24 January 2019

News Flash

आयुष्याची पुनर्मांडणी

वर्ष १९७५ असेल. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागात बॅचलर ऑफ जर्नालिझमच्या वर्गात होते.

वर्ष १९७५ असेल. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागात बॅचलर ऑफ जर्नालिझमच्या वर्गात होते. वृत्तपत्र विद्येची तत्त्वे शिकवण्यासाठी प्रभाकर पाध्येंसारखे पत्रकारितेला सन्मान देणारे शिक्षक आम्हाला होते. अगदी काटेकोरपणे पाळून पाध्येसर वर्गात येत. शब्दश: पोटतिडकीने पत्रकारितेची मूलतत्त्वे शिकवत. देशविदेशातले नवेजुने संदर्भ देऊन मूल्यांचे विवेचन करत असत. समोरची व्यक्ती कितीही लहान किंवा अगदी अज्ञानी असली तरी त्याचे विचार ते ऐकून घेत, त्यामुळे चर्चेच्या अनेक फैरी झडत. त्यासाठी तासाचा वेळ अपुरा पडे. आपोआपच चर्चेची पुढची फेरी त्यांच्या घरी होऊ लागली. पाध्ये सर म्हणजे ‘दादा’ होऊन गेले. विचारांनी भरलेले आणि भारलेल्या त्या घरात दादा ज्येष्ठ नागरिक या वर्गात मोडतात याची पुसटशीसुद्धा शंका येत नसे. (त्यांचे पांढरे रेशमी केस वगळता). पुढे कमलताई दादांच्या पत्नी (‘बंध अनुबंध’च्या लेखिका) यांच्याशीही खूप चर्चा व्हायच्या. त्यांनी मला मुलगी कधी मानलं हे मलासुद्धा कळलं नाही.

या संदर्भात कमलताईंशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलेली एक आठवण फार मोठी शिकवण देऊन गेली. त्या म्हणाल्या, ‘एकदा माझ्याकडे प्रसिद्ध साहित्यिकाच्या पत्नी आल्या होत्या. त्याच वेळी आमच्या दिल्लीचे स्नेही पती-पत्नी आले होते. त्यांच्याशी गप्पा मारून झाल्यावर ते दोघं गेले. ते गेल्यानंतर त्या साहित्यिकांच्या पत्नी म्हणाल्या, सहज म्हणाल्या, ‘बिच्चारे काय करणार ना? तरुण मुलगा गेला त्यांचा. मग वेळ घालवायला काहीतरी करायचं झालं.’ कमलताईंना चर्रकन चटका बसावा तसं झालं. तेव्हापासून त्या आपणहून बोलावल्याशिवाय कुठेही जायच्या नाहीत. त्यांच्याही एकुलत्या एक मुलाचे आकस्मिक अपघाती निधन झाले होते, परंतु त्याच्या मृत्यूनं पोळलेल्या या प्रभाकर पाध्ये आणि कमलताईंनी त्यांच्या अपार दु:खाची पुसटशीसुद्धा चाहूल बरेच र्वष आम्हाला लागून दिली नाही.

हे सगळं इतकं तपशीलवार लिहिण्याचं कारण की ते एका समृद्ध उत्तरायुष्य जगणाऱ्या व्यक्तीचं दर्शन होतं. आघात, वय, परिस्थितीवर मात करून एक गुणवत्तापूर्ण आयुष्य जगता येतं याचा तो वस्तुपाठच होता. तडजोड न करता म्हातारपण जगता येतं याचा आदर्श ते दोघेही होते.

समृद्ध जीवनाच्या संकल्पनेची सुरुवात होते. ती स्वत:ला एक मूलभूत प्रश्न विचारण्यापासून आता माझ्या आयुष्याचा ‘हेतू’ काय आहे. बालपणात आरोग्य, शिक्षण, तरुणपणात नोकरी, लग्न, घर, मुले, मध्यम वयात मुलांची लग्ने. आपण पुढच्या आयुष्याची तरतूद करून ठेवणे, नोकरीमध्ये उच्च पदापर्यंत प्रगती करणे असा हेतू असतो. हे अगदी ढोबळ मानाने इथे दिले आहे. पण साठी नंतर जगण्यासाठी तुम्हाला स्वत:मध्ये डोकवावे लागेल. स्वत:शी संवाद साधावा लागतो. आयुष्याचे पुनरावलोकन करून राहून गेलेल्या गोष्टी कोणत्या, मला कशात आनंद वाटतो, माझ्यामध्ये असलेल्या सर्व क्षमतांचा, गुणांचा मी वापर केला आहे का? आत्ता वापर करायचा ठरवला तर मी काय करू शकतो? थोडक्यात म्हणायचं झालं तर आयुष्याची पुनर्माडणी करायची. इतर कोणाच्याही मदतीशिवाय आपण आपला वेळ घालवू शकू असा किमान एक तरी छंद (टी.व्ही. सोडून) जोपासला पाहिजे. माझी मैत्रीण पुष्पा साठीनंतर गाणं शिकायला जायला लागली. मुलाबाळांच्या संसाराच्या रगाडय़ात कितीतरी गोष्टी राहून गेलेल्या असतात. त्याचे त्या त्या वेळी खूप दु:ख झालेलं असतं. त्या गोष्टी पूर्ण करायची यापेक्षा चांगली वेळ ती कोणती?

जीवन गुणवत्तापूर्ण बनवायचं असेल तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही आहोत, ज्या काही परिस्थितीत आहोत त्याचा बिनशर्त, सहजपणे स्वीकार करायचा. गेले ते दिन गेले म्हणून हळहळत बसायचे नाही. कुटुंबाच्या केंद्रस्थानी कर्तव्याच्या भूमिकेपासून आपण आपोआप दूर जात असतो ते मान्य करायचं. आपल्या मुलांना आपण आपल्या मनाप्रमाणे वाढवले आता नातवंडांना त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या मनाप्रमाणे वाढवू द्या. आपल्याला विचारत नाहीत अशी भावना करून घेऊ नका. आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्या. शारीरिक आरोग्याचा विचार करा. म्हणजे आपला साठीनंतरचा हेतू आणि तो पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी याचा नीट मेळ बसेल.

तिसरी गोष्ट म्हणजे आपले सामाजिक संबंधाचा विचार जाणीवपूर्वक करा. नवरा, बायको, मुलगा, मुलगी रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त ‘आपली’ म्हणावी अशी किमान तीन तरी माणसं आपल्याला हवी. मन मोकळं करायला कोणीतरी हवं. आयुष्यभर मी, माझा, माझी पोझिशन, माझी संपत्ती याचाच विचार करत राहणाऱ्या माणसांकडे आपलं मन जपणारं कोणी नसेल तर जगणं कठीण होत जातं हे निश्चित. बदलीची नोकरी असणारे, सेवानिवृत्तीनंतर मुलाकडे राहायला आलेल्या ज्येष्ठांनी जाणीवपूर्वक मित्र-मैत्रिणी मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्न करताना लक्षात ठेवायला हवं ते म्हणजे समोरच्या माणसांबद्दलची संवेदनशीलता. आपल्या सुनेचे कौतुक करणाऱ्या (काही गोष्टी बोलल्या जात नाहीत.) एखाद्या ज्येष्ठ स्त्रीने सुनेकडून होणारा त्रास अस होऊन तुमच्यापाशी मन मोकळं केलं तर बरं झालं, फार गोडवे गात होती ना! असे म्हणून जवळीकीचे निर्माण होणारे नाते तोडू नका. मुले नसणारे, एकटे, परावलंबी वृद्धांशी आपणहून संवाद साधायचा प्रयत्न करा. जरूर तेथे वेळ द्यायची तयारी ठेवा. यामुळे तुमचा वेळ तर चांगला जाईलच, पण तुम्हालाही जेव्हा गरज पडेल तेव्हा माणसे मिळतील.

अध्यात्माची आवड असणाऱ्यांनी त्या मार्गावर पुढे जात समाजाचे देणे आपण लागतो; त्यांनी कोणत्या घटकासाठी मुले, आजारी, अपंग, वृद्ध.. आपल्याला काम करायचे आहे त्याचा शोध घेऊन संस्थांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा.. पण हे सर्व शक्य होण्यासाठी एका फार मोठय़ा निश्चयाची आवश्यकता आहे. एकदा गणिताच्या खूप लोकप्रिय आणि उत्तम शिक्षक असलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांनी मला विचारलं, ‘‘सांगा, आता मी काय करू?,’’ मी म्हटलं, ‘‘तुम्ही दिवसातून फक्त तास-दोन तास गणितात कच्चे असणाऱ्या मुलांसाठी द्या.’’ ते म्हणाले, ‘‘छे छे मी ठरवलं आहे आता मुळीच गणिताकडे पाहायचं नाही.’’ मग मी म्हटलं, ‘‘दुसरं काय करायला आवडेल तुम्हाला?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘आयुष्यभर गणित शिकवलं आता दुसरं काय येणार मला?’’ म्हणजे एकूण काय तर ‘नकारात्मकता’ जोपासली. त्यासाठी प्रत्येकाने नकारात्मकता सोडून आयुष्याचा स्वीकार केला पाहिजे. तेव्हा नाही जमलं आता करून काय उपयोग असा विचार करू नका. जे काही आयुष्य जगलो त्याचा विचार करण्यापेक्षा आत्ता वेळ आहे, आर्थिक स्थैर्य आहे, स्वत:ला सिद्ध करण्यातली, यशासाठी धावपळ करण्याची सक्ती नाही. ‘जगायचं आहे बिनधास्त २४ तास’ हा विचार आयुष्य पुढे नेणार याची खात्री बाळगा.

डॉ. रोहिणी पटवर्धन

rohinipatwardhan@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on January 20, 2018 12:47 am

Web Title: articles in marathi on how to live a happy life after 60 years old