नितीन अरुण कुलकर्णी

संकल्पनांचा प्रवास संपत नसतोच.. तो प्रवाही असतो, झाडासारखा शाखोपशाखांनी वाढत जाणारा असतो अन् तुलनेने ताजे आकलन असे की, तो ‘आंतरसंबंधित’ असतो..

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

‘संकल्पनांची संस्कृती’मधला आज शेवटचा २५ वा लेख. या लेखमालेची रूपरेषा अतिशय साधा विचार व अनुभवातून जन्मली. निर्मितीच्या क्षेत्रातल्या (कला, विज्ञान, तंत्रज्ञान व एकंदरीतच वस्तू-निर्मिती) आपणा सगळ्यांचा नेहमीचा अनुभव असतो की, आपण जेव्हा जगातल्या निर्मितीकडे प्रक्रियेच्या अंगाने बघतो तेव्हा असं बऱ्याच वेळेला वाटतं की, निर्मितीच्या प्रक्रियेतला एखाद्या टप्प्याचा अनुभव आपल्याला आधीही आलेला होता किंवा अशी कल्पना आपल्यालाही सुचलेली होती, पण आपण मात्र तिचा पाठपुरावा करू शकलो नाही किंवा काही कारणाने (आर्थिक/ सामाजिक/ सांस्कृतिक/ नैतिक.. मर्यादांमुळे) आपण तो तसा केला नाही. कुठल्याही निर्मिती प्रक्रियेचा ‘संकल्पने’च्या अंगाने तीन दशकांत कला व डिझाइनचा विश्लेषक या नात्याने विचार करताना आणखी एक गोष्ट लक्षात आली : ‘एकाच किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या निर्मिती प्रक्रियेतल्या सूक्ष्म घटना एकमेकांसमान असतात, त्यामधे साधर्म्य जाणवतं.’ आंतरशाखीय (इंटरडिसिप्लिनरी) विचार इथे प्रबळ होतो आणि लक्षात यायला लागतं की, संकल्पनेच्या अंगाने निर्मिती एकात्म आहे, कारण संकल्पना स्थलकाल सापेक्षतेपासून मुक्त असते. (संकल्पनेतून तयार होणारी कृती वा वस्तू कदाचित स्थल, काल, संस्कृतीने बद्ध असेल, संकल्पना व त्यातून तयार झालेली कृती या संबंधित असल्या तरी एकमेकांपासून भिन्न असतात.) काही दिग्गजांच्या निर्मितीकडे व त्यांच्या प्रेरणांकडे पाहून याची खात्री पटते. यातून एक जाणवते की ‘संकल्पना’ जर कालसापेक्षतेपासून मुक्त असेल तर मानवापासूनही मुक्त असली पाहिजे! ‘वैश्विक मन’ अशी संकल्पना तत्त्वज्ञानात मांडली गेली आहेच. याचा आपल्याला समजणारा अर्थ असा की एकंदरीत मानवी व नैसर्गिक असं जे काही आहे त्या सर्वामध्ये जाणिवेचा व आकलनाचा अबोध असा बंध आहे. आपल्या बाल्कनीतलं कुंडीतलं झाड असो किंवा आपला पाळीव प्राणी अथवा आपल्याशी कमीअधिक संबंधित व्यक्तीचं बोलणं व त्या बोलण्या विपरीत आपल्याला होणारी तिच्या मन:स्थितीची जाणीव असो. या सर्वामध्ये एक अन्योन्य संबंध असतो व त्याला तर्कबुद्धीची गरज लागत नाही आणि या जाणिवेला आपण कदाचित ‘प्रेम’ म्हणत नसू. खरं तर या अन्योन्य संबंधाचा आविष्कार म्हणजेच प्रेम. परंतु आपण आसक्तीत गुंततो व या गुंतण्याला प्रेम म्हणतो. केवळ या नैसर्गिक अन्योन्य संबंधाच्या जाणिवेचाच एक आकारबंध असतो त्यालाच वैश्विक मन म्हणता येते.

या धारणेतून प्रत्येक लेखात आपण संकल्पनेच्या एका प्रकाशिबदूतून सुरुवात करून संकल्पनेचा धागा पकडत गेलो. एक महत्त्वाचं इथे सांगावंसं वाटतं ते हे की, जसा संकल्पनांचा आकारबंध उलगडत गेला तसाच तो लेखांत मांडलेला आहे. मनन-चिंतनाच्या, संशोधनाच्या, बघण्याच्या, वाचनाच्या प्रवासात अनेक प्रकाशिबदू व प्रकाशधागे सापडवत गेलो. संकल्पनांचे आकलन व रेखन हे समांतरपणे घडत होतं; भरकटणं, झपाटणं व रात्री झोपेतून दचकून उठणं होत होतं हे वेगळे सांगायलाच हवं. हा पूर्ण प्रवास अगतिक हेलकाव्यांचा असा होता, जो उदयोन्मुख संशोधिका वैष्णवीच्या मदतीखेरीज कठीण होता.

संकल्पनेचा आराखडा अनेक ऊर्जािबदूंचा प्रकाशमान समूहासारखा असतो, जो नक्षत्रांच्या समूहासारखा दिसतो. आता तुम्ही म्हणाल की, हे खूप काल्पनिक व प्रतीकात्मक झालं! परंतु ज्ञानाच्या आकाराचा अंतर्भाव केला तर आपल्याला लक्षात येईल की, तो नक्षत्र पुंजांसारखाच दिसतो. कारण संकल्पना ही व्यक्तिगत नसून, सार्वत्रिक असते. कुठल्याही संकल्पनेची घडण या तीन घटकांच्या समन्वयातून होते. (१) अबोध मन (वैश्विक मन याचाच भाग आहे) (२) इंद्रियजन्य अनुभव व (३) तार्किक बुद्धी. कुठल्याही संकल्पनेचा वेध किंवा निर्मिती करायची असेल तर या तिन्ही प्रक्रियांचा समन्वय बघावा लागतो. या सदराच्या माध्यमातून आपण हेच करत गेलो आणि ही प्रक्रिया जास्त ठळकपणे अधोरेखित झाली. नक्षत्राचा आकारबंध इथेच असा तयार होतो.

आकारबंध कशाला हवा?

पूर्ण सृष्टीच ज्ञानाच्या संकल्पनेचा आकारबंध आहे. चार्ल्स डार्वनिने ‘ट्री अॉफ लाइफ’ची प्रतिमा योजली. तो म्हणतो, ‘‘कळ्या जशा, स्वत: वाढून ताज्या कोवळ्या कळ्यांना तयार करतात व फोफावू देतात तसेच दमदार फांद्या असतील तर सर्व बाजूंनी फांद्या फुटतील आणि कित्येक अशक्त शाखांना आधार देऊन वाढतील, म्हणून मला विश्वास आहे की पिढय़ान्पिढय़ा जीवनाचं हे मोठं झाड त्याच्या मृत आणि तुटलेल्या फांद्यांनी भरेल आणि पृथ्वीला विखुरलेल्या भल्याबुऱ्या आवरणांसह व्यापेल.’’ आता इथे पूर्ण जीवनाच्या उत्क्रांतीसाठी झाड, त्याच्या फांद्या व उपशाखा तसंच मुळ्या ही प्रतिमा बनते व पुढे संकल्पना विचारासाठी एक साधन ठरते. ‘जीवनवृक्ष’ ही संकल्पना अनेक शतकं वेगवेगळ्या संस्कृतींनी वापरली आहे, हे सयुक्तिकही आहे. कारण निसर्गात जशी झाडे आहेत तशीच आपल्या मनातही झाडे आहेत. झाडांच्या आकारांनी आपल्याला इतके प्रभावित केलं आहे की, आपण झाडांच्या आलेख चित्रांद्वारे विचार मांडतो, संवाद साधतो. जीवनातल्या गहन कल्पनांना एकमेकांशी जोडून विचार करण्यासाठी झाड या ‘दृश्ययंत्रा’चा आपण वापर करतो. यावर मॅन्युएल लिमा या संशोधकाचं ‘व्हिज्युअलायझिंग द ब्रांचेस ऑफ नॉलेज’ या नावाचे पूर्ण पुस्तकच आहे.

निसर्गासाठी ऊर्जातत्त्व व त्यातून जीवनिर्मिती व त्यांचे विविध आकार अशी व्यवस्था तर मानवासाठी मन, तर्कबुद्धी, अनुभव व त्यातून बाह्य़ संकल्पनांचा आकार व नंतर निर्मिती अशी यंत्रणा असते. त्यामुळे संकल्पनेला ऊर्जेचंच रूप मानायला वाव आहे. पण आपण या ऊर्जेचं विभाजन करतो का? जे. कृष्णमूर्तीच्या एका वचनातून ते स्पष्ट होईल- ‘‘आम्ही ऊर्जा तुकडय़ा- तुकडय़ांमध्ये विभागली, मानवी ऊर्जा आणि वैश्विक ऊर्जा ही एकसंध आणि परिपूर्ण आहे. आपल्याला जर जीवनातला कलह व समस्या मिटवायच्या असतील तर या ऊर्जेचं स्वरूप समजून घ्यावंच लागेल आणि स्वत: त्या अविभाजक तीव्र ऊर्जेचा अंगीकार करावा लागेल.’’ (- जे. कृष्णमूर्ती, मद्रासमधील दुसरं सार्वजनिक भाषण, जानेवारी १९७१)

मानवी आकलनाला मात्र विभक्ततेतूनच बघता येतं. संकल्पना ही अनेक घटकांची एक जुळणी असते खरी, पण संकल्पनेचं दृश्य स्वरूप त्या-त्या काळात असलेल्या ज्ञानाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. झाडाच्या योजनेकडून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर हे दृश्य स्वरूप, ‘नेटवर्क’च्या गोलाकारामध्ये (माहितीजाल) परिवर्तित झालेलं दिसेल. लिमा यांचाच पुढील सिद्धांत ‘व्हिज्युअल कॉम्प्लेक्सिटीज’ या नावाने प्रदर्शित झाला आहे यात असं म्हटलं आहे की, माहितीचं (डेटा) केवळ दृश्य दर्शवणं असं या आरेखनांचं स्वरूप उरत नाही तर ही ‘जालात्मक’ चित्रं नवीन ज्ञानाची नांदी ठरतात.

एक महत्त्वाचा दाखला ही रेखनं देतात आणि तो म्हणजे ‘आंतरसंबंधां’चा (इंटरकनेक्टेडनेस) खरं तर या जगात सर्वच संबंधित आहे. आता क्वांटम फिजिक्सदेखील हेच म्हणते. परंतु मानवाला मात्र विभक्ततेपासून एकसंधतेकडे यावं लागतं. जे आता संगणकीय तंत्रज्ञान आर्टिफिशिअल इंटलिजन्स व डेटा व्हिज्युअलायझेशन या तंत्रांद्वारे सोपं करून दाखवू लागलं आहे. याचा अगदी सोपा प्रकार म्हणजे टोनी बुझानने कॉपीराइट घेतलेला ‘माइंड मॅप’; तर त्यापुढला ‘कन्सेप्ट मॅप’ यात संबंधित अनेक घटकांचा बंध एकसंधतेत बघता येतो.

आंतरजालीयतेने (नेटवर्किझम) प्रेरित कलाकार शेरॉन मोलोय म्हणते, ‘‘माझा शोध प्रत्येक गोष्ट कशी परस्पर जोडलेली आहे हे दर्शविण्याचा आहे. अणूपासून ते पेशीपर्यंत, शरीरात आणि पलीकडे; समाजात आणि विश्वापर्यंत, तेथे अंतर्निहित प्रक्रिया आहेत, रचना आणि लय ज्याचं वास्तव आजूबाजूला प्रतििबबित केलं जातं.. एक छोटी गोष्ट दुसऱ्याकडे जाते आणि मोठय़ा आकारबंधाचा उदय होतो.. माझं हे काम अनेकविध गोष्टी, नेटवर्क्स, विरोधाभास आणि अगदी लहान-मोठय़ा हालचाली अंगीकारत जातं व माझी संकल्पना बदलत व बनत जाते.’’ (सोबतचे चित्र पाहा).

डिझाइनच्या शिक्षणात ‘माइंड मॅप’ काढायला शिकवलं जातं. काही शाळादेखील हे तंत्र शिकवतात. याचा प्रमुख उद्देश विचार करायला शिकवणं हा असतो, पण पुढे पुढे विचाराची स्पष्टता व समग्रता देणं व महत्त्वाचं म्हणजे विभक्त केलेल्या गोष्टींमध्ये ‘आंतरबंधता’ देणं आणि नवीन ‘संकल्पनांचे आकारबंध’ तयार करणं हा असतो. यातून आपल्यालाच आपल्या मानसिक क्रियांबद्दल सजग होता येते. एकाच दृष्टिक्षेपात आंतरसंबंधांचा समग्र खेळ दिसणं यातूनच मुक्तपणाची भावना अनुभवायला मिळते. संकल्पना एकटी नसते, संवेदना एकटय़ा नसतात, ज्ञानात्मक जाणीव एकटी नसते.. त्यांचा आंतरसंबंध असतोच.. तो पुढे गेल्याशिवाय विचार पुढे जात नाही. हे सदर चालवण्याच्या निमित्ताने वाचकांशी असलेला आंतरसंबंध दृढ होत गेला, यापेक्षा अधिक तृप्तीची दुसरी कुठली भावना असू शकेल?

(समाप्त)

लेखक दृश्यकला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात. ईमेल : nitindrak@gmail.com