वयाची एक विशिष्ट मर्यादा ओलांडली की मृत्यूचं सावट मनावर पडणं अपरिहार्य असतं नि त्या बरोबर दोघांपैकी एक जण मागे राहणार आहे हे अटळ सत्यही. जोडीदारापैकी जो मागे राहतो तो भावनिकदृष्टय़ा कसा वागेल हे सांगणं वा ठरवणं खूप अवघड असतं. जोडीदार गेल्यावर जाणवणाऱ्या पोकळीकडे कोण कसं पाहतं हे प्रत्येकाच्या स्वभावावर आणि अर्थातच जोडीदाराशी असलेल्या नात्यावर अवलंबून असतं.

‘सुयश’ सोसायटीतून जाताना ‘आसावरी’ बंगल्याची पाटी पाहिली आणि मी थबकले. मावशीचा बंगला. खूप दिवसांत मी तिथं गेले नव्हते. योगायोगानं आज १७ डिसेंबर म्हणजे तिचा जन्मदिवस होता. आज ती असती तर नेहमीसारखा झोकात साजरा झाला असता हा दिवस. रजनी जातेगावकर म्हणजे प्रख्यात गायिका. देशविदेशात विखुरलेले तिचे चाहते, रियाजाला येणारा शिष्यगण या दिवशी न विसरता हजेरी लावून जायचा. आज मात्र तिथं सामसूम होती. मावशीला जाऊन १०/१२ वर्ष उलटल्यावर हे साहजिक होतं. या दिवशी बाबाजींना एकटेपणा किती जाणवत असेल या कल्पनेनं मी कासावीस झाले. घंटा वाजवल्यावर त्यांनी दार उघडलं. परीटघडीचा झब्बा पायजमा, जॅकेट, गळ्यात सोन्याचं लॉकेट, हातात कडं.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

‘‘कुठं बाहेर जायला निघालात का? सहज या भागात आले होते म्हणून डोकावायचं ठरवलं.’’

‘‘छे! कुठं नाही चाललेलो. आज तुझ्या मावशीचा वाढदिवस म्हणून असं तयार होऊन बसलो. तिला आवडायचं असं मी नटलोबिटलो की. ये आत ये.’’

मी बाहेरचा छोटा हॉल ओलांडून आतल्या प्रशस्त दिवाणखान्यात गेले. मावशी होती तेव्हा असायची तशीच तेथील व्यवस्था होती. पूर्वेच्या बाजूला असलेली भारतीय बैठक. समई, तिचा तानपुरा, समोरच्या तबकात ठेवलेली चाफ्याची फुलं. आता काही मिनिटांत ती तिथं येऊन बसेल आणि ‘सा..’ लावेल. माझ्या मनात आलं.

‘‘बैस ना उभी का? कसला विचार करते आहेस?’’ बाबाजी म्हणाले.

‘‘मावशी होती तेव्हा होतं अगदी तसंच सगळं ठेवलं आहे तुम्ही. ती नाही असं वाटतच नाही.’’

‘‘मलाही.’’ असं म्हणत ते दिलखुलास हसले. ‘‘तुला म्हणून सांगतो बने, मी अगदी गबाळग्रंथी आणि तुझी मावशी बडय़ा घरातली. तिनं माझ्यात काय पाहिलं कुणास ठाऊक? तिच्या शिस्तीपायी किती भांडायचो आम्ही.’’ असं म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्या दोघांनी पळून जाऊन केलेलं लग्न. त्यांचा तुटपुंजा पगार. घरकाम करताना रेडिओवर रागदारी ऐकत मावशीचा चाललेला रियाज. तिच्या करिअरसाठी बाबाजींनी केलेले प्रयत्न. मुलांना बाबाजींकडे ठेवून कार्यक्रमासाठी जाताना तिची होणारी घालमेल. बाबाजी नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांचा चित्रकलेचा छंद जोपासावा म्हणून तिनं त्यांचा पिच्छा पुरवणं. या सगळ्याविषयी मी अनेकदा ऐकलं होतं. पण ज्या पद्धतीनं रंगून जाऊन ते सांगत होते त्यामुळे मीही नव्या नवलाईने ऐकत राहिले.

‘‘तुला म्हणून सांगतो बने, मी चित्र काढत असलो की रज्जू माझ्या पाठीमागे उभं राहून बघत राहायची. आजही तसंच वाटतं बघ. ती गेल्यावर रमण आणि रेवतीनं मला कितीदा तरी त्यांच्याकडे अमेरिकेत कायमसाठी येऊन राहण्याचा आग्रह केला. रमण तर म्हणत होता की, आपण गावात तुमच्यासाठी एक फ्लॅट घेऊ या म्हणजे निदान बंगला मेंटेन करायचे तुमचे कष्ट कमी होतील. पण त्या दोघांना कळत नाही की इथल्या अणुरेणूत भरून राहिलेलं तिचं अस्तित्व, प्रत्येक वस्तूला लाभलेला तिचा स्पर्श तो कसा तिकडे नेता येईल?’’ मी मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत राहिले. त्यामध्ये कुठेही कृत्रिमता नव्हती. नाटकीपणा नव्हता. माणूस गेल्यावर त्याच्याविषयी चांगलं तेच बोललं पाहिजे असा अट्टहास नव्हता. एक तृप्तसा भाव होता.

वयाची एक विशिष्ट मर्यादा ओलांडली की मृत्यूचं सावट मनावर पडणं अपरिहार्य असतं नि त्या बरोबर दोघांपैकी एक जण मागे राहणार आहे हे अटळ सत्यही. त्याबाबतच्या व्यावहारिक योजना केल्या जातात, अनेक गोष्टींची निरवानिरव इच्छापत्राद्वारे करण्याचा प्रयत्न केला जातो, पण जोडीदारापैकी जो मागे राहतो तो भावनिकदृष्टय़ा कसा वागेल हे सांगणं वा ठरवणं खूप अवघड असतं. पुष्कळ वेळा असं लक्षात येतं की पत्नीच्या मृत्यूनंतर पुरुष खूप एकटा पडतो. एकटा आणि एकाकीही. मुलंबाळं, पैपाहुणे, सणसमारंभ यामध्ये स्त्रियांइतक्या उत्साहाने तो रस घेऊ  शकत नाही. त्यामुळे बिचारा होऊन जातो. स्त्रियांच्याही वाटय़ाला हे बिचारेपण येतं; ते कधी पैशाचे व्यवहार माहीत नसतात म्हणून तर कधी सहचर गेल्यावर घरातलं आपलं स्थान बदललं आहे याची जाणीव दुखतखुपत राहिल्यामुळे. जोडीदाराची साथसोबत कधी ना कधी संपणार हे माहीत असूनही आनंदाच्या प्रसंगी त्याची उणीव जाणवून डोळे भरून येतात. जोडीदार गेल्यावर जाणवणाऱ्या पोकळीकडे कोण कसं पाहतं हे प्रत्येकाच्या स्वभावावर आणि अर्थातच जोडीदाराशी असलेल्या नात्यावर अवलंबून असतं.

सुमतीकाकूंना विलासकाकांनी कायमच धाकात ठेवलं असावं. दोघं मिळून कधी कुठे प्रवासाला गेल्याचं ऐकलं नव्हतं. काका गेल्यावर दर सहा महिन्यांनी त्या कुठे ना कुठे ट्रीपला जातात. घरी मैत्रिणी जमवून चक्क पत्ते खेळतात. या वयात त्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद पाहून जाणवतं की त्यांच्या सुखी संसाराच्या बुरख्याआड त्यांनी स्वत:च्या आवडीनिवडीला किती मुरड घातली होती ते. मेहेंदळेमावशी त्यांच्या पतीच्या निधनानंतर कन्याकुमारीला जाऊन आल्यावर भेटल्या तेव्हा म्हणाल्या, ‘‘आम्ही दोघांनी विवेकानंदांचं स्मारक पाहायचं ठरवलं होतं. पण काही ना काही कारणानं राहून गेलं. तिथं जाताना मी यांचा फोटो घेऊन गेले. माझ्या डोळ्यांनी ते सगळं काही पाहात असल्याचं समाधान मला मिळालं. त्यानंतर कधी कुठे जायचं ठरवलं की त्यांचा फोटो मी जवळ ठेवते.’’

कुणाला कशातून समाधान मिळेल हे खरंच सांगता येत नाही. ते ज्यानं त्यानं आपापल्या पद्धतीनं शोधायचं असतं. सुधाकरभाऊ  हे एकदम अबोल स्वभावाचे. आपण बरं आणि आपलं काम बरं हा त्यांचा खाक्या. परंतु शैलावहिनी गेल्यावर ते जाणीवपूर्वक आल्यागेल्यांशी बोलायला लागले असले तरी त्यात मोकळेपणा नसतो उलट आपण मिळूनमिसळून वागायला पाहिजे या जाणीवेचं ओझं असतं.

शिशिरातील ही आत्यंतिक पडझड प्रत्येकाच्या वाटय़ाला कधी ना कधी येणार असते. त्यातील बोच अनुभवताना मनाची प्रसन्नता आणि जगण्यातील सहजता जपणं यासाठी प्रत्येक जण आपापला मार्ग शोधत असतो. कधी तो जमतो. कधी फसतो. काही जण नव्यानं संसार मांडायचा पर्याय निवडतात. बाबाजींच्या मनात असा कधी विचार आला असेल का? मावशी गेली तेव्हा जेमतेम साठी ओलांडली होती त्यांनी. विचारावं का त्यांना? पण मी काही विचारण्यापूर्वी गप्पांच्या ओघात त्यांनीच विषय काढला. ‘‘रजनीच्या आजारानं परत उचल खाल्ली तेव्हा तिला कळून चुकलं की ती आता फार दिवस जगणार नाही. एक दिवस ती मला म्हणाली, ‘माझ्या मागं तू खूप एकटा पडशील. तेव्हा तू पुन्हा लग्न कर. चांगला धट्टाकट्टा आहेस, पैसेवाला आहेस. तुला मुलगी मिळायला काही प्रॉब्लेम येणार नाही.’ अगदी हटूनच बसली. वचन मागायला लागली.’’

‘‘मग?’’

‘‘मग द्यावंच लागलं वचन. तुला माहितीय किती हट्टी होती ती!’’ बोलता बोलता त्यांचा आवाज कातर झाला.

‘‘तुम्हीही तितकेच हट्टी आहात की. कुठं केलंत परत लग्न? माझ्या बिच्चाऱ्या मावशीला फसवलंत.’’ वातावरणातील ताण हलका करण्यासाठी मी म्हणाले.

‘‘तेच सांगतोय तुला. ती म्हणाली होती एकटा पडशील म्हणून लग्न कर. पण मी नाही एकटा पडलो. खरंच नाही पडलो. मग पुन्हा लग्न करण्याचा प्रश्न येतोच कुठे? ती होती तेव्हा होतं तसंच सगळं चालू आहे. आज तिच्या वाढदिवसाला करायचो तसा आक्रोड आणि खजूर घातलेला केक केला आहे. बघ कसा जमला आहे.’’ असं म्हणून ते केक घेऊन आले. केक खाण्यापूर्वी तो उत्तम जमला असणार याची खात्री मला होती. मी जायला उठले तशी म्हणाले, ‘‘तुला रज्जूचं एक गाणं ऐकवतो. गाणं म्हणजे बा. भ. बोरकरांची कविता आहे. तिनंच चाल लावलेली.’’

बाबाजींनी सी.डी. लावली. मावशीच्या दमदार आवाजानं दिवाणखाना भरून गेला. ती जीव ओतून गात होती

‘पिल्लांस फुटुनी पंख,

तयांची घरटी झाली कुठेकुठे

आता आपुली कांचनसंध्या

मेघडंबरी सोनपुटे.

माझ्या डोळ्यासमोर रेवती, रमण आणि मावशीचे अनेक शिष्यगण तरळून गेले. डोळे मिटून गाणं ऐकणारे बाबाजी आणि फोटोतून हसणारी मावशी, एवढंच नाही तर त्यांचं अवघं घर सोनेरी रंगांत न्हाऊन निघालं असल्याचं जाणवलं.

मृणालिनी चितळे chitale.mrinalini@gmail.com