12 July 2020

News Flash

मासिकांतून उमटले शोषित जीवन

‘बायजा’ हे मासिकाचे नावच ग्रामीण स्त्रीच्या जीवनाचे प्रतीक म्हणून ठरवले होते.

तळागाळातील, तसेच कष्टकरी स्त्रियांनाही मुख्य प्रवाहात सहभागी करून घ्यायचे असेल तर त्यांच्याबरोबर स्वतंत्रपणे संवाद साधला पाहिजे. ही जाणीव १९७९ च्या परिषदेत झाली. त्यानंतर कष्टकरी, मुस्लीम, परित्यक्ता, बलात्कारित स्त्रियांच्या प्रश्नांचा मागोवा घेऊन ते सर्वासमोर वेगवेगळ्या मासिकांतून मांडले गेले.

‘स्त्रीमुक्तीच्या’ संकल्पनेत तळागाळातील, तसेच सर्वसामान्य कष्टाच्या कामात श्रमणाऱ्या स्त्रियांनाही सहभागी करून घ्यायचे असेल तर त्यांच्याबरोबर स्वतंत्रपणे संवाद साधला पाहिजे. ही जाणीव १९७९ च्या परिषदेत लख्खपणे झाली. त्यामुळेच स्त्रीवादी विचारांच्या नवपर्वात विविध सामाजिक स्तरावरील स्त्रीजीवनाशी चाकोरी बाहेरील, स्त्रीजीवनातील काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या निमित्ताने थेट संवाद सर्वानीच विविध प्रकारे जाणीवपूर्वक केला. ‘स्त्री’ मासिकापासून ते ‘मिळून साऱ्या जणी’तील ‘मैतरणी ग मैतरणी’पर्यंतच्या संवादातून एक गोफच विणला गेला.

‘बायजा’ हे मासिकाचे नावच ग्रामीण स्त्रीच्या जीवनाचे प्रतीक म्हणून ठरवले होते. मासिकामागील आपला उद्देश स्पष्ट करताना सौदामिनी राव यांनी म्हटले, ‘‘स्त्रियांच्या प्रश्नांचा आणि मुक्तिमार्गाचा वेध घेताना ग्रामीण, कष्टकरी, दलित स्त्री ‘बायजात’ केंद्रभूत मानण्यात आली. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांच्या समस्या पुढे आणण्यासाठी ‘स्त्री’, ‘माहेर’ यासारखी नियतकालिके निघाली होती. पददलित स्त्रियांच्या प्रश्नासाठी व्यासपीठ निर्माण करणे, हा ‘बायजा’चा मुख्य उद्देश होता.’’ ‘महिला आंदोलन पत्रिका’च्या संपादक तारा रेड्डी, मीनाक्षी साने यांनीसुद्धा लिहिले होते, ‘‘पत्रिका कोणासाठी काढली? तर अर्धनिरक्षर भगिनींसाठी आणि त्यातही कष्टकरी वर्गातील इतर सुशिक्षित व सधन भगिनींसाठी मराठीत पुष्कळ मासिके आहेत. पण या भगिनींसाठी खास मासिके नाहीत. म्हणून ही सुरू केली.’’ संपादकीय दृष्टिकोनाची प्रतिबिंबे मासिकांतून उमटण्यास सुरुवातही झालीच.

‘स्त्री’ मासिकाने मे ७७ पासून श्रमिक स्त्रियांच्या मुलाखतींतून त्यांचे जीवन, प्रश्न उलगडून दाखवले. डबाबाटलीवाल्या, सुया-बिब्बे विकणाऱ्या स्त्रिया, बोहारणी, बिडय़ा वळणाऱ्या स्त्रिया, सफाई कामगार स्त्रिया यांसारख्या कष्टकरी स्त्रियांचाच समावेश होता.
नवऱ्याचे दारूचे व्यसन हा ग्रामीण स्त्रियांचा महत्त्वाचा समान प्रश्न, पतीच्या व्यसनाचे परिणाम स्त्रियांना, सर्व कुटुंबालाच सहन करावे लागतात. ताणतणाव तर रोजचेच. ‘बायजा’ने पहिलाच अंक ‘दारूबाजी : एक सामाजिक समस्या’ या विषयावर काढला. व्यसनाची कारणे, होणारे परिणाम याचा शोध घेतला. ‘आदिवासी स्त्री आणि दारू’, ‘दारू विरुद्ध स्त्रीशक्ती जेव्हा उभी ठाकते’ या सारख्या लेखांतून स्त्रियांना प्रतिकारासाठी चालना दिली. स्त्रियांच्यात आत्मविश्वास येऊन ग्रामीण स्त्रिया एकत्र आल्या. धुळ्यासारख्या ठिकाणी दारूच्या गुत्त्यांची झडती घेतली. सामानाची मोडतोड केली. गावागावांतून ‘दारूबंदी कमिटय़ा’ स्थापन केल्या. मुलांना हाताशी धरून स्त्रिया गुत्त्याची माहिती काढून घेत आणि नंतर एकत्र येऊन हल्ला करीत. एकीकडे स्त्रिया प्रतिकाराला सिद्ध होत असताना झगडेबाई आपले समाधान व्यक्त करीत होत्या, ‘‘माज्या नवऱ्यानं सोडलिया दारू गं। स्त्रीमुक्ती मला पावली गं।’’ याप्रमाणेच ‘दलित स्त्री’ विडी कामगार, परिचारिका, देवदासी, परित्यक्ता, इतकेच नव्हे तर वेश्यांच्या प्रश्नांचा मागोवाही ‘बायजा’ने घेतला. जोडीला सावली समर्थ यांचा ‘स्त्री अबला कशी बनली’ हा ऐतिहासिक आढावा घेणारा लेखही प्रसिद्ध केला. प्रत्येक विषयाचे सामाजिक स्वरूप, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, स्त्रियांच्या जीवनावर होणारे परिणाम, त्यातून स्त्रियांनी बाहेर पडण्यासाठी केलेले प्रयत्न, प्रसंगी मार्गदर्शन, संघटनेचे महत्त्व समजावून देणे इत्यादी दिशांनी विषय समग्र स्वरूपात वाचकांसमोर ठेवला जाई.

‘स्त्री उवाच’मधील लेखात छाया दातार यांनी स्त्रियांचे प्रश्न वेगळे असल्याचे जाणवल्याने प्रश्नांचा स्वतंत्रपणे वेध घेतला. विडी कामागार स्त्रिया जागरूक कशा होत आहेत. ‘युनियन’ आर्थिक प्रश्न सोडविण्याची जागा नसून जीवन सुधारण्याची संधी, हे संबंधित स्त्रियांना कसे जाणवले होते. बालवाडी, पाळणाघरे यांची मागणी कामगार स्त्रिया कशा करीत होत्या. या अंगाने विडी कामगार स्त्रियांचा प्रश्न विचारात घेतला. ‘युनियन’ची जाणीव स्त्रियांमध्ये होणे महत्त्वाचे असल्याचे छाया दातार यांनी सूचित केले. ‘अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांच्या युनियन हा अनुभव अनेक ठिकाणी मार्गदर्शक ठरण्याजोगा आहे. निपाणी येथील चळवळ स्त्रीमुक्तीचा एक भाग आहे हे निश्चित. मात्र स्त्रीमुक्तीची दिशा डोळसपणे, सजगतेने येथील चळवळीला मिळाली तर मोलाची भर पडेल.’’

बांधकामावर मजुरी करणाऱ्या स्त्रियांना कामाची अनिश्चितता व पुरुषांपेक्षा काही कारण नसताना मिळणारी कमी मजुरी हे महत्त्वाचे प्रश्न होते. स्त्रियांना कामातून वगळण्याकडेच कल जास्त असतो. प्रत्येक राज्यात प्रश्नांचे स्वरूप सारखेच असते. तमिळनाडूमध्ये बांधकाम कामगार स्त्रियांनी युनियन कशी उभी केली. कामगारांच्या मागण्यांमध्ये स्त्रियांच्या मागण्यांचा समावेश करायला लावला. समान वेतन, आठ तासांपेक्षा जास्त कामाचा ओव्हर टाइम, कामावर अपघात झाल्यास नुकसानभरपाई, पाळणाघरे सोय, प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता, इत्यादी मागण्यांचे स्त्रियांनी निवेदन चेन्नईच्या शिबिरात कसे सादर केले. ही सर्व हकिगत
मालती गाडगीळ यांनी ‘बांधकाम कामगार चळवळीत महिला आघाडी’ या लेखात देऊन सर्व देशात ही आघाडी उभी राहावी, अशी आशा व्यक्त केली.

दलित स्त्रियांचे प्रश्न विचारात घेताना दलित स्त्रियांचे प्रश्न केवळ कौटुंबिक नसून प्रश्नांना सामाजिक, राजकीय परिमाणे कशी आहेत. ग्रामीण दलित स्त्री, शहरी दलित स्त्री यांचे प्रश्न भिन्न कसे आहेत, या अंगांनी वेध घेतला. अस्पृश्यता निवारणासाठी कायदेशीर प्रयत्न कसे झाले. याचाही वेध हेमलता राईरकर यांनी घेतला. त्याचबरोबर दलित स्त्रियांच्या उन्नतीसाठी झालेल्या प्रयत्नांची दखल घेण्यास संपादक विसरले नाहीत.

धर्म कोणताही असो. धार्मिकता, त्यातून निर्माण झालेल्या समजुती, रूढी इत्यादींनी स्त्रियांचे जीवन नियंत्रित होते. प्रत्येक धर्माने स्त्रीचा दर्जा, स्थान, महत्त्व इत्यादीविषयी कोणता विचार केला आहे. प्रत्येक धर्मातील धार्मिकतेच्या अंगांनी स्त्रीजीवनाचा वेध घेण्यासाठी ‘बायजा’ने १९८२ मध्ये ‘स्त्री व धर्म’ या विषयावरच विशेषांक काढला. धर्माची निर्मिती, इस्लाम, जैन, ख्रिश्चन, हिंदू, नवबौद्ध इत्यादी धर्माच्यामधील ‘स्त्रीविषयक विचारांबरोबर स्त्रीधर्म आणि कायदा’, ‘अंधश्रद्धा आणि स्त्रिया’, ‘पुराणकथांतील स्त्री प्रतिमा’, ‘सवाष्णीचा मृत्यू’ इत्यादी दिशांनाही वेध घेऊन धर्माच्या संदर्भातील स्त्रीजीवनाच्या वास्तवाचे व्यापक चित्र स्पष्ट केले.
आपल्याबरोबरच समाजात वावरणारा ‘बुरख्याआडच्या स्त्रियांचा’ एक स्वतंत्र समूह आहे. या समूहाचे प्रश्न वेगळे आहेत. बुरखा (पडदा), मौखिक तलाक, लग्नात मेहेर देण्याची टाळाटाळ, बहुपत्नीत्व, जोडीला शिक्षणाचा अभाव इत्यादी प्रश्न मुस्लीम स्त्रियांना कायमच अस्वस्थ करीत आले आहेत. मुमताज रहिमतपुरे, रजिया पटेल या सातत्याने लिहीत होत्याच. ‘मुस्लीम सत्यशोधक सामजानेही’ मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले होतेच. ‘इस्लाम आणि स्त्रिया या दीर्घ लेखात ऊर्मिला जोशी यांनी मुस्लीम स्त्रियांच्या परिस्थितीचा, हक्क अधिकाऱ्यांच्या संदर्भात काळाबरोबर कसा बदल होत आला, आज कोणते कायदेशीर अधिकार मुस्लीम स्त्रियांना मिळाले आहेत याविषयी सविस्तर विवेचन केले.

नवऱ्याने टाकलेली स्त्री. त्याला गोंडस नाव दिलं गेलं, ‘परित्यक्ता’. सर्वात उपेक्षित, कारुण्यपूर्ण एकाकी उदास जीवन जगणाऱ्या या स्त्रियांचा वर्ग दीर्घ काळापासून आपल्या समाजात अस्तित्वात आहे. कायदेशीर घटस्फोट न घेताही पुरुष पत्नीचा त्याग करीत असे. सरकारने या स्त्रियांसाठी काही योजना करावी. समाजात त्यांना स्थान मिळावे यासाठी परिषदा, मोर्चे आयोजित केले. ‘सीता’ ही आद्य परित्यक्ता म्हणून ‘सीतेच्या लेकी’ असे संबोधन देऊन छाया दातार यांनी या स्त्रियांना जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. ‘‘विवाह झालाच पाहिजे ही भावना जाण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. ‘टाकलेले’ हा शब्द नाहीसा झाला पाहिजे. याबरोबरच एकटीने जगण्याची हिंमत त्यांच्यात निर्माण केली पाहिजे. यासाठी ‘विवाह’ संस्काराकडे चिकित्सकपणे बघितले पाहिजे. हा पल्ला खूप लांबचा आहे. तोपर्यंत सीतेने वनवासात जे आत्मभान दाखवले ते आत्मभान तिच्या लेकींमध्ये (स्त्रियांमध्ये) रुजले जावे म्हणून धडपड करावी लागेल.’’
‘बलात्कार’ हा स्त्रीला सर्वात जास्त अपमानित करणारा अन्याय आहे. निसर्गाने दिलेली स्त्रीची विशिष्ट प्रकारची देहरचना असल्याने पुरुषाला शारीरिक बळावर स्त्रीवर बलात्कार करता येतो. ‘मिळून साऱ्या जणी’मध्ये मुक्ता मनोहर यांनी ‘पुरुषसत्ताकतेचे दमन हत्यार – बलात्कार’ या लेखात ‘बलात्काराचे’ शस्त्र वेगवेगळ्या पद्धतीने कसे वापरले गेले आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात बलात्काराने थैमान कसा घातला होता. याचा अस्वस्थ करणारा इतिहासच सांगितला आहे.

बलात्काराच्या अन्यायाची जोडणी दुर्दैवाने आपल्या संस्कृतीत चारित्र्य शुद्धता, योनिपावित्र्य, स्त्री अपवित्र होणे, इत्यादी कल्पनांशी केली आहे. त्यामुळे बलात्कारित स्त्री मनाने खचून जाते. कुटुंबात स्वीकार, समाजात पुनर्वसन यासारखे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. ‘बलात्कार’ हा अन्य अपघातांप्रमाणे एक अपघात मानावा. या दृष्टीने नवीन विचार रुजविण्याचा प्रयत्नही समजूनच केला. ८ मार्च १९८० हा दिवस स्त्री संघटनांनी ‘बलात्कारविरोधी दिन म्हणून साजरा केला.

‘गेल्या शतकावर दृष्टिक्षेप’ या लेखात नीरा आडारकर लिहितात, ‘‘आपण स्त्रियांनी बलात्काराकडे एक सर्वनाश म्हणून बघायची दृष्टी थोडी बदलली पाहिजे. ‘बलात्कार’ हा तर निषेधार्हच. आणि बलात्कार करणारा गुन्हेगारच. पण आपल्या पावित्र्याशी आणि चारित्र्याशी त्याचा संबंध लावू देता कामा नये. बलात्कार झाल्यानंतर त्या घटनेला वास्तवाला सामोरे जाऊन आता सन्मानाने पुन्हा आयुष्य जगले पाहिजे. हे सोपे नाही. पण अशा स्त्रियांना आधार देणारी केंद्रे आपल्याकडे निघाली पाहिजेत, महत्त्वाचे म्हणजे मानसिक आधार देणे, जे आपण आजपर्यंत साधू शकलो नाही.

‘बलात्काराविरुद्ध लढताना’ या लेखात वसुधा जोशी म्हणतात, ‘‘बलात्कार आणि स्त्रीचे पावित्र्य या पारंपरिक मूल्यकल्पनेत बदल होणे आवश्यक आहे. इतर अपघातांप्रमाणे हा एक अपघात आहे. इतर आजार किंवा जखमांतून स्त्री बरी होते. त्याप्रमाणे बलात्कारातून स्त्री बरी होते. पावित्र्याच्या कल्पना, अप्रतिष्ठा, कुटुंबाकडून होणारा अस्वीकार यांनी स्त्री खचून जाते. तेव्हा या कल्पना बदलल्या पाहिजेत. कुसुम बेडेकर यांनी या संदर्भात शासकीय प्रयत्न आणि कौन्सिलिंगची आवश्यकता स्पष्ट केली. थेटपणे केलेल्या या संवादातूनच स्त्रीमुक्तीची आवश्यकता, अपरिहार्यता ठसठशीत झाली.
डॉ. स्वाती कर्वे – dr.swatikarve@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2015 1:40 am

Web Title: article on women social issue
Next Stories
1 स्त्री आंदोलनाचा परिवर्तन बिंदू
2 संधिकाळातील प्रकाशरेषा
3 संधिकाळातील दीपस्तंभ
Just Now!
X