नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे अंतरविद्यापीठीय त्वरक केंद्र हे भारतीय वैज्ञनिक अध्यापक व विद्यार्थ्यांमध्येही त्यांच्या संशोधन सहकार्यामुळे प्रसिध्द आहे. या केंद्रातीलच एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अजितकुमार यांनी गेली सात वष्रे ‘फिनिक्स’प्रकल्पाद्वारे सातत्यातने परिश्रम करुन शब्दश खिशात राहील अशी प्रयोगशाळा तयार केली आहे. अर्थात आधुनिक काळाला व टेक्नोसॅव्ही विद्यार्थ्यांना मोहात पाडील अशी ही प्रयोगशाळा संगणकाला, लॅपटॉप व आता टॅब्लेटलाही युएसबी पोर्टच्या मदतीने जोडता येते. या छोटेखानी प्रयोगशाळेच्या उपकरणाचं नांव आहे ‘एक्सपाईज’. एक्सपेरिमेंट आईज या शब्दाचं लघुरुप. मायक्रोकंट्रोलरवर आधारित या उपकरणाची सध्याची आवृत्ती ‘ एक्सपाईज ज्युनिअर’ ही तर तुमच्या सेलफोनएवढीच आहे. संगणकाकडूनच ऊर्जा घेऊन कार्यरत राहणाऱ्या या उपकरणाद्वारे शालेय स्तरापासून विद्यापीठीय स्तरापर्यंतचे जवळपास पन्नास पेक्षा जास्त प्रयोग करता येतात असे या प्रकल्पाचे प्रमुख अजितकुमार म्हणतात. एक्सपाईजमुळे महाविद्यालयात प्रयोगशाळेत लागणारे लाखांच्या घरातले सी.आर. ओ. सारखे उपकरण आता घेण्याची गरज भासणार नाही. हे उपकरणच संगणकाच्या पडद्यावर सी.आर. ओ.ची सर्व काय्रे दर्शवू शकते. सिग्नल जनरेटर, फ्रिक्वेन्सी काउंटर इ. उपकरणे एक्सपाईजमध्येच अंतर्भूत आहेत. विज्ञानाच्या प्रगतीसाठी प्रयोगशाळा आवश्यक ठरते परंतु प्रयोगशाळा सर्वच शाळांना परवडत नाही या आक्षेपाला एक्सपाईजने चांगलेच उत्तर दिले आहे असे म्हणता येईल. खिशात मावणाऱ्या या प्रयोगशाळेची किंमत फक्त १६०० रु. आहे हे वाचून दचकू नका. अत्यंत आधुनिक मायक्रोकंट्रोलर तंत्रज्ञानामुळे व मुक्त सॉफ्टवेअर तंत्रज्ञानामुळेच हे शक्य झाले आहे. एक्सपाईज बॉक्स बरोबरच त्याच्या प्रयोगासाठी लागणारे सेन्सर्स, मॅग्नेटस इ. सर्पोटींग एॅक्सेसरीजही त्याच किंमतीत देण्यात येतात.  मॅन्युअलप्रमाणे जोडणी करुन संगणकावर प्रयोग ‘रन’ करताच स्क्रीनवर दिसणारा ग्राफिक आऊटपुट थक्क करणारा आहे. शाळा, महाविद्यालयांना सहज परवडणारे हे उपकरण विद्यार्थी व शिक्षकांची प्रयोगशाळेविषयीची संकल्पना नक्कीच बदलून टाकील. अधिक माहितीसाठी गुगल मध्ये http:/expeyes.in/ टाईप करा आणि विज्ञानप्रयोगाची नवी दृष्टी मिळवा.