रंगमंचाचा पडदा वर गेला आणि समोर एकसारख्या दिसणाऱ्या, एक सारखी शरीरयष्टी असलेल्या, एकसारखा पोशाख घातलेल्या पन्नासहून जास्त नर्तिका डोळ्यांसमोर दिसल्या. या दृश्यानेच आधी डोळे दिपले होते मग त्यानंतर सुरू झालेल्या सगळ्या नर्तिकांचे एकसारखे नृत्य बघणे पर्वणीच ठरली. त्या नृत्याच्या संचातील प्रत्येक नर्तिका उत्तम नृत्य करीत होती यात वाद नाही परंतु; त्या कार्यक्रमाची, नृत्य प्रस्तुतीची खरी शोभा वाढवली ती या सर्व उत्तम नर्तिकांच्या एकत्र येऊन साकारलेल्या अत्युत्तम सादरीकरणामुळे!

त्या सर्व एकाच साच्यातून बनवलेल्या नर्तिका वाटत होत्या, पण प्रत्यक्षात त्यांना कार्यक्रमानंतर भेटले तेव्हा सगळ्या एकमेकांपासून किती विभिन्न आहेत ते जाणवलं.. तर हा अनुभव सांगण्याचा मुद्दा असा की आपण सगळे एकसारखे नसतो परंतु जेव्हा एकाच प्रकारचं काम एकाच प्रकारे करतो तेव्हा आपल्यातले फरक बाजूला राहतात आणि आपली एकजूट, आपल्यातील साम्य उठून दिसतं. बरेचदा नृत्याच्या कार्यक्रमात एखादी नर्तिका चुकली तर तिकडे आपलं पटकन लक्ष जातं..

नृत्य ही अशी एक कला आहे की ती एक व्यक्तीही सादर करू शकते किंवा १००-१५० हून जास्त नर्तकांचा संचसुद्धा एकाच वेळी एकाच मंचावर सादर करू शकते. जेव्हा एकल नृत्य करणारी नर्तिका समूहात नृत्य करते तेव्हा तिला अनेक बाबींकडे लक्ष द्यावं लागतं व समूहनृत्यासाठी आवश्यक असणारे बदल करावे लागतात. नृत्याच्या प्रशिक्षणातून आणि समूहनृत्याच्या सादरीकरणातून सांघिक भावनेचेही धडे शिकायला मिळतात. लहानपणापासून नृत्य शिकत असल्यास शाळेत, किंवा नृत्याच्या वर्गात नृत्यप्रस्तुती करण्याची संधी मिळते. या समूहनृत्याच्या कार्यक्रमातून हळूहळू सांघिक भावना कशी जपायची याचं बाळकडूसुद्धा मिळत जातं. समूहनृत्य करताना ‘टीम वर्क इज लेस ऑफ मी अ‍ॅण्ड मोअर ऑफ वी’ म्हणजेच ‘स्वत:पेक्षा समूह महत्त्वाचा’ याचं भान ठेवणं आवश्यक असतं. मनुष्य हा समूह, समाजप्रेमी प्राणी आहे. एकमेकांसोबत मैत्री करणं, सुख-दु:ख वाटून घेणं, आचार-विचारांची देवाणघेवाण करणं अशा अनेक सामुदायिक गोष्टींमधून आपलं आयुष्य समृद्ध होत असतं. कुठलंही कार्य सिद्धीस न्यायलासुद्धा एकत्रित येऊन केलेले प्रयत्नच महत्त्वाचे ठरतात हे सुद्धा आपण लहानपणाच्या गोष्टींपासून ऐकत आलो आहोत! जेव्हा समूहनृत्याची तयारी किंवा प्रशिक्षण चालू असते तेव्हा ‘समूह’ कसा एकसारखा दिसेल यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. उंच मुलांना थोडय़ा आखूड हालचाली व ठेंगण्या मुलांना जास्त विस्तृत हालचाली करण्यास सांगितलं जातं, जेणेकरून उंचीचा फरक लपण्यास मदत होते. किंवा एखाद्या नृत्यात एका सरळ रेषेत जेव्हा नर्तिका येतात, तेव्हा सर्वात पुढे असलेल्या मुलीचे अनुकरण करण्याचं सांगितलं जातं. कधी कधी समूह इतका समरस, एकरूप होतो की एखादी नृत्याची स्टेपसुद्धा एकत्र चुकली जाते; असा अनुभव अनेक नर्तकांना येत असतो, असा एकरूप असलेला नृत्यसमूह जेव्हा सादरीकरण करतो तेव्हा त्यांचं ‘परफेक्शन’ दिसून येतं. समूहनृत्यात कधी कधी थोडय़ा कमी-जास्त हालचाली कराव्या लागतात. स्पॉटलाइट म्हणजेच प्रेक्षकांचं आकर्षण आपल्याकडे खेचून घेणं अभिप्रेत नसतं, तर सर्वाबरोबर समान नृत्य करणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर समूहातील इतर सदस्यांबरोबर चढाओढ, स्पर्धा किंवा कुरघोडी केली तर त्याचा दुष्परिणाम नृत्याच्या सादरीकरणावर दिसून येतो. एकमेकांचे दोष लपवून, समान गुण कसे अधोरेखित करता येतील याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक असतं. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून सांघिक भावना रुजू लागते आणि नृत्याद्वारे मिळालेले हे बाळकडू पुढे व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात मदत करते.

ऑफिसमध्ये किंवा व्यक्तिगत संसारात आजूबाजूच्या व्यक्तींसोबत सतत ईर्षां ठेवली, स्पर्धा व कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर समीकरण बिघडते व त्यातून आपण सुखी, समाधानी होत नाही. त्याविरुद्ध सर्वानी एकत्र येऊन समजुतीने निर्णय घेतले, एकमेकांना साहाय्य केलं तर असाध्य कामसुद्धा साध्य होऊ शकतं आणि समूहातील सगळेच त्या यशाचे मानकरी होऊ शकतात. समंजसपणा, दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची सवय, मतभेदांवर तोडगा काढून एकत्रित काम करणं; अशा अनेक जीवनोपयोगी गोष्टी नृत्याबरोबर आपसूकच शिकायला व अनुभवायला मिळतात.

सांघिक भावना वृद्धिंगत करण्याबरोबरच बौद्धिक विकासासाठी, नृत्यकलेचा उपयोग होऊ शकतो. मागील तीन लेखांमध्ये आपण नृत्यकलेचा वापर सर्वागीण विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी कसा होऊ शकतो, या संदर्भात माहिती जाणून घेतली. आज ‘सृजनरंग’मधील नृत्यकलेबद्दलच्या अंतिम लेखात आपण नृत्यकलेचा सांघिक भावनेसाठी व बौद्धिक विकासासाठी कसा उपयोग होऊ शकतो याचा आढावा घेत आहोत. मेंदूच्या विकासासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जन्मापासून ते साधारण वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत मेंदूच्या विकासासाठी व बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जातो. आनुवंशिकता (पालकांकडून मिळालेली गुणसूत्र) जरी महत्त्वाची असेल तरी त्याबरोबर आहार, शारीरिक, बौद्धिक व्यायामसुद्धा मेंदूच्या विकासासाठी तितकेच फायदेशीर ठरतात. नृत्यकला लहान वयापासून शिकायला सुरुवात केल्यास त्याचा मेंदूच्या विकासात मोठा हातभार लागू शकतो. मेंदू हा आपल्या सर्व क्रिया नियंत्रित करणारं शक्तिकेंद्र आहे. आकलन, स्मरणशक्ती, ध्यान देण्याची क्षमता, भाषा, उच्चार, कल्पकता, शारीरिक क्रिया, भावना अशा सगळ्याच गोष्टींची सूत्रं मेंदूकडे असतात. त्यामुळे मेंदूचा विकास व बौद्धिक स्वास्थ्य चांगलं ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नृत्याचा व अभ्यासातील मार्काचा थेट संबंध नसला तरी बौद्धिक विकासासाठी नृत्यकलेचा वापर होतो. हे अनेक संशोधनांतून सिद्ध झालं आहे. नृत्य शिकताना अनेक बाबींकडे ध्यान ठेवावं लागतं. शरीराच्या विविध अवयवांच्या हालचाली करताना त्यांच्यातील ताळमेळ व संतुलन योग्य असणं गरजेचं असतं. तसंच शारीरिक हालचालींचा हावभाव, संगीत, वाद्यवृंद या सगळ्यांबरोबर मेळ असणं तितकंच आवश्यक असतं. ज्यामुळे शरीरातील हालचालींमधील सुसूत्रता वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर नृत्य शिकताना एखाद्या गाण्यावरील किंवा बोलांवरील स्टेप्स एकापुढे एक लक्षात ठेवाव्या लागतात; ज्याचा फायदा स्मरणशक्ती व एकाग्रता वाढण्यास होऊ शकतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, नृत्य केल्याने मेंदूमधील मोटर कोरटेक्स, बेसल गँग्लिओ, सेरेबेलम आणि सोमॉटोसेन्सरी कोरटेक्स या भागात हालचाल दिसून येते व मेंदूचे हे भाग शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवणं, हात व डोळे यांतील सुसूत्रता प्लॅनिंग अ‍ॅण्ड एक्झिक्युशन (ठरविणं, निर्णय घेणं व तशी कृती करणं) अशा विविध कार्यात मदत करतात. लहानपणापासून नृत्य शिकल्यास बौद्धिक विकासासाठी त्याची मदत होईल पण त्याबरोबरच मोठेपणी, वृद्धापकाळात मेंदूची झीज रोखण्यासाठी, मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी नृत्यकलेचा वापर करता येऊ शकतो. मेंदूशी निगडित आजार झालेल्या रुग्णांसाठीही नृत्याचे अनेक फायदे दिसून येतात. गेली काही र्वष मी कंपवाताच्या रुग्णांबरोबर सातत्याने काम करीत आहे व नियमित नृत्यवर्गामुळे त्यांच्या बौद्धिक, भावनिक व शारीरिक क्षमतेत यशस्वी बदल झालेले बघायला मिळत आहेत. अर्धागवायू, स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांबरोबरसुद्धा नृत्यकलेचा वापर होत आहे. त्याचबरोबर लहान मुलांमधील मेंदूचे विकार – स्वमग्नता, मतिमंदता, सेरेब्रल पाल्सी इत्यादींनी ग्रस्त मुलांसाठी सुद्धा नृत्याचे धडे शिकवले जात आहेत.

या सर्व निरीक्षणांवरून, अनुभवांवरून नृत्यकलेचा सांघिक भावना व बौद्धिक विकासासाठी फायदा होऊ शकतो, असा तर्क बांधण्यात येतो आहे. त्यामुळे निरोगी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, तसेच सामाजिक स्वास्थ्यासाठी नृत्याचा मार्ग स्वीकारायला काहीच हरकत नाही. ‘डान्स यूअर वे टू हेल्थिअर अ‍ॅण्ड हॅपीअर लाइफ अहेड.’

(समाप्त)

– तेजाली कुंटे                                    

tejalik1@gmail.com