सायकलीच्या इतिहासाची पाने उलटल्यास १८१८ ते १८८५ पर्यंतच्या काळात सायकली टप्प्या टप्प्याने विकसित होत गेल्या व आधुनिक म्हणवून घेणारी रोव्हर सायकल १८८५ साली  बाजारात आली व तेच मॉडेल अजूनही टिकून आहे. परंतु गेल्या २० -३०वर्षांत संगणकाधारित प्रारूपात , कमी वजनाच्या परंतु दणकट असे धातू – अधातू वापरून सायकलींचे उत्पादन झाले.स्टीअिरग, ब्रेक्स, ट्यूब – टायर्समध्ये भरपूर सुधारणा झाल्या. शॉक अब्सॉर्बर्स बसवण्यात आले. वेग नियंत्रण व संवेग यांचा ताळमेळ राखण्यासाठी सायकलींच्या मूळ फ्रेममध्ये  बदल करण्यात आले.  शारीरिक श्रम कमी करणाऱ्या गिअरच्या सायकली आल्या. कारमध्ये मावणाऱ्या घडी करण्याजोग्या सायकली आल्या. व याचाच पुढचा टप्पा म्हणजे शारीरिक श्रमाऐवजी इलेक्ट्रिक मोटरचा वापर करणाऱ्या मोटाराइज्ड इ – सायकली आल्या व येत आहेत.
मुळात मोटराइज्ड सायकलीसाठीचे पहिले पेटंट १८९५ मध्ये घेण्यात आले होते. १८९७ च्या अजून एका पेटंटमध्ये दोन मोटर्स वापरण्याचा प्रस्ताव होता. पुढील शंभर वर्षांनंतर याच पेटंटचा वापर करून १९९० मध्ये काही इ – सायकलींचे उत्पादन करण्यात आले. ३०-४० वर्षांपूर्वी पुण्यातसुद्धा काही उत्साही उद्योजकांनी मोटराइज्ड सायकलींचे प्रयोग करून स्कूटरला पर्याय देण्याचा प्रयत्न केलेले काहींना आठवतही असेल. परंतु त्यात डिझाइनचा मागमूसही नव्हता. वापरण्यास त्रासदायक, खíचक व देखभालीसाठी किचकट असलेल्या या ‘गरिबांच्या बाइक्स’ कुठे धूळ खात पडल्या हे कळलेच नाही. खरे पाहता सायकलीचा वापर मुख्यत्वेकरून कमी अंतरावर असलेल्या कामाच्या ठिकाणी ये – जा करण्यासाठी होत होता. यात थोडा फार शारीरिक श्रम व थोडासा वेळ गेला तरी चालण्यासारखा असतो. परंतु प्रचंड शक्तीच्या बाइक्स व स्कूटर्स रस्त्यावर पळू लागल्यामुळे सायकलींचा वापर हळू हळू कमी होऊ लागला. ऊर्जाबचत वा प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नात  आहोत याचा तोंडदाखल्या देखाव्यासाठी काही थातुर मातुर उपाय म्हणून काही शहरात  सायकलीसाठी स्वतंत्र ट्रॅक्स आहेत. परंतु त्याचा वापर बहुतेक ठिकाणी पाìकगच्या  सोयीसाठी  होत असते.
इलेक्ट्रिक-सायकलीसाठींची सर्वात मोठी अडचण ऊर्जा पुरविणाऱ्या बॅटरीची आहे.  बघता बघता बॅटरी ड्रेन होत असल्यामुळे पॅडल मारत सायकल हाकण्याचा प्रसंग सायकलस्वारावर येतो. सायकलीच्या पुढच्या चाकाच्या हबवर  मोटर बसवल्यास पुढच्या चाकाचे वजन वाढते. पंक्चर काढताना अडचणी येतात. गीअर्स बसवल्यास चाक जोडताना/काढताना भरपूर वेळ जातो. काही वेळा मोटराइज्ड सायकलीसाठी पुढील चाकाचा व्यास मोठा ठेवावा लागतो. डिस्क ब्रेक मोटर हबवर बसत नाहीत. अशा प्रकारे इ  – सायकलीच्या अडचणीचा पाढा आणखी वाढवता येईल. म्हणूनच स्कूटरमधील स्टेपनीच्या चाकासारखे याचेही अजून  एक चाक सांभाळावे की काय असा प्रश्न उभा राहतो. तरीसुद्धा मोटराइज्ड सायकलींचे उत्पादन करणारया कंपन्या जगभर पसरल्या आहेत. यासंबंधात गो सायकलीने केलेली प्रगती आश्चर्यकारक ठरेल. रिचर्ड थॉर्प या रेस कार्सच्या डिझायनरने २००४ साली फोल्डेबल सायकलीचे पेटंट घेतले व २००७ मध्ये इ-सायकलीचे पेटंट घेऊन उत्पादन सुरू केले. गोसायकलने इ-सायकलीच्या बहुतेक उणीवावर मात केली आहे असा उत्पादकांचा दावा आहे. पूर्ण चार्ज केलेली बॅटरी २५ कि.मी अंतरासाठी पुरेसे ठरते. बॅटरी ३ तास रिचार्जविना चालू शकते. रिचार्जसाठी कमी ऊर्जा लागते. (१०० वॅटचा बल्ब २ तास वापरल्यास लागणाऱ्या ऊर्जेइतकी) सायकल ताशी २० कि.मी वेगाने पळू शकते. सायकलीची घडी करता येत असल्यामुळे मोटारच्या डिकीत ठेवता येते. सायकलीचा सांगाडा मॅग्नेशियम संमिश्र वापरल्यामुळे वजन हलके (फक्त १६ किलो) झाले आहे . पुढच्या चाकासाठी सिंगल लेग फ्रंट फोर्क वापरल्यामुळे जोडणीस वेळ कमी लागतो. सायकलीचे हँडल, कारमधील डॅशबोर्डसारखे वेग, गीअर्सची स्थिती, बॅटरीतील ऊर्जा इत्यादी सर्व माहिती देते. इलेक्ट्रॉनिक्स वापरून एका क्लिकने गीअर बदलता येतात. श्रीमंत राष्ट्रातच याची किंमत न परवडण्याइतकी असल्यामुळे आपल्या देशात ही सायकल यायला बराच काळ लागेल.