आजच्या औद्योगिक जगात विजेचे महत्त्व फारच वाढलेले आहे. विजेपासून ज्याप्रमाणे आपला फायदा होऊ शकतो, त्याचप्रमाणे ती वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर नुकसानही होऊ शकते.  प्रत्येक माणसाने विजेचे काम करताना किंवा इतरवेळी पुढील सुरक्षिततेचे नियम पाळावेत.
१)    वीज डोळ्यांनी दिसत नाही. (आकाशात – चमकणारी वीज वगळता) त्याचा परिणाम फक्त जाणवतो. विजेचा शॉक चटकन बसू शकतो. परंतु एखाद्या ठिकाणी विजेपासून धोका आहे हे आपणास वरून समजत नाही. त्याकरिता कुठलेही काम करताना ते काळजीपूर्वक करावे.
२)    कुठल्याही विजेवर चालणाऱ्या; चालू उपकरणाशी उगाच  खेळत बसू नये.
३)    वीज तपासून पाहण्याकरिता आपल्या हातांचा केव्हाही उपयोग करू नये. त्यासाठी टेस्टर सारखे उपकरण वापरावे.
४)    एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीस किंवा मालमत्तेस धोका उत्पन्न झाला तर ताबडतोब सूचना द्यावी.
५)    एखाद्या ठिकाणी विजेचा दाब किंवा प्रवाह तपासून पाहावयाचा असल्यास, त्या ठिकाणी दाब किंवा प्रवाहास तपासण्याची  योग्य अशी साधने वापरावीत.
६)    एखाद्या प्लगला जोडलेली प्लग पीन काढावयाची असल्यास तिच्या वायरला धरून कधीही ओढू नये.
७)    फ्यूज बसविण्यापूर्वी प्रथम – मेन-स्विच बंद करून मग  बसवावा.
८)    अर्थिगचे कनेक्शन नेहमी चांगल्या स्थितीत ठेवावे. कारण सुरक्षितता ही चांगल्या अर्थिगच्या कनेक्शनवर अवलंबून असते. अर्थिग करताना शक्यतो तांब्याच्या प्लेटचा किंवा तांब्याच्या जाड तारेचा उपयोग करावा. विजेचा दाब व प्रवाह किती आहे यावर प्लेटची जाडी व रुंदी; तसेच तारेची जाडी अवलंबून असते. त्याचे इंडियन स्टँडर्ड तसेच ब्रिटिश स्टॅडर्ड प्रमाणिककरण असते. आर्थिग जिथे केले असेल, तिथे लाकडी कोळसा आणि खडेमिठाचा भुरका टाकतात. तसेच अर्थिगची जागा ओली ठेवतात. त्यामुळे अर्थिगचे कनेक्शन चांगले मिळते.
९)    चालू वायर म्हणजे फेज नेहमी स्विचमध्ये जोडावी. म्हणजे स्वीच बंद केल्यावर चालू वायरचा संबंध वीज मंडलाशी (सर्किट) राहाणार नाही. स्वीच चालू केल्यावरच फेज पुढे जाईल. (Electrical circuit) व विजेचे मंडल पूर्ण होईल.
१०)    टेबलफॅन किंवा विजेवर चालणारे दुसरे उपकरण चालू स्थितीत हाताळू नये. अशावेळी उपकरणाची कनेक्शन्स प्लग पासून दूर करावीत.
११)    विजेवर चालणाऱ्या  एखाद्या उपकरणाच्या आतील कनेक्शनची माहिती नसताना कनेक्शनमध्ये बदल कधी करू नये.
१२)    एखाद्या ठिकाणी फ्यूज बसविताना योग्य त्या आकाराच्या फ्यूज वायरचाच उपयोग करावा. ज्या प्रमाणे विजेचा प्रवाह असेल; करंट असेल त्या आकाराचा, एंपीयरेजचा फ्यूज वायरचाच उपयोग करावा. जास्त जाड किंवा खूप बारीक आकाराचा फ्यूज बसवू नये. जास्त जाड आकाराचा फ्यूज बसविल्यास इलेक्ट्रीक सर्किटमध्ये बिघाड झाल्यास तो उडणार नाही व वायर गरम होऊन आग लागू शकते. तसेच खूप बारीक आकाराचा फ्यूज बसविल्यास तो सारखा सारखा उडेल व त्रास होईल. सध्या बाजारात MCB (Miniature circuit breaker) मिळतात. फ्यूजच्या ऐवजी ते बसविता येतात. इलेक्ट्रीक सर्किटमध्ये बिघाड झाल्यास ते ट्रीप होतात. म्हणजे बंद होतात व बरेचसे नुकसान टळते. बिघाड दुरुस्त झाल्यावर MCB चालू करता येते. यामुळे फ्यूज वायर जवळ ठेवण्याचा व फ्यूज वायर जोडण्याचा त्रास वाचतो. MCB देखील योग्य कॅपेसिटीचाच लावावा लागतो. ज्याप्रमाणे घरांतील उपकरणांचे लोड असेल/ प्रवाह असेल, Current असेल तसा MCB लावावा लागतो. M.C.B. 5 amp. 10 amp, 15 amp. इत्यादी क्षमतेचे मिळतात.
१३)    रस्त्यावरील लाइनवर काम करावयाचे असल्यास लाइनबंद करून नंतर लोखंडी साकळी टाकून  प्रथम लाइन शॉर्ट करावी व अर्थ करावी मगच तीवर काम करावे.
१४)    समजा, एखाद्या ठिकाणी विजेमुळे आग लागली असेल; तर ताबडतोब मेन-स्वीच बंद करावा व नंतर आग विझवावी.
१५)    एखाद्या ठिकाणी विजेमुळे आग लागली असेल; तर त्या ठिकाणी आग विझविण्यास पाण्याचा वापर करू नये. आवश्यक त्या आग विझविणाऱ्या उपकरणाचा उपयोग करावा.
१६)    चालू लाइनवर काम करण्याचे शक्यतो टाळावे. अपरिहार्य कारणाने जर चालू लाइनवर काम करणे भाग पडले तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
    अ) लाकडी पाट, लाकडी स्टूल, लाकडी खुर्ची यांचा पायाखाली वापर करावा.
    ब) धन व ऋण (पॉझिटिव्ह व निगेटिव्ह) दोन्ही वायर्स हातामध्ये घेऊ नयेत. जर दोन्ही वायर्सचा आपल्या शरीराशी संबंध आला तर आपल्या शरीरातून विजेचे सर्किट पूर्ण होऊन आपल्याला शॉक बसतो.
    क) चालू लाइनवर काम करताना भिंतीशी संबंध येऊ देऊ नये. जर भिंत ओलसर असेल; तर भिंतीमधून विजेचे मंडल (सर्किट) पूर्ण होऊन आपल्याला आणि जमिनीवरील माणसाला शॉक बसू लागेल.
१७)    विजेवर चालणारे कोणतेही उपकरण दुरुस्त करावयाचे झाल्यास प्रथम त्याचा वीज पुरवठा बंद करून टाकावा आणि मगच त्यावर काम करावे.
१८)    घरामध्ये वायरिंगची कोणतीही दुरुस्ती करावयाची झाल्यास प्रथम मेन-स्विच बंद करावा व मग काम करावे.
१९)    मेन-स्विच बंद केल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करावयाची, तेथे टेस्टरने लाइन तपासून घ्यावी. कारण पुष्कळ वेळा यांत्रिक दोषामुळे मेन-स्विच आतून बंद होत नाही.
२०)    विजेवर चालणारे कोणतेही उपकरण दुरुस्तीकरिता खोलावयाचे झाल्यास त्याची कनेक्शन्स व्यवस्थितपणे पाहून ठेवावीत. त्याचप्रमाणे उघडताना लक्षपूर्वक उघडावे. म्हणजे परत जोडताना त्रास होत नाही.
२१)    मोडक्या शिडीवर कधीही काम करू नये. त्याचप्रमाणे शिडीवर चढून काम करते वेळी दुसऱ्या माणसास शिडी व्यवस्थितपणे धरण्यास सांगावी. अ‍ॅल्युमिनीयमच्या शिडीवर चढून चालू लाइनवर काम करू नये. जर काही अपरिहार्य कारणामुळे तसे करावे लागले; तर पायात रबरी जोडे किंवा चपला घालाव्यात व हातात हँडग्लोव्हज घालावेत व नंतरच चालू लाइनवर काम करावे. शरीराचा कुठलाही भाग अ‍ॅल्युमिनीयमच्या शिडीला लागू देऊ नये.
२२)    आजकाल नवीन लाइन जोडणी करताना ELCB म्हणजेच (Earth leakage circuit Breaker) लावणे अनिवार्य केले आहे. या उपकरणामुळे बरेचदा जीव वाचू शकतो व आग लागणे वाचू शकते. घरात कुठेही ३५ मिली अ‍ॅम्पियर (35 milli ampere) चे लीकेज असेल, तर ही ELCB ट्रीप होते. बंद पडते व विजेची लाइन, विजेचा प्रवाह बंद पडतो. जोपर्यंत हे लीकेज काढत नाही, लीकेज दुरुस्त करत नाही, तोपर्यंत विजेचा प्रवाह सुरूच होत नाही. रात्रीच्या वेळेस असे झाल्यास, एछउइ बायपास करण्यांची देखील सोय ELCB त असते. एछउइ बायपास करून लाइन सुरू करता येते. दुसऱ्या दिवशी लीकेज करंट; लाइन दुरुस्त करून काढता येतो. एखाद्या व्यक्तीला घरात शॉक लागल्यास ही ElCB 25 millisecond मध्ये ट्रीप होते. तसेच लाइनचा सप्लाय बंद होतो. माणूस मरायच्या आत एछउइ सप्लाय बंद करते त्यामुळे माणसांचा जीव वाचतो. 35 milli ampere  चा करंट 25 milli seconds  पेक्षा जास्तवेळ माणसाच्या शरीरात गेला तर माणसाला कार्डियल अरेस्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे माणूस मरू शकतो. म्हणून ELCB  ला Life saving Device जीव वाचविणारे उपकरण’ म्हणतात. प्रत्येकाने आपल्या घरात हे उपकरण (योग्य कॅपेसिटीचे) बसवून घ्यायलाच पाहिजे.
२३)    घरांतील वायरिंग जुने झाले असल्यास ते बदलून घ्यायला पाहिजे. घरात ओल येत असल्यास तसेच वायरिंग जुने झाले असल्यास लीकेज करंटची समस्या वाढते. त्यामुळे शॉक लागण्याची तसेच इलेक्ट्रीक बिल जास्त येण्याची शक्यता वाढते.
२४)आजकाल घरोघरी टी.व्ही. झालेले आहेत. बरेच जण रीमोटनी टी.व्ही. बंद करतात व स्वीच बोर्डावरील स्वीच बंद करीत नाहीत. त्यामुळे टी.व्ही. जरी बंद झाला असला असे आपणास दिसेल (टीव्हीचे चित्र व आवाज बंद होतो त्यामुळे आपणास वाटते की टी.व्ही. बंद झाला.) तरी टी.व्हीच्या ट्रॉन्सफॉर्मरमध्ये सप्लाय असतो (नो लोडवर ट्रान्स्फॉर्मर चालू असतो) त्यामुळे नो लोड लॉसेस ट्रान्स्फॉर्मरमध्ये होतात तसेच ट्रान्सफॉर्मर गरम होऊन त्याचे insulation कमजोर (वीक) होते. तसेच पावसाळ्याच्या दिवसांत आकाशातील विजेमुळे ट्रान्सफॉर्मर देखील जाऊ शकतो. टी.व्ही. देखील जळू शकतो. म्हणून टी.व्ही. नेहमी बोर्डावरील स्वीच बंद करून बंद करावा. आकाशात वीज चमकत असल्यास स्वीच बंद करून प्लग पीन देखील काढून ठेवावी. म्हणजे होणारे नुकसान टळेल.
घरामध्ये विजेचा धक्का बसू नये; म्हणून
* घरामध्ये वावरणाऱ्या माणसाला विजेचा धक्का पोहोचू नये याकरिता घरामध्ये खालील खबरदारी घेतली पाहिजे.
* कुठेही चालू वायर उघडी राहू देऊ नये. उघडी वायर असल्यास तीवर इन्शुलेसन टेप गुंडाळावा.
* विजेच्या वायरिंगवर किंवा साधनावर पावसाचे किंवा इतर पाणी पडू देऊ नये.
* घरामध्ये अत्यंत जुने वायरिंग असल्यास ते बदलून घ्यावे.
* घरामध्ये फ्लेक्झिबल वायर्सची लोंबती कनेक्शन्स ठेवू नयेत.
* विजेवर चालणारी उपकरणे; चालू स्थितीमध्ये लहान मुलांच्या हातात येतील; अशा रीतीने ठेवू नयेत.
* घरामध्ये तात्पुरते वायरिंग फार काळ ठेवू नये.
* विजेवर चालणारे कोणतेही उपकरण दुरुस्त करावयाचे झाल्यास प्रथम त्याचा सप्लाय बंद करून टाकावा आणि मगच त्यावर काम करावे.
* घरामध्ये वायरिंगची कोणतीही दुरुस्ती करावयाची झाल्यास प्रथम मेन स्विच बंद करून घ्यावा व मग काम करावे.

कुलरची काळजी कशी घ्यावी?
 विदर्भात व उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी उन्हाळा खूप असतो. त्यामुळे इथे Air cooler चा  वापर भरपूर असतो. विजेबद्दलची  सुरक्षितता न बाळगल्यामुळे दरवषी कुलरचा शॉक बसून निदान  दोन तीन व्यक्तींचा मृत्यू होतो. कुलरमध्य शॉक लागण्याची दोनतीन कारणं असतात.
*    फेज वायर (Live Wire) स्वीच म्हणून न टाकल्यामुळे स्वीच ऑफ केली (बंद केली), तरी लाइव्ह वायरचापरिणाम  कुलरच्या बॉडीत येतो व कुलरमध्ये पाणी असल्यामुळे इलेक्ट्रीकल सर्किट (मंडल) होऊन कुलरच्या लोखंडी बॉडीत करंट येतो. शरीराला स्पर्श  झाल्याबरोबर शॉक बसतो.
*    स्वीच मधील लाइव्ह वायर फेज वायर मधिल  तार (Stands) कुलरच्या यंत्रणेला काही वेळा अधून मधून   चुकून लागत असतात. त्यामुळे लीकेज करंट येऊन शॉक बसतो. ओल असल्यामुळे शरीराचा प्रतिरोध  रेझीसटंस (Resistance) कमी   होतो व जास्त प्रवाह (Current) शरीरातून जातो व जोराचा शॉक बसतो. शॉक बसू नये म्हणून खालील काळजी घेणे आवश्यक आहे.
*    कुलरमधे पाणी भरताना स्वीच बंद करून प्लग पिन काढून ठेवावी म्हणजे कुलरचा विजेशी काहीही संबंध राहणार नाही. पाणी भरून झाल्यावर प्लग पिन लावून स्वीच चालू करावे. कुलरच्या कुठल्याही भागाला नंतर स्पर्श करू नये.
*    दर उन्हाळ्यांत कुलर चालू करायच्या आधी कुलरचे कनेक्शन तसेच वायरिंग एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावे.
* कुलरचे अर्थिग नीट आहे की नाही हे तपासून घ्यावे. अर्थिग चांगले केलेले असल्यास  Leakage current येत  नाही.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
diy quick tips to save energy at home 3 tricks to reduce your electricity bill and save energy know how
उन्हाळ्यात तुमचे वीज बिल येईल २०-३० टक्क्यांनी कमी! वापरा फक्त ‘या’ ट्रिक्स; एसी वापरानंतरही ‘नो टेन्शन’
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?