अमेरिकी वैज्ञानिकांना फुलपाखराची नवीन प्रजात सापडली असून त्याच्या डोळ्यांचा रंग ऑलिव्ह सारखा हिरवट आहे. टेक्सासमध्ये ते सापडले आहे. व्हिक्टरीज मिनीस्ट्रीक या नावाने ते ओळखले जात असले तरी त्याचे वैज्ञानिक नाव हे मिनिस्ट्रीमॉन जॅनेव्हायक्रॉय आहे. अमेरिकेत सापडलेली ही फुलपाखराची प्रजात अनेक वेगळी वैशिष्टय़े असलेली आहे. साधारण याच प्रवर्गातील ग्रे मिनीस्ट्रीक ही प्रजात स्मिथसॉनियन कीटक संग्रहालयात ठेवलेली आहे पण त्यांच्या गुणवैशिष्टय़ात फरक आहे. एकतर ग्रे मिनीस्ट्रीकच्या डोळ्यांचा रंग हा गडद तपकिरी किंवा काळा आहे तर व्हिक्टरीज मिनीस्ट्रीकच्या डोळ्यांचा रंग ऑलिव्ह ग्रीन आहे. पंखांवरील पॅटर्न्‍स वेगळे आहेत. उत्तर अमेरिकी फुलपाखरू संघटनेचे अध्यक्ष जेफ्री ग्लासबर्ग यांनी व्हायक्रॉयज मिनीस्ट्रीक या प्रजातीचा शोध लावला व त्याला त्यांनी त्यांची पत्नी जेन व्हायक्रॉय स्कॉट हिचे नाव दिले. व्हायक्रॉय मिनीस्ट्रीक या फुलपाखराबाबतचा शोधनिबंध झुकीज या नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून तो वॉशिंग्टनच्या स्मिथसॉनियन कीटक संग्रहालयाचे क्युरेटर बॉब रॉबिन व ग्लासबर्ग यांनी लिहिला आहे.