25 March 2019

News Flash

रुजवात क्रीडा संस्कृतीची!

आपला पाल्य हुशार असावा, त्याच्यामध्ये दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता असावी

आपला पाल्य हुशार असावा, त्याच्यामध्ये दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता असावी, तो स्वावलंबी असावा, त्याने आपल्या जबाबदाऱ्या ओळखून वर्तन करावे, त्याच्याकडे परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता व आवश्यकतेनुसार प्रसंगांना तोंड देण्याचे धैर्य असावे, तो संस्कारक्षम असावा, त्याने आपले अनुभवविश्व समृद्ध करावे, त्याच्यामध्ये आव्हाने स्वीकारण्याची कुवत असावी, यश मिळविताना, धडपडताना, वेळप्रसंगी झगडताना, अपयश पचविताना तो भरकटू नये, त्याने तणावग्रस्त होऊ नये, त्याचे आयुष्य स्वास्थ्यपूर्ण व दर्जेदार असावं व त्याची जीवनशैली आनंदी, सकारात्मक असावी, असं तुम्हाला वाटतं का? माझी खात्री आहे की, प्रत्येक पालकाचे, यासाठी उत्तर होकारार्थीच असेल.

खूप अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळवून, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून हे सर्व साध्य होईल का? माझी पुन्हा खात्री आहे जर पालकांनी अंतर्मुख होऊन विचार केला तर या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच असेल. आजच्या या धकाधकीच्या, स्पर्धेच्या व ताणतणावाच्या युगात शैक्षणिक अर्हतेबरोबरच आत्मसात केलेली जीवनकौशल्येच पुढे जायला उपयोगी पडतील. वेळेवर येणे-जाणे, काम नीट समजावून घेणे, त्यातील चुका टाळणे, कामात नियमितता राखणे, काम कंटाळवाणे वाटले तरी त्याचा पाठपुरावा करणे, प्रगती करणे, कौशल्यवृद्धी करणे-मुख्य म्हणजे या सर्वासाठी स्वत:ची एक प्रगल्भ मानसिकता तयार करणे ही आजच्या काळाची गरज आहे.

ही जीवनकौशल्ये शिकणार कोठे? आजची सामाजिक परिस्थिती बघता फक्त घरीही शिकता येणार नाहीत वा फक्त शाळेतही शिकता येणार नाहीत, यासाठी कोणतेही शिकवणीवर्गही उपलब्ध नाहीत. मात्र ही जीवनकौशल्ये शिकण्याचा एकमेव राजमार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे मैदानावरील ‘खेळांचा, क्रीडेचा, व्यायामाचा!’

त्यासाठी प्राथमिक किंवा पूर्वप्राथमिक शाळा शाळांमधूनच हे लोण पसरविण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक शाळेला मैदान असणं, प्रत्येक वर्गाने रोज किमान एक तास तरी मैदानावर येणं, प्रत्येक मुलाने कुठला तरी खेळ खेळणं अनिवार्य केलं गेलं पाहिजे. त्यासाठी विदेशी वैयक्तिक खेळांपेक्षा कबड्डी, लंगडी, खो-खो, कुस्ती, मल्लखांब यांसारख्या देशी खेळांना प्राधान्य व प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे. शाळांना मैदान नसले तरीसुद्धा मर्यादित जागेमध्ये केले जाणारे सूर्यनमस्कार, योगासने, एरोबिक्स आदी व्यायामप्रकार तरी नियमितपणे घेतले गेले पाहिजेत.

तसं सर्वानाच व्यायाम करण्याची गरज केव्हा ना केव्हा तरी जाणवतेच. आताही नवीन वर्षांच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच, नवीन वर्षांत काय काय करायचे याचेही संकल्प सुरू झाले असतील. दरवर्षीप्रमाणेच अनेकांनी रोज सकाळी लवकर उठून चालायला, धावायला जायचं, व्यायाम सुरू करायचा, असेही संकल्प केले असतील. नवीन वर्षांच्या सुरुवातीला नवीन बूट, नवीन रॅकेट आदी मिरवणारी लहानथोर मंडळीही काही दिवस दिसतील, मात्र यातील बरेच जण ‘वेळच मिळत नाही’ या सबबीखातर काही दिवसांतच पुन्हा आपापल्या जुन्या ‘रूटीन’ला चिकटलेले दिसतील. खरंच खेळायला हवे, व्यायाम करायला हवा, तो नियमितही हवा, हे आपल्यापैकी जवळजवळ सर्वानाच माहिती असते, मात्र ‘कळतं पण वळतं नाही’ अशी अवस्था सर्वाचीच होते. व्यायाम करायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या काही महिन्यांतच त्यातील गळतीचे प्रमाण सुमारे ५० टक्के आहे. ‘लोकांना व्यायामाकडे वळविणे एकवेळ सोप्पे आहे, पण टिकवणे महाकठीण!’ संशोधनदेखील हेच दाखवते. या अनियमिततेला अनेक घटक कारणीभूत आहेत, आपल्याला ते समजले तर त्यावर परिणामकारक उपाययोजना करता येईल.

खेळ आणि व्यायामातला एक अत्यंत महत्त्वाचा पहिला घटक म्हणजे त्याला असलेली समाजमान्यता. लहान मुलगे-मुली खेळतात आणि त्यात कुणालाच काही वावगे वाटत नाही. जरा मोठी झालेली, तारुण्यात पदार्पण करत असलेली, लग्नाच्या वयाला आलेली मुलं/पुरुष थोडय़ा प्रमाणात तरी खेळताना आढळतील, पण या सर्व वयोगटांतील मुली आणि महिलांचे मात्र खेळण्याचे / व्यायाम करण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे, कारण त्याला सहज समाजमान्यता नाही. मोठय़ा झालेल्या मुलाला सहजपणे मोठी सायकल, मोठी बॅट, मोठा बॉल आणून दिला जातो, मात्र मुलीला हे देण्याची गरज भासत नाही. यामुळेच वयात येणारी मुलं जागा असेल तिथे, गल्लीबोळात, जमेल तसा थोडा तरी खेळ खेळताना दिसतात, मात्र या वयाच्या मुली नुसत्या घोळक्यात उभ्या राहून गप्पा मारताना, अथवा घरात बसून राहिलेल्या दिसतात. एकूणच चालायला व खेळायला जाणाऱ्यांमध्ये तसेच ‘जिम’ला जाणाऱ्यांमध्येही पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. खेळात ‘करिअर’ करणाऱ्या मुली सोडल्या तर खेळणाऱ्या, पळणाऱ्या, व्यायाम करणाऱ्या मुली/स्त्रियांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

एकूणच समाजामध्ये खेळ, क्रीडा, व्यायामाकडे थोडं तुच्छतेनं बघितलं जातं. अगदी ‘हे काम म्हणजे काय खेळ वाटला का तुला?’, ‘खेळत बसण्यापेक्षा चार ओळी वाचल्यास तर परीक्षेत जरा उजेड पडेल’, ‘इतकं खेळण्याची काही गरज नाही’ अशा संवादातून समाजाचा खेळविषयक दृष्टिकोन सहजच दिसून येतो. ‘खेळ म्हणजे एखादी सहजसाध्य गोष्ट’ वा ‘खेळात घालवलेला वेळ म्हणजे फुकट गेलेला वेळ’ असा (गैर) समज असल्यामुळे असंख्य मुलं नियमित खेळापासून वंचित राहतात. अगदी बालवर्गापासून शाळेत नियमित जाण्याबद्दल अतिशय कटाक्ष ठेवणारे पालकसुद्धा अगदी क्षुल्लक कारणासाठी मुलांना सहजपणे खेळाच्या वर्गाला दांडी मारायला लावतात.

‘स्वप्रतिमा’ सातत्यपूर्ण व्यायामाकडे नेणारा दुसरा घटक आहे. ‘मला जमू शकेल’ असं स्वत:ला वाटणं ही व्यायामाकडे ओढून नेणारी महत्त्वाची पायरी आहे, तसंच ‘एकटय़ाने व्यायाम करण्यापेक्षा इतरांबरोबर केलेला व्यायाम सातत्य टिकवतो’ असेही दिसून आले आहे. माझ्याबरोबर माझ्या इमारतीतील/परिसरातील काही मुले व्यायामशाळेत, माझ्याबरोबर चालायला, धावायला येतात, ही बाब खूपच प्रोत्साहित करणारी ठरते. आजच्या संगणकाच्या युगात आणि खिशात ‘स्मार्ट फोन’ असणाऱ्यांना ही प्रक्रिया तर खूपच सोप्पी झाली आहे. कुठल्या परिसरात खेळाचे, व्यायाम करणाऱ्यांचे कुठले ‘गट’ आहेत हे त्याद्वारे लगेच कळू शकते. कित्येक वेळा असे ‘संगणकीय समूह’ही तयार होऊ शकतात. एखाद्या समूहाचे तुम्ही सभासद झाल्यावर ‘आज मी अर्धा तास धावलो’ अशी माहिती त्या संकेतस्थळावर टाकून इतर जण काय करीत आहेत आणि आपण अजून काय काय करू शकतो याचा अंदाज घेता येतो.

तिसरा घटक म्हणजे या युगातील प्रगत तंत्रज्ञानाचा आविष्कार. आपण करीत असलेल्या वर्तणुकीला जर बक्षीस मिळाले तर ती वर्तणूक परत परत करण्याची उमेद वाढते. पण व्यायाम करण्यासाठी आपल्याला रोज रोज बक्षीस कोण देणार? भ्रमणध्वनीमध्ये असलेल्या अनेक ‘फिटनेस अ‍ॅप्स’नी आणि बाजारात उपलब्ध असलेल्या ‘फिटनेस बँड्स’नी ही उणीव आता भरून काढली आहे. या ‘अ‍ॅप्स’मुळे आज आपण किती पावले चाललो, किती धावलो, आपल्या किती कॅलरीज वापरल्या गेल्या, झोप किती तास झाली आदी अनेक बाबींची माहिती सहज, त्वरित मिळू शकते. त्यावर ठरवलेले लक्ष्य साध्य केले की संगीत वाजते, चांदण्याची आतषबाजी होते. या सर्वानी उत्साह वाढतो आणि नियमित व्यायामाची शक्यताही वाढते.

चौथा घटक म्हणजे दृक्श्राव्य माध्यमांची परिणामकारकता. आपल्याकडे खेळाची आवड ही खूप मोठय़ा प्रमाणात दूरचित्रवाणीशी संबंधित आहे. जेव्हा जेव्हा जागतिक पातळीवरच्या वा इतर कसदार, दर्जेदार स्पर्धा होतात तेव्हा लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती या स्पर्धा आवडीने बघतात. टेनिस, फुटबॉल, क्रिकेट आदी खेळांतील खेळाडूंचा खूप मोठा चाहता वर्गही आपल्याकडे आहे. स्पर्धा झाल्यावर नाक्यानाक्यावर अहमहमिकेने त्यावर चर्चा करणारी, टीकाटिप्पणी करणारी युवा पिढीही दिसते. या सर्वाना क्रीडाप्रकारात प्रत्यक्ष सहभागी होण्यापेक्षा प्रेक्षकांची भूमिका बजावायलाच जास्त आवडते असे दिसून येते. यात बदल होणे खूप आवश्यक आहे.

आधीच्या तीन लेखांमध्ये आपण बघितलंच आहे, नियमित खेळाचे शारीरिक, तसेच असंख्य मानसिक फायदे. भावनिक बुद्धिमत्तेच्या लवचीकता, स्वायत्तता, स्वनियंत्रण, स्वप्रतिमा, स्वप्रतिष्ठा आदी घटकांमध्ये वाढ, भावना व तर्क यांचा योग्य समन्वय, शिस्त, सातत्य, समतोलपणा, जिद्द व सकारात्मक विचार यांचा विकास, यशाबरोबरच अपयशही सामावून घेणे, कठीण परिस्थितीला तोंड देणे, ताणतणावांचा निचरा करणे, नकारात्मक घटकांना सामोरे जाणे आदी अत्यावश्यक गुणांची जपणूक अशी ही खूप मोठी यादी देता येईल. मात्र असे असूनही खेळाच्या मैदानावर जाणाऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या मानाने खूप कमी आहे. खेळाला राजमान्यता व समाजमान्यता मिळाली तरच हे चित्र झपाटय़ाने बदलून जाईल आणि आपल्याकडे खऱ्या अर्थाने खेळ संस्कृती रुजवली जाईल असं निश्चितपणे म्हणता येईल. चला या बदलाची सुरुवात आपल्यापासूनच करू या..

डॉ. नीता ताटके

neetatatke@gmail.com

(सदर समाप्त)

First Published on December 30, 2017 12:13 am

Web Title: marathi articles in chaturang on sports culture