे संरक्षण करीत. एकीकडे वासनांध आणि दुसरीकडे जितेंद्रिय! आईने एकदा गुलाब कादीरला माझ्याकरवी घरी बोलावले, त्याला जेवू घातले आणि त्याचे खूप कौतुक केले. ती मला म्हणाली, ‘‘बघ, याला तिचे मूल पाजणे दिसले; तिचे उघडे स्तन नाही. असा तू हो. हनुमंतासारखा..!’’

स्वतच्या प्रत्येक कृतीतून ही वेडी आई आपल्या मुलासाठी जीवनाचं एक नवीन तत्त्वज्ञान सांगून गेली, एक नवा संस्कार रुजवून गेली. बाबांच्या पुढील आयुष्यात घडलेल्या प्रत्येक कृतीच्या, घटनेच्या आणि प्रसंगाच्या मुळाशी हेच संस्कार आहेत. किंबहुना, याच संस्कारांची शिदोरी घेऊन आनंदवन गेली सहा दशकं अव्याहतपणे वाटचाल करत आहे.

विकास आमटे vikasamte@gmail.com