12 December 2018

News Flash

अवकाश देणारे सहजीवन

मी आणि विनया एकमेकांना लग्नासाठी म्हणून भेटलो तेव्हा आम्ही दोघांनीही तिशी पार केली होती.

‘‘मी आणि विनया एकमेकांना लग्नासाठी म्हणून भेटलो तेव्हा आम्ही दोघांनीही तिशी पार केली होती. वयामुळे आलेला समजूतदारपणा होताच, शिवाय जोडीदारामध्ये कोणते गुण आवश्यक आहेत तेही मनाशी पक्कं झालं होतं. विनयाला तिच्या कामाचा आदर करणारा जोडीदार हवा होता, तर माझी पत्नी ही माणूस म्हणून उत्तम असली पाहिजे, ही माझी अपेक्षा होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करीत होतो. त्यामुळे ‘स्थळ’ म्हणून एकमेकांना भेटल्यानंतर आमच्या आणखी दोन-तीन भेटी झाल्या आणि आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.’’ रुधील जंगले यांनी मोजक्या शब्दांमध्ये पहिली भेट ते लग्नाचा निर्णय हा प्रवास मांडला.

मुंबईमधल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आणि बाहेरही प्राणीविषयक अनेक धाडसी रेस्क्यू ऑपरेशन्स पार पाडणाऱ्या डॉ. विनया जंगले या मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यतल्या, खेड गावच्या. शेळके कुटुंबातल्या विनया या चार भावंडांमधल्या सर्वात मोठय़ा. त्या त्यांच्या जडणघडणीच्या काळाबद्दल सांगतात, ‘‘माझे वडील पोस्टामध्ये कारकून होते तर आई शिक्षिका. माझे वडील प्रगत विचारांचे होते. त्यांनी मला दहावीपासूनच स्वत:चं करिअर निवडण्यासाठी प्रोत्साहन दिलं. प्राण्यांबद्दल मला आधीपासूनच आपुलकी होती. आमच्याकडे म्हशी होत्या, त्यांना गरज पडली तर जनावरांचे डॉक्टर सहजासहजी उपलब्ध होत नसत, त्यामुळे प्राण्यांचे हाल होत. मी हे सर्व बघत मोठी झाले होते. त्यामुळे जेव्हा करिअरचा विचार आला तेव्हा आपण या क्षेत्रात जावं असं वाटायला लागलं. आमच्या जवळच दापोलीला कृषी विद्यापीठ आहे. तिथे जाऊन या विषयाची माहिती घेऊन आले, आणि मग आपल्याला हेच करायचं असा निर्णय घेतला. त्या वेळी लहान गावामध्ये हे सर्वाना विचित्र वाटत होतं.  प्राण्यांच्या डॉक्टरला काहीच प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे एका मुलीनं असा विचार करणं हे काही आमच्या नातेवाइकांना पटत नव्हतं. पण माझे आई-वडील माझ्या पाठीशी उभे राहिले. विशेषत: माझे वडील नेहमीच मला भक्कम पाठिंबा आणि प्रोत्साहन द्यायचे. त्या आधारावरच मग मी शिकायला मुंबईला आले. तिथे हॉस्टेलवर राहून १९९२-९७ या कालावधीमध्ये मी बीव्हीएससी हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर मी लेक्चरर म्हणून सहा महिने नोकरीसुद्धा केली. पण तेवढय़ावरच राहायचं नव्हतं, म्हणून पुढे गुजरातला जाऊन एमव्हीएससीला प्रवेश घेतला, ती बाब तर अनेकांच्या पचनी पडत नव्हती. पण घरचे सोबत असल्यामुळे मला काळजीचं कारण नव्हतं.’’

‘‘१९९९ मध्ये माझं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मी अलिबागला पशुधन विकास अधिकारी म्हणून रुजू झाले. मी तिथे जवळपास पाच वर्षे होते. नंतर घरच्यांनी लग्नासाठी मुलं बघायला सुरुवात केली, तेव्हा मुलांच्या मानसिकतेचे धक्के बसायला लागले. बहुतेक जण जुने, पारंपरिक पद्धतीने विचार करणारेच होते. मी नोकरीनिमित्त अलिबागला राहत होते, आई-वडील खेडला होते. भेटायला येणारी मुलं लगेच माझ्या नोकरीसंबंधी अटी घालायला सुरुवात करायची. माझ्या ठिकाणीच नोकरी करावी लागेल, नोकरी सोडावी लागेल अशा त्यांच्या मागण्या असायच्या. लग्नानंतर थोडीफार तडजोड सगळ्यांनाच करावी लागते हे मला मान्य होतं, पण इथे लग्नाची बोलणीच तडजोडींच्या, त्याही मी करायच्या तडजोडींच्या अटींनी सुरुवात व्हायची. त्यामुळे इथे आपल्या कष्टाची काही कदर नाही हे लगेच माझ्या लक्षात यायचं, त्या मुलांची प्रवृत्ती लक्षात यायची आणि मी त्यांना नकार द्यायचे. असे बरेच अनुभव आले होते. रुधीलचं स्थळ ओळखीतून आलं होतं. त्यांना भेटल्यावरच हा माणूस वेगळा विचार करतो हे लक्षात आलं. माझी नोकरी, माझं क्षेत्र त्यांना मान्य होतं. आमची मतं, आवडी-निवडी जुळल्या. त्यांना संगीताची आवड होती, मला वाचनाची. मुख्य म्हणजे मला नवरा हा चांगला मित्र हवा होता. एकदा नवऱ्याशी मैत्री असली की सगळ्यातून निभावून नेता येतं असं माझं मत होतं. मग घर किती मोठं आहे, किंवा किती पैसे कमावतो आहे या गोष्टी गौण ठरतात. कारण त्यामध्ये काही कमतरता असतील तर त्या भरून काढता येतात, स्वभाव बदलता येत नाही. रुधील माझ्या सर्व विचारांमध्ये बसत होते, त्यामुळे मी लग्नाला होकार दिला आणि दोन महिन्यांमध्येच म्हणजे जून २००४ मध्ये आमचं लग्न झालं.’’

रुधील त्यांच्या लग्नानंतरच्या जीवनाविषयी सांगताना म्हणाले, ‘‘आमचं घर जुहूला होतं. ते घर थोडं लहान होतं आणि पाण्यासारख्या काही गैरसोयी होत्या. लग्नानंतर आम्ही वर्षभर तिथेच राहिलो. मुलाच्या जन्मानंतर बोरिवलीला राहायला गेलो. विनया गोरेगावला आरे कॉलनीमध्ये क्वालिटी कंट्रोल लॅब या सरकारी प्रयोगशाळेत कामाला लागली होती. तिथे संशोधनाचं काम चालायचं. अलिबागला असताना तिला लहान-मोठय़ा जनावरांची तपासणी करावी लागायची. इथे गोरेगावला प्राणिज उत्पादनांच्या तपासणीचं काम होतं. साधारण कार्यालयीन वेळेची नोकरी होती. त्यामुळे फार काही दगदग नव्हती. आमची, खरं तर तिची, खरी ओढाताण सुरू झाली ती २००५मध्ये आमच्या मुलाच्या, नीलच्या जन्मानंतर. त्यानंतर ती गोरेगावला संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये रुजू झाली. इथल्या कामाला काळवेळ काहीही नसायचा. रात्री-अपरात्री कधीही रेस्क्यू ऑपरेशनसाठी फोन यायचा. मी आयटी सेक्टरमध्ये असल्यामुळे माझी अनेकदा नाइट शिफ्ट असायची. नील लहान होता, त्याला एकटं घरी ठेवता येत नसे, त्यामुळे ती अनेकदा त्याला सोबत घेऊन जायची. तेव्हा गाडीमध्ये मागच्या सीटवर नीलला झोपवलेलं असायचं, त्याच्यासोबत तिच्या कार्यालयातलं कोणी तरी असायचं, आणि इकडे ही जंगलामध्ये रेस्क्यू ऑपरेशनमध्ये असायची. नाही म्हटलं तरी ते तणावाचं काम होतं. मला शक्य असेल तेव्हा मी ऑफिसमधून लवकर निघून नीलला सांभाळायचो. पण कधी कधी मला निघता यायचं नाही. तिची ओढाताण व्हायची पण सगळं निभावून नेलं. आजही ते दिवस आठवले की आश्चर्य वाटतं. पण तेव्हा त्याचा बाऊ  केला नाही. जसा प्रसंग यायचा तसा त्याला आम्ही तोंड द्यायचो.’’ त्या दिवसांबद्दल विनया सांगतात की, ‘‘मुळात नॅशनल पार्कमधल्या जनावरांसंबंधी काम असल्यामुळे वेळ हा घटक गृहीत धरताच यायचा नाही. खूप आठवणी आहेत, एक प्रसंग अजूनही आठवतोय. एक वाघीण बाळंत होणार होती, तिच्या बाळंतपणासाठी मला रात्री फोन आला. तेव्हाही मी नीलला सोबत घेऊन गेले. तेव्हा वाघिणीच्या पिंजऱ्याजवळ एक खोली होती. त्या खोलीमध्ये मी लहानग्या नीलला ठेवलं होतं. तिथे तो झोपला होता आणि इथे मी वाघिणीचं बाळंतपण करत होते. नील तर वाघांच्या आणि बिबटय़ांच्या पिल्लांशी खेळतच मोठा झाला असं म्हणता येईल. इथे येणाऱ्या समस्यांकडे आम्ही अडचणी म्हणून पाहण्यापेक्षा आव्हान म्हणूनच पाहिलं. रुधीलनाही यामध्ये इतका रस निर्माण झाला होता की, कधी कधी सुट्टी असली तर तेही यायचे रेस्क्यू ऑपरेशनसाठी. आम्हाला तर काय जितकी माणसं मदतीला मिळतील तितकी हवीच असतात. कधी कधी जिवावरचे प्रसंगही उद्भवतात. उरणमध्ये एका दुमजली पडक्या घरामध्ये बिबटय़ा शिरला होता. तिथे प्रसार माध्यमांनी  आणि लोकांनी खूप गर्दी केली होती. आम्ही सांगूनही गर्दी हटत नव्हती. त्यातच आमचं काम सुरू झालं आणि त्यातच बिबटय़ानं मागून माझ्यावर झेप घेतली. सुदैवानं आमच्या सोबत असलेला शार्दूल वारंग हा  एनजीओचा स्वयंसेवक सतर्क होता आणि त्यानं मला वाचवलं. एकदा भांडुपमध्ये मशिदीत बिबटय़ा शिरला, तेव्हा आम्ही कारच्या शोरूममध्ये कोणती कार विकत घ्यायची ठरवत होतो. तेव्हा फोन आला आणि मला लगेच निघावं लागलं. या सर्व दिवसांमध्ये रुधील यांचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण ते नीलजवळ असल्यामुळे मी निर्धास्तपणे माझं काम करू शकायचे.’’

यावर रुधील म्हणतात की, ‘‘खरं तर मी फार काही केलं असं मला वाटत नाही. मी फक्त पाठिंबा देत होतो, तिच्यासोबत होतो. बाकी सर्व व्यवस्थापन तिचंच होतं. आव्हानं जशी येतील तशी स्वीकारायची असा तिचा स्वभाव आहे. दिवसा किंवा रात्री कधीही रेस्क्यू ऑपरेशनसाठी जाताना ती त्यावर विचार करत बसत नाही. मला मात्र सुरुवातीला भीती वाटायची. मी तिला फोन करून चौकशी करायचो. नंतर सवय झाली. अनेक बाबतीत तिचं वेगळेपण आहे. ती बाइकवरून कामाला जायची. अनेकदा मी तिच्या पाठीमागे बसतो. त्यामध्ये मला काही कमीपणा आहे, असं वाटत नाही. लग्न झालं तेव्हा मला तिच्या कामाबद्दल फारशी माहिती नव्हती. हळूहळू मला त्यातले बारकावे कळायला लागले. एकमेकांना अवकाश देणं महत्त्वाचं असतं, ते आम्ही कामाच्या बाबतीत एकमेकांना देतो. त्यामुळे कामं अधिक चांगली होतात असं मला वाटतं. तिच्या कामाचा प्रभाव आमच्या मुलावरही पडला आहे. नील आता सातवीमध्ये आहे. त्याला पक्षी निरीक्षणाचा छंद आहे. अनेक प्रकारचे पक्षी त्याला ओळखता येतात, त्यांच्या शिटय़ांवरूनही तो पक्षी ओळखतो, त्याला स्वत:ला पक्ष्यांचे आवाज काढता येतात. फुलपाखरांचंही त्याला वेड आहे.’’

नेहमीच्या चाकोरीपेक्षा वेगळं काम करताना काही अडचणी येऊ  शकतात. पण त्यावर मात करूनही सामान्य, चारचौघांसारखं आयुष्य जगता येतं. त्याबद्दल विनया सांगतात की, ‘‘आम्हा तिघांनाही फिरण्याची खूप आवड आहे. मला जंगलं आणि प्राणी आवडतातच, पण रुधील आणि नीललाही त्याची आवड आहे. देशात निरनिराळी अभयारण्यं, जंगलं, नॅशनल पार्क बघायला आम्ही जात असतो. कधी कधी आमचे नातेवाईकही सोबत असतात. सुरुवातीला माझ्या सासरी माझ्या कामाबद्दल फारशी माहिती नव्हती. पण कधी वृत्तपत्रामध्ये नाव आलं की माझ्या सासूबाई कौतुकाने त्यांच्या सर्व मैत्रिणींना दाखवायच्या. त्या स्वत: नोकरी करत होत्या. त्यामुळे त्यांनी शक्य होईल तशी मदतच केली मला. माझा  स्वत:चा देव-धर्मावर फार विश्वास नाही. अनेकदा मी सणांना नसतेसुद्धा. पण त्यामुळे फार काही अडत नाही. आपल्या कामातून समाजामध्ये चांगला बदल घडवणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं.’’ मुलींनी लग्न करताना स्वत:च्या मतावर ठाम राहायला हवं, तसं केलं तर पुढच्या आयुष्यातल्या समस्या नक्कीच कमी होतात, नको त्या अटींपुढे मान तुकवून स्वत:ची किंमत कमी करून घेऊ  नका, असा सल्ला विनया जंगले सर्व तरुण मुलींना देतात. त्यांचं स्वत:चं आयुष्य पाहता हा सल्ला किती मोलाचा आहे ते वेगळं सांगण्याची गरज नाहीच.

निमा पाटील

nima_patil@hotmail.com

First Published on December 2, 2017 12:48 am

Web Title: the success story of rudhil and vinaya jangle