20 March 2019

News Flash

शारीरिक आरोग्याचा मूलमंत्र!

नृत्यकलेचे शारीरिक आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत, याचा आढावा.. 

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

स्पेशल ऑफर – जिमच्या फीमध्ये ‘झुंबा फिटनेस डान्स प्रशिक्षण’ मोफत!’ अशा अनेक ऑफर्स आपण पाहत असतो. आजकाल ‘फिटनेस’कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. पूर्वी खेळाडू, शरीरसौष्ठव स्पर्धेतील स्पर्धक, आखाडय़ात तालीम करणारे, कुस्तीपटू यांच्या तोंडीच शरीर, स्नायू, आहार अशासारख्या गोष्टी ऐकू येत, पण आता प्रत्येक जण आपलं डाएट, व्यायाम, फिटनेस याबाबतीत सतर्क होऊ लागलाय. अगदी बच्चेकंपनीसाठीसुद्धा जिममध्ये स्पेशल बॅचेच चालू झाल्या आहेत आणि शाळेतली मुलंसुद्धा ‘कॅलरी कॉन्शस’ होताना दिसत आहेत! थोडक्यात काय तर स्वत:च्या शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्ती बाबतीत बरेच जण गांभीर्याने विचार करताना दिसत आहेत. शारीरिक आरोग्य आणि पेहराव (फिजिकल अपीअरन्स) यासाठी अनेक विविध मार्गाचा लोक अवलंब करतात. जिम, व्यायामशाळा, सायकल, पोहणे याबरोबरच ‘नृत्याचा’ मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. मागील लेखामध्ये आपण नृत्याचा ‘सर्वागीण विकासासाठी’ कसा फायदा होऊ शकतो याबद्दल चर्चा केली. या वेळी नृत्यकलेचे शारीरिक आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत, याचा आढावा  या लेखातून घेत आहोत.

शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी नृत्याचे झुंबा, एरोबिक्स, बेली डान्सिंग असे अनेक प्रकार प्रचलित आहेत. नृत्याचा कोणताही प्रकार शिकला तरी प्रत्येक प्रकारांतून अनेकविध फायदे मिळू शकतात. भारतीय शास्त्रीय नृत्यशैली आणि लोकनृत्य प्रकारसुद्धा शारीरिक बळकटीसाठी तितकेच फायदेशीर आहेत. लहानपणापासूनच नृत्य शिकायला सुरुवात केली तर नृत्य हा सरावाचा भाग बनून जातो आणि त्याचबरोबर नृत्यातून होणाऱ्या शारीरिक व्यायामाचीसुद्धा शरीराला सवय लागते. लहान वयात शरीर अतिशय लवचीक असल्यामुळे नृत्यातील सर्व पायऱ्या चांगल्या प्रकारे शिकता येतात आणि पुढे जाऊनही नृत्यामुळे आलेली लवचीकता टिकून राहते; परंतु वयाच्या तिशी – चाळिशीनंतर नृत्य शिकायला सुरुवात केली तर ते थोडे कठीण वाटू शकते आणि शरीराला त्याची सवय नसल्याने कधी कधी काही कठीण स्टेप्स करण्यात अडचण येऊ शकते.. पण लहानपणापासूनच शारीरिक व्यायाम व आवड यासाठी नृत्य शिकणं नक्कीच फायदेशीर ठरतं! पण लहानपणी नृत्य शिकले नसले तरी नृत्य शिकायला कुठलंच वयाचं, जागेचं, काळाचं बंधन नाही.. त्यामुळे नृत्याची आवड असल्यास, शारीरिक व्यायामासाठी कुठल्याही वयात तुम्ही नृत्याचा पर्याय नक्कीच निवडू शकता!..

नृत्य हा एक उत्तम ‘कार्डिओ वर्कआऊट’चा प्रकार आहे. म्हणजेच हृदय व रक्तवाहिन्यांच्या उत्तम कार्यशीलतेसाठी नृत्याचा वापर केला जाऊ शकतो. साधारणत: नृत्य मध्यम किंवा जलद गतीत केल्यास हृदयाची गती वाढते; घाम येतो आणि आपल्या शरीरातील कॅलरीज जाळण्यास मदत होते. एरोबिक्स, झुंबासारखे जलद फिटनेस नृत्यप्रकारांतून एका तासात ४०० हून अधिक कॅलरीज ‘बर्न’ होऊ शकतात. धावणे, सायकल, दोरीच्या उडय़ा, पोहणे अशा कार्डिओ व्यायामांत जितक्या कॅलरी जळतात, त्या प्रमाणात किंवा त्याहून जास्त प्रमाणात नृत्यामधून कॅलरीज जळू शकतात. हृदयाची गती वाढवून व्यायाम केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. नृत्यातून होणाऱ्या हृदयाच्या व्यायामामुळे जास्त काळ काम करण्याची शक्ती (स्टॅमिना) वाढण्याससुद्धा मदत होते. तसेच कॅलरीज जाळल्याने अंगातील मेद व वजन कमी होण्यास मोठा हातभार लागतो. त्यामुळे वजन आणि इंच कमी करायचं असल्यास, ‘नृत्य’ हा एक परिपूर्ण उपाय आहे. केवळ शारीरिक आरोग्यासाठी आणि आवड म्हणून नृत्य शिकल्याने स्टॅमिना वाढतोच; परंतु जर नृत्यकला अधिक वेळ देऊन गांभीर्याने शिकली व नृत्य सादरीकरण करण्यास सुरुवात केली तर नृत्याच्या कार्यक्रमांसाठी होणारा रियाज (सराव) स्टॅमिना वाढवायला अधिक उपयुक्त ठरतो. कारण रंगमंचावर अर्धा ते एक तास नृत्य करणंसुद्धा खूप कठीण असतं; न दमता, मध्ये जास्त विश्रांती न घेता स्टेजवर नृत्य सादर करायला विशेष तयारी लागते व त्यासाठी स्टॅमिना चांगला असणं फार आवश्यक असतं! भारतीय शास्त्रीय नृत्यपद्धती तसेच भांगडा, गरबा, लावणी व लोकनृत्य प्रकारांतून सुद्धा खूप चांगल्याप्रकारे ‘कार्डिओ व्यायाम’ होतो.

कार्डिओ आणि स्टॅमिनाबरोबरच नृत्यामुळे शरीर लवचीक बनते. नृत्यामुळे शरीराचे अवयव, स्नायू ताणले जातात, ज्यामुळे शरीराची लवचीकता वाढण्यास मदत होते. लवचीक शरीर हा शारीरिक आरोग्यातील एक महत्त्वाचा आयाम मानला जातो. नृत्यामुळे येणारी लवचीकता व अंगात भिनलेली नृत्याची लय यामुळे एक प्रकारची चपळाईसुद्धा नर्तकांमध्ये दिसून येते. शरीर स्थूल व शिथिल राहत नाही. शरीराला आलेला आळस झटकून नृत्य केल्याने शरीर व मन ताजेतवाने वाटते. कोणत्याही नृत्यप्रकारात हात-पाय व संपूर्ण शरीराच्या लयबद्ध हालचाली असतात व या हालचालींमध्ये शरीराच्या विविध अवयवांचा उत्तममेळ साधलेला असतो. चेहरा, हात, पाय इत्यादींची लयबद्ध एकत्र  हालचाल करण्यामधून शरीराच्या अवयवांचा समन्वय / सुसूत्रता सुधारण्यास मदत होते; ज्याचा फायदा अनेक दैनंदिन कामांमध्येसुद्धा बघायला मिळतो. नृत्यामुळे शरीराचे संतुलन सुधारायला हातभार लागतो. शरीराचा समतोल (बॅलन्स) वाढतो कारण नृत्यात अनेक वेळेला एका पायावर भार देऊन एखादी पोझ बनवली जाते व बरेचदा काही सेकंदांसाठी ही पोझ तशीच ठेवली (होल्ड) जाते. त्यासाठी शरीराचा तोल सावरता येणं महत्त्वाचं असतं आणि पर्यायाने समतोल सुधारण्याच्या सरावातून शरीराचा बॅलन्स चांगला होण्यासाठी नृत्याची मदत होते!

नृत्यामुळे शरीरातील स्नायूंना बळकटी येते व हाडंसुद्धा मजबूत होतात, असे निष्कर्षांस आले आहे. ज्याचा परिणाम म्हणून हाडं झिजण्याचं प्रमाण नर्तकांमध्ये कमी प्रमाणात दिसून येतं किंवा ते होण्याचं वय पुढे गेलेलं दिसतं. नृत्यामुळे हात – पायांसारख्या मोठय़ा अवयवांचा व मोठय़ा हालचालींच्या (ग्रॉस मोटर मूव्हमेंट) व्यायामाप्रमाणेच छोटय़ा अवयवांचासुद्धा (फाइन मोटर मूव्हमेंट) उत्तम व्यायाम होतो. जसं की भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांमध्ये हस्तमुद्रांचे फार महत्त्व आहे. या मुद्रा बनवण्यासाठी हाताच्या बोटांच्या सूक्ष्म हालचाली नीट होणं आवश्यक असतं. या हस्तमुद्रांच्या सरावातून हाताच्या बोटांतील स्नायूंचा व्यायाम होतो व या सूक्ष्म हालचाली दैनंदिन जीवनातील – लिहिणं, बटणं लावणं, बूटांच्या लेस बांधणं, जेवणं इत्यादी अनेक कामांत मदतीस येतात. तसेच डोळ्यांच्या, भुवयांच्या, मानेच्या सूक्ष्म हालचालींमुळे या अवयवांचा व्यायाम होतो; जो व्यायाम किंवा जे अवयव कधी कधी इतर व्यायाम पद्धतींमध्ये दुर्लक्ष केले जातात.

अशा प्रकारे नृत्यामुळे शरीराचे सौष्ठव, बांधा, लवचीकता, स्नायूंची बळकटी, संतुलन, अवयवांतील सुसूत्रता, हृदय व रक्ताभिसरण चांगले होणे, वजन कमी होणे – असे अनेकविध शारीरिक फायदे बघायला मिळतात. नृत्यामुळे मिळणाऱ्या या फायद्यांमुळे शरीराची ठेवण(पोश्चर)सुद्धा आकर्षक बनते व गर्दीमध्ये, अनेक लोकांमध्ये स्वत:ची एक उत्तम, आकर्षक प्रतिमा बनण्याससुद्धा मदत होते. ‘फिटनेस’च्या या काळामध्ये जीममध्ये विविध उपकरणांबरोबरच तोच तोच व्यायाम करण्यापेक्षा गाण्यांबरोबर, ठेक्याबरोबर नृत्यवर्गाकडे अनेकांचा कल वाढत चालला आहे. तणावमुक्त व्यायाम प्रकारामुळे नृत्याकडे केवळ आवड म्हणून बघण्यापेक्षा – एक उत्तम शारीरिक व्यायाम पद्धती म्हणून बघितलं जात आहे. तेव्हा, ‘जस्ट डान्स अ‍ॅण्ड स्टे फीट’!

– तेजाली कुंटे

tejalik1@gmail.com

First Published on October 7, 2017 1:40 am

Web Title: zumba aerobics beli and indian classical dance good for health