News Flash

भांडा सौख्यभरे

‘‘दिसण्याचं काय एवढं? शूटिंग का करणार होतं कुणी?

‘‘आता कशाला कोण येतंय? पण परवा तन्मय त्याच्या बायकोला घेऊन आला होता. तेव्हा नमस्काराला वाकला तर म्हणालात, ‘भांडा सौख्यभरे.’ ही काय आशीर्वाद द्यायची पद्धत?’’ सरिताताई थोडय़ा वैतागून म्हणाल्या. पण त्यावर, ‘‘भांडणानंच संसाराची रंगत वाढते.’’ म्हणत त्यांना श्यामरावांनी संसाराचं गमकच सांगितलं.

बाहेर पाऊस कोसळत होता. श्यामरावांना मस्तपैकी चहा मारावासा वाटला. सोबत गरमागरम भजी मिळाली तर सोन्याहून पिवळं. परंतु आठला जेवायचं ही सरिताची शिस्त. त्याआधी तासभर असं भलतंसलतं खाणं तिच्या शिस्तीत बसणारं नव्हतं. ‘आता जेवू या झालं’ असं म्हणत ते बाल्कनीत गेले, पण चहाची तल्लफ अनावर झाली. त्या क्षणी त्यांना जाणवलं आपण सरिताला घाबरतो. आपण म्हणजे काय नर्सरीतलं पोर आहोत का शिस्त लावायला? त्यांना स्वत:चा राग यायला लागला. ते वाजवीपेक्षा मोठय़ा आवाजात ओरडून म्हणाले, ‘‘सरिता एक चहा कर. चांगला गरम चहा हवा आहे.’’

त्यांचा आवाज ऐकून सरिताताई तिरमिरीनं बाहेर आल्या. सकाळपासून पाऊस लागला होता त्यामुळे त्या फार कंटाळल्या होत्या. श्यामराव दिवसभर बाहेरच होते. घरात येऊन तास झाला नाही तर परत चहाची ऑर्डर. तीही भलत्या वेळी. ‘‘काय हो, नेहमी करते तो चहा गरम नसतो की चांगला नसतो? चांगला नि गरम कसा करायचा ते सांगून टाका म्हणजे करायला बरा.’’

‘‘छे! छे! तुझ्या हातच्या चहाला अमृताची चव असते..’’ ‘फक्त वेळच्या वेळी मिळाला तर.’ पुढचं वाक्य ते अर्थातच मनातल्या मनात म्हणाले. ‘‘चांगला गरम ही आपली म्हणायची पद्धत.’’

‘‘होक्का! आणखी काय काय पद्धती आहेत तुमच्या?’’

‘‘पद्धत, शिस्त.. हे सगळं तुमच्या घरचं. आम्ही आपले सरळ साधे.’’

‘‘म्हणजे स्वत:ला हवं तसं वागणारे. दिवसभर पत्ते कुटायचे. वर भलत्या वेळी चहा.’’

‘‘च्यायला किती किट्किट करतेस गं. साधा चहा प्यावासा वाटला तर.’’

‘‘शिव्या देऊ  नका हं, हे घर आहे.’’

‘‘च्यायला ही काय शिवी आहे. होस्टेलवर तर प्रत्येक वाक्य या शब्दानं सुरू व्हायचं.’’

‘‘तेच म्हणतेय मी. हे घर आहे. होस्टेल नाही. इथे शिव्या दिलेल्या मला खपणार नाही.’’

‘‘हे पहा सरूताई माझं वय आहे पंचाहत्तर. माझ्यावर चांगले चांगले संस्कार करायचं वय निघून गेलंय. तुमच्या मनावर आता काही परिणाम होत असेल तर..’’

‘‘तुमच्या शब्दांनी माझ्या मनावर काही परिणाम व्हायचा नाही. इतके र्वष तुमच्या सहवासात राहून ते चांगलं टफ झालंय. पण काही नातवंडांचा विचार. त्यांच्यावर संस्कार..’’

‘‘आत्ता कोण येतंय कडमडायला?’’

‘‘आता कशाला कोण येतंय? पण परवा तन्मय त्याच्या बायकोला घेऊन आला होता. तेव्हा नमस्काराला वाकला तर म्हणालात, ‘भांडा सौख्यभरे.’ ही काय आशीर्वाद द्यायची पद्धत?’’

‘‘खरं तेच बोललो. भांडणानंच संसाराची रंगत वाढते. असं.. असं सांगायचं होतं मला.’’

‘‘होक्का! उगाचच काही तरी विनोद करायला जाता आजकाल. माझ्यासारखं नीट गोड बोलत चला..’’

‘‘कॉलेजमध्ये असताना तुझं गोडगोड बोलणं ऐकलं आणि..’’

‘‘आणि काय? बोला ना बोला.’’

‘‘आणि फसलो. काय घाबरतो का काय बोलायला?’’

‘‘शी! तुम्ही एवढे भांडकुदळ आहात हे आधी कळतं तर लग्नच केलं नसतं तुमच्याशी. दुसरी कुणी असती तर कधीच पळून गेली असती. मी समजूतदार म्हणून झाला संसार. माझ्यासारखी बायको तुम्हाला सात जन्म शोधली तरी मिळणार नाही.’’

‘‘तुझा एवढा अनुभव घेतल्यावर तुझ्यासारखी बायको शोधायला मी वेडाबिडा आहे का काय? आता देतीयस चहा का जाऊ  मी अमृततुल्यमध्ये.’’

‘‘करतेय,’’ असं म्हणून सरिताताई आत गेल्या. आलं घालून आणलेल्या चहाचा श्यामरावांनी भरभरून वास घेतला. ‘‘हे काय एकच कप?’’ असं म्हणत चहा बशीत ओतला आणि बशी सरिताताईंच्या पुढे केली. त्या कृतीनं नाही म्हटलं तरी त्या सुखावल्या. चहा पोटात गेल्यावर श्यामरावांना तरतरी आल्यासारखं वाटलं. सरिताताईंच्या हातावर थोपटत ते म्हणाले, ‘‘मगाशी मी जरा जास्तच बोललो. आज डाव इतके रंगत गेले. मग बसलो खेळत.’’

‘‘जाऊ  दे. सध्या आमचं मंडळही बंद आहे. त्यामुळे जास्त बोअर होतं.’’

‘‘मी समजू शकतो तू किती बोअर होत असशील ते. मी आता ठरवलंय की चार वाजता घरी यायचं म्हणजे यायचं आणि संध्याकाळी आपण दोघं फिरायला जात जाऊ या.’’

‘‘चालेल! ..आणि अजून एक निश्चय करू या की मी कितीही बोअर झाले आणि तुम्हाला यायला कितीही उशीर झाला तरी आपण भांडायचं नाही.’’

‘‘ओ. के. म्हणजे अगदी लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात वागायचो तसं वागायचं.’’

‘‘अगदी तसंच! पण जमेल का हो आपल्याला न भांडता बोलायला? तेव्हा तरी कुठं जमायचं म्हणा! तुम्हाला आठवतं का आपण अगदी पहिल्यांदा महाबळेश्वरला गेलो होतो; असाच पावसाळा होता. तेव्हासुद्धा भांडलो होतो.’’

‘‘चूक तुझीच होती.’’

‘‘माझी? चांगलं पावसात भिजायला म्हणून गेलो. पाऊस नव्हताच म्हणा. तरी तुम्ही आपली छत्री घेऊन बाहेर पडायचात.’’

‘‘पावसात तुला भिजायचं होतं, मला नाही. आणि काय गं छत्रीच तर घेत होतो ना? साडी नव्हती ना गुंडाळली डोक्याला? तरी तुझं आपलं टुमणं चालूच. छत्री ठेवून द्या. ठेवून द्या.’’

‘‘अहो पण अगदी पेन्शनरसारखं दिसत होतं.’’

‘‘दिसण्याचं काय एवढं? शूटिंग का करणार होतं कुणी? बरं मी सांगतोय की मला सर्दी होते भिजल्यावर. तरी तुझं चालूच, यव् दिसतंय, टय़व् दिसतंय..’’

‘‘पण म्हणून तुम्ही काय केलं आठवतंय का? पाऊस नसताना छत्री उघडून चालायला लागलात. तेही तरातरा. पार कडय़ाच्या टोकाला जाऊन बसलात. आणि काही क्षणांसाठी छत्री टेकवलीत, तीही उघडलेली.  जोरदार वारा आला नि छत्रीच उडाली.’’

‘‘आणि मग तू दात विचकत हसलीस.’’

‘‘मग! हसण्यासारखंच होतं ते. पण तुम्हाला विनोदबुद्धीच नाही. इतके चिडलात की जसं काही मीच फुंकरीनं छत्री उडवून दिली.’’

‘‘तुला काय म्हणायचंय? मी चिडका आहे. संतापी आहे. जे काय चांगलं आहे ते फक्त तुझ्या, माहेरच्या माणसांतच आहे. झालं समाधान?’’

‘‘चिडू नका आज! मला सहज गमतीनं आठवलं ते सांगितलं.’’

‘‘हेच हेच आठवणार तुला गमतीतसुद्धा. एवढं प्रेम केलं ते नाही आठवणार.’’

‘‘सॉरी! आपण आता ठरवलंय ना अजिबात भांडायचं नाही म्हणून. आज तरी आपण काही तरी चांगलं आठवू या.’’

‘‘आज काय विशेष? ..आणि आठवलेबाई चांगलं काही तरी आठवण्यापेक्षा आपण चांगलं काही तरी जेवू या का? का आज चहावरच भागवणार. भलत्या वेळी मागितला म्हणून?’’

‘‘असं कसं करेन मी? तुमच्या बातम्या झाल्या बघून की या जेवायला.’’

श्यामराव स्वयंपाकघरात आले. पानात भजी, खीरपुरी पाहून ते उडालेच. ‘‘आज काय विशेष? कुणी येणार होतं?’’

‘‘आठवा, आठवा, मिस्टर आठवले.’’

ते गप्प बसलेले पाहून त्या म्हणाल्या, ‘‘अल्झायमर होऊ  नये म्हणून रोज ब्रिज खेळता ना! काय उपयोग त्याचा?’’ या वाग्बाणांनी ते अजूनच गोंधळले.

‘‘आज तारीख कोणती? १६ जुलै.’’

‘‘ओ माय गॉड! आज तुझा वाढदिवस. असा कसा विसरलो मी? तरीच सकाळपासून तुझा मोबाइल सारखा वाजत होता. सॉरी. आधी माफ केलं म्हण. त्याशिवाय मी जेवणार नाही.’’

‘‘नाही म्हणून सांगतीय कुणाला? पण सांगून ठेवतीय आठवले, मी म्हणून माफ करतीय. आपल्या नातवंडांच्या पिढीतलं कुणी बायकोचा वाढदिवस विसरलं तर त्याला डायरेक्ट डिवोर्सची नोटीस मिळेल.’’

‘‘होना!. आणि मी विश करणं लांबच, उलट भांडत बसलो, पण काही म्हण सरिता, भांडणामुळे संसाराची रंगत वाढते. बोलायला विषय तरी मिळतो. अगं हो, म्हणूनच मी तन्मयला आशीर्वाद दिला. ‘भांडा सौख्यभरे.’ खरं तर म्हणणार होतो, ‘पादा पण नांदा.’

तुझ्या धाकानं नाही म्हणालो.’’

‘‘जेवा आता. पडलं तरी यांचं नाक वरच.’’

‘‘असं का?’’ असं म्हणत लगबगीनं उठून त्यांनी सरिताताईंचं नाक हलकेच चिमटीत पकडलं. पानातील भजं त्यांना भरवत ते म्हणाले, ‘‘हॅपी बर्थ डे माय डार्लिग.’’

-मृणालिनी चितळे
chitale.mrinalini@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2016 1:07 am

Web Title: bhanda saukhyabhare
Next Stories
1 हाती फक्त हात हवेत..
2 लग्न म्हणजे धर्म, अर्थ आणि ‘काम’ही ..
3 पानगळीतही फुलवला वसंत
Just Now!
X