आतापर्यंत झालेल्या घटनांना फारसे महत्त्व नव्हते. खरी अग्निपरीक्षा तर पुढेच होती, ती डिक्टेशनची. स्टेनोग्राफरीची माहिती नसणाऱ्यांसाठी इथे थोडेसे सांगावेसे वाटते. इतर कोणत्याही लेखी परीक्षांपेक्षा ही परीक्षा फारच कठीण असते. समजा, १०० विद्यार्थी स्टेनोग्राफी शिकण्यासाठी येतात. परंतु चिकाटी नसल्यामुळे त्यातले ६० जण काही दिवसांतच शिकणे अर्धवट सोडून जातात. आणि फक्त ७ ते १० टक्केच उमेदवार ही परीक्षा पास होतात. मी स्वत: सात वेळा (दर तीन महिन्यांनी होणाऱ्या) या परीक्षेला बसलो होतो. १०० च्या स्पीडने दहा मिनिटे डिक्टेशन असे. त्यासाठी रेडिओवर बातम्या वाचणारे डिक्टेशन देत. मग हे १००० शब्द केवळ ४० मिनिटांत टाईप करायचे. फक्त दोन टक्के चुका माफ असत. स्टेनोग्राफीत २६ आद्याक्षरे केवळ आडव्या, उभ्या, तिरक्या, बारीक, जाड रेषांवर आधारित असतात. यात बुद्धीचा सुयोग्य वापर आणि संबंधित विषयाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. आताच्या पिढीला माहीत नसेल, पण पूर्वी टेलिग्राम ‘टक, टक’ या संकेतावर जात असत. त्यात ‘काका अजमेर गए’चे ‘काका आज मर गए’ असे भीषण विनोदही होत. ‘बेड्स अ‍ॅन्ड शिट्स वेअर सप्लाइड टू दी हॉस्पिटल’ ऐवजी ‘बुट्स अ‍ॅन्ड शूज वेअर सप्लाइड टू दी हॉस्पिटल’ असे विनोदही आऊटलाइन एकच असल्यामुळे होत असत. असो.

..जवळपास दीड महिन्यात ६० च्या आसपास डिक्टेशनची पत्रे साचली होती आणि त्यासाठी भरपूर वेळ हवा होता. मुख्यमंत्र्यांच्या निवासी पीएला विचारून रविवारी सकाळी साडेनऊला ‘सह्य़ाद्री’ या त्यांच्या निवासस्थानी गेलो. त्यावेळी माझ्या मनात काय उलथापालथ चालली होती, हे आता शब्दांत सांगणे अवघडच. मी आल्याचा निरोप आत दिला. रविवार असल्यामुळे मोजकेच लोक भेटणारे.. तेही महत्त्वाचे होते. साडेअकराच्या सुमारास मला आत बोलावण्यात आले. मुख्यमंत्री सोफ्यावर बसले होते. थोडे अंतर ठेवून मीसुद्धा बसलो. द्विभाषिक राज्याच्या विद्वान, कुशल मुख्यमंत्र्यांच्या शेजारी थोडा वेळ का होईना, बसावयास मिळाले हे कमी होते का? पत्रांचे मनन मी आधीच केले होते. पत्रे त्यांच्या हातात दिली. पत्रावर एक नजर फिरवून ते डिक्टेशन देत होते. माझा हात थोडासा कापत होता. कारण मुख्यमंत्र्यांचे माझे ते पहिलेच डिक्टेशन होते. तेही सराव नसतानाचे! माझी अवस्था पाहून मुख्यमंत्री थोडे हळूच डिक्टेशन देत होते. शब्द ऐकू आला नाही तर मी परत विचारत होतो. पण असे दोन-तीन वेळा झाल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, असे विचारण्याने त्यांची लिंक तुटते. जवळपास २०-२२ पत्रे बरीच जुनी झालेली असल्यामुळे या ना त्या कारणाने बाजूला गेली. बाकी ३६ पत्रे ३०-३५ मिनिटांत त्यांनी डिक्टेट केली. पत्रे ‘शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट, टू दी पॉइंट’ अशी होती! प्रत्येक पत्राचे उत्तर तीन ते सात-आठ ओळीपर्यंत होते. काम आटोपून बंगल्यातून बाहेर पडल्यावर खरं तर मला खूप भूक लागली होती. किंचित दूर असलेल्या बसस्टॉपवर मी बसलो आणि पहिल्या प्रथम ती सर्व पत्रे लाँग हँडमध्ये दोन तास खर्च करून लिहून काढली. कारण उद्यापर्यंत आऊटलाइन कोणत्या शब्दाची आहे, हे मी विसरण्याची खात्री होती. दोन वाजता बसने व्हीटीला पोहोचल्यावर शांत मनाने पोटभर जेवण करून मी घरी गेलो.

दुसऱ्या दिवशी थोडा लवकर ऑफिसला जाऊन प्रथम सर्व पत्रे टाईप करून मराठी पीएंना नजर टाकण्यास दिली. त्या रात्री मी स्वस्थ झोपू शकलो नाही. माझ्या भविष्याची आधारशिला त्यावर अवलंबून होती. मनात धाकधूक होती, की पत्रांत चुका तर झाल्या नसतील ना? सुदैवाने सर्व पत्रे एकही दुरुस्ती न होता परत आली. यामुळे एक गोष्ट झाली, ती म्हणजे माझा आत्मविश्वास वाढला. पण अजूनही शाश्वती नव्हती. ती आली, तीन-चार वेळा याची पुनरावृत्ती झाल्यानंतरच. डिक्टेशन झाले की चार-पाच दिवस चांगले जात; पण नंतर जीव रडकुंडीला येई. कारण डिक्टेशनसाठी मुख्यमंत्र्यांकडून वेळ काढणे अवघड होते. त्यांची दिनचर्याच तशी होती. दोन घास खाण्यासाठी त्यांना जेमतेम वेळ मिळत असे. त्यांचा बंगला तळमजला आणि पहिला मजला असा होता. तळमजल्यावर ४०-५० लोक बसतील असा हॉल आणि काही बेडरूम्स, तर पहिल्या मजल्यावर १०० लोक बसतील एवढा मोठा हॉल आणि मुख्यमंत्र्यांच्या घरातील मंडळींसह त्यांचे राहण्याचे निवासस्थान. खाली जनता दरबार असे. सकाळी ९.३० च्या सुमारास ते खाली येत. यशवंतराव सर्वाना भेटून त्यांची गाऱ्हाणी शांतपणे ऐकून घेत. त्यात कोणी महत्त्वाची व्यक्ती वा कार्यकर्ता असेल तर त्यांना बाजूच्या खोलीत बसण्यास सांगत. यात जवळपास अर्धा तास जात असे. १०.१५ ला ते ऑफिससाठी निघत. साडेदहाला ऑफिसात पोहोचल्यावर भेटीगाठीस सुरुवात होत असे. बाहेरून आलेले सरकारी अधिकारी त्यात असत. सर्वाना वेळ दिलेली असल्यामुळे एकामागे एक नंबर लागलेले असत. यामुळे डिक्टेशनसाठी वेळ मिळण्याची शक्यता नसे. पण एखादा जर उशिरा आला तर मुख्यमंत्र्यांचा चपराशी मला पटकन् बोलावून आत सोडत असे. त्या वेळात काही पत्रे तरी होऊन जायची. महत्त्वाचे म्हणजे माझी हजेरी लागायची. दोनला जेवायला जाऊन ते चारला परत येत आणि सातपर्यंत सरकारी बैठका, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या भेटी. सातला परत ते घरी जात. मग डिक्टेशनसाठी एकच मार्ग उरायचा. तो म्हणजे- मलबार हिल ते मंत्रालयापर्यंतचा त्यांचा मोटारचा प्रवास. मी ८-१० दिवसांनंतर साडेनऊला बंगल्यावर जात असे. मुख्यमंत्री गाडीत बसले रे बसले की दुसऱ्या बाजूने मी आत जाई. नंतर निवासी पीए माझ्या बाजूने. दोघेही अंगाने चांगले असल्यामुळे मी मध्ये अगदी ‘फिट’ बसत होतो. ‘टाइटन युवर सीट बेल्ट’ करावयाची आवश्यकताच भासत नव्हती. चालत्या मोटारीत डिक्टेशन घेणे फार अवघड होते; पण पर्याय नव्हता. मुंबईकरांना माहीतच आहे, की तो मार्ग किती वळणाचा आहे. त्याकाळी पायलट कार नसल्यामुळे स्पीडमध्ये असलेली गाडी ओव्हरटेक करताना बरीच हलत असे. डिक्टेशनसाठी पत्र देताना मला मग एक युक्ती करावी लागे. महत्त्वाची पत्रे मी वर ठेवत असे. मंत्रालयात उतरेपर्यंत पत्र अर्धे झाले असले तर मुख्यमंत्र्यांबरोबरच त्यांच्या चेंबरमध्ये जात असे आणि सर्व पत्रे पूर्ण झाल्यावरच उठत असे. पण कधी कधी मांजर आडवे जात असे. काही वेळा सकाळी भेटणाऱ्यांमध्ये एखादी व्यक्ती अशी असे, की तिला मुख्यमंत्री सोबत गाडीत बसण्यास सांगत. तेव्हा माझा चेहरा क्विनाइन घेतल्यासारखा होई. पण एक गोष्ट मान्य करावीच लागेल. ती म्हणजे- मी लहान असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जमादारांचे (चपराशी) साहाय्य मला मिळत असे. पत्रातील अनेक विषयांची माहिती मला होत असे. मराठीतून पत्रे लिहावीत ती यशवंतरावांनीच. संग्रही ठेवावी अशीच ती पत्रे होती. दुर्दैवाने हा ठेवा मुंबईतच राहिला. या पत्रलेखनाचा मला पुढे फार फायदा झाला.

या रटाळ विवेचनात थोडा विरंगुळा म्हणून डिक्टेशनसंबंधीची एक सत्यकथा सांगतो. एका मोठय़ा देशाच्या राष्ट्रपतींकडे एक नवीन स्टेनोग्राफर आला होता. त्याला त्यांनी एक-दोन पत्रे डिक्टेट केली. त्याने ती टाईप करून सहीला पाठवली. पत्रे सही करून तर आली; परंतु त्यात त्यांनी हाताने एक-दोन शब्द लिहिले होते. स्टेनोग्राफरने पुन्हा ते टाईप करून पुन्हा सहीला पाठवले, तरी तेच! पुन्हा त्यात दोन शब्द हाताने लिहून सही करून आले. त्याने तिसऱ्यांदा ते टाईप करून राष्ट्रपतींकडे पाठवले आणि सोबत आपल्याला आपल्या खात्यात परत पाठवण्याचे विनंतीपत्रही! राष्ट्रपतींनी त्याला बोलावले. तो आपल्याला त्यांचे आता दोन शब्द ऐकावे लागतील म्हणून घाबरतच आत गेला. त्यांनी त्याला विचारले, की तो का परत जाऊ इच्छितो? तो म्हणाला, आपले डिक्टेशन मला जमत नाही. पत्र करेक्ट करण्यात आपला वेळ जातो. त्यावर राष्ट्रपती म्हणाले, ‘मी तुम्हालाच बोलावून सांगणार होतो, की मी सही केली याचा अर्थ ते पत्र पाठवायचे. तुम्ही का परत टाईप करता? त्या पत्रात तुमची चूक नसून, मी मुद्दाम एक-दोन शब्द हाताने लिहितो; जेणेकरून पत्र पाठवणाऱ्याला वाटले पाहिजे की मी ते पत्र वाचून सही केली आहे.’

तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांकडे स्टेनोग्राफर म्हणून गेल्याची बातमी ऑफिसमधील लोकांशिवाय कोणालाच माहीत नव्हती. आई-वडिलांनाही मी ती सांगितली नव्हती. नेहमीप्रमाणे पाच-सहा दिवसांसाठी दिवाळीच्या निमित्ताने नागपूरला गेलो असताना ही आनंदाची बातमी मी त्यांच्या कानावर घातली. मॅट्रिक पास होईल की नाही, अशी शंका असलेला आपला मुलगा मुख्यमंत्र्यांकडे कामासाठी जातो याचा झालेला आनंद आई-वडिलांच्या डोळ्यात पाहून आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मला मिळाले. दोन दिवसांत सर्वाना ही बातमी कळली आणि अभिनंदनासाठी नातेवाईक, मित्रमंडळी येऊ लागली. बहुतेकांनी एकच प्रश्न विचारला, ‘तुझी कोणी शिफारस केली?’ त्यानंतरही कित्येक वर्षे अनेकांनी हा प्रश्न मला विचारला. दुसरा प्रश्न : त्यांनी तुझी निवड कशी केली? परंतु या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत तरी मला मिळालेली नाहीत.

‘कोण होतास तू, काय झालास तू..’ या प्रगतीच्या वाटचालीची पहिली पायरी पक्की झाली होती. मिळालेला आत्मविश्वास वाढत गेलेल्या पुढील जबाबदारीसाठी उपयोगी पडत गेला. साहजिकच आव्हान स्वीकारण्याची प्रवृत्ती माझ्या अंगी निर्माण झाली. कोणाचीही शिफारस वा वशिला नसताना यशवंतराव चव्हाण, मोहन धारिया, वसंतराव साठे, पी.व्ही. नरसिंह राव यांच्या आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या छत्रछायेखाली मी ४६ वर्षे काढली. सर्वाना आजवर मी एकच सांगतो.. ‘मृत्यू जसे एक सत्य आहे, तसेच देव (एक शक्ती) आणि दैव पण सत्य आहे.’ हा प्रवास कधी कधी खडतर असूनही सुखावह ठरला. या काळात भेटलेली असंख्य माणसे, त्यांचे स्वभाव, वागणूक मी जवळून अनुभवली. कधी क्वचित किळसवाणे प्रकारही अनुभवले. मंत्र्यांचे आनंदाश्रू पाहिले. तसेच कधी त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या गंगा-यमुना पाहण्याचे दुर्भाग्यही नशिबी आले. खरं तर ज्यांच्यासोबत काम केले त्यांचा उल्लेख ‘साहेब’ म्हणून करावयास हवा, पण वाचकांच्या सोयीसाठी त्यांच्या नावाने करीत आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल बहुतेकांना उत्सुकता असते, हे मी अनुभवले आहे. विशेषत: पंतप्रधानांची दिनचर्या, प्रवास, सुरक्षितता, भेटीगाठी, विदेश दौरे, वगैरेबद्दल. सर्वसामान्यांची ही उत्सुकता कमी करण्याचा (राजकारण सोडून) माझा प्रयत्न आहे. दिवसाचे २४ तास सर्वासाठी उपलब्ध असताना ‘वेळ नाही’ ही सबब नेहमी सांगणारे आपण! मग या लोकांना देशाचा कारभार सांभाळून कुटुंबासाठी वेळ कसा मिळतो? याची उत्सुकता प्रत्येकाला असते. हे करत असताना काही संबंधित  व्यक्तिमत्त्वांबद्दल सविस्तरही सांगावे लागेल. कारण ती सर्वसाधारण माणसे नाहीत.

– राम खांडेकर

ram.k.khandekar@gmail.com