गर्भवती स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. कारण काळजीअभावी गर्भपाताची शक्यता निर्माण झाली तर तिच्या जिवाला धोका पोहोचू शकतो.

आपण गेल्या वेळी प्रसूतिपूर्व तपासणी सामान्यत: कशी होते आणि काय सल्ला दिला जातो, काय तपासण्या होतात हे पाहिले. हे सगळे समजून घेताना लक्षात येते की प्रसूतिनंतर स्त्रीचा पुनर्जन्म होतो असे उगीचच नाही म्हटले जात. कधी काही अनपेक्षित गुंतागुंती उद्भवतात व जीव धोक्यात येतो. डॉक्टर या त्रासांचे वर्गीकरण तिमाहीनुसार करतात.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

अकाली रक्तस्राव : पहिल्या तिमाहीतले सर्वात काळजीचे लक्षण म्हणजे रक्तस्राव. सोनोग्राफीबद्दल आपण चर्चा केलीच आहे. गर्भपाताचे दोन प्रकार आहेत; एक आपण होऊन करून घेतलेला आणि दुसरा नसíगकरीत्या होणारा. करून घेतलेला गर्भपात एम.टी.पी. म्हणून नोंदला जातो. त्याबद्दल आपण नंतर बोलू.

नैसर्गिकरीत्या होणारा गर्भपात अनेक कारणांनी होतो. यातले जास्तीत जास्त आढळणारे कारण आहे गर्भातील दोष. निसर्ग खूप दयाळू आहे आणि त्याची यंत्रणा चोख आहे. दोष असलेले बहुतेक गर्भ नसíगकरीत्या पडून जातात. होर्मोन्सच्या कमतरतेमुळे, रक्तातील दोषांमुळे, गर्भाशयाच्या रचनादोषामुळे, काही संसर्गामुळेसुद्धा गर्भपात होतो. याबद्दल आपण गर्भधारणापूर्व समुपदेशाच्या लेखात वाचले असेल. गर्भपाताच्या संभाव्य कारणांची तपासणी करून आपले डॉक्टर आपल्यासाठी योग्य तो औषधोपचार सुरू करतात.

काही तपासण्या खर्चीक वाटतात म्हणून लोक करून घेण्याचे टाळतात. अशा वेळी मला माझे एक शिक्षक म्हणत ते आठवते-मूल ही जगातली सर्वात महाग वस्तू आहे! हे खरेच आहे की नाही? पण ज्या पद्धतीने आपल्या समाजात स्त्रिया कुटुंबाला हवी तेवढी आणि हवी तेव्हा मुले जन्माला घालण्यासाठी शरीराची जी हेळसांड करून घेतात त्यावरून स्त्रीचे आरोग्य, आयुष्य खूपच स्वस्त असावे असे वाटते. काही वाचक म्हणतील की मला आपल्या स्त्रियांच्या सामाजिक स्थितीची आणि आíथक अडचणींची जाणीव नाही. पण ही आरोग्यसेवांची मर्यादा म्हणा किंवा या सेवांचे नियोजन करणाऱ्या शासनाची अनास्था म्हणा, या तपासण्या मोफत किंवा स्वस्तात उपलब्ध नसतील तर पदरमोड करून का होईना पण करून घ्याव्यात.

असो. आपल्या मुद्दय़ाकडे वळू. रक्तस्राव झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. गेल्या वेळी आपण एक्टोपिक प्रेग्नन्सीबद्दल बोललो होतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे. पाळी चुकली असता, पोटात दुखून रक्तस्राव होणे आणि घेरी येणे ही या प्रकारच्या गर्भधारणेची लक्षणे आहेत. रक्तातील एच.सी.जी. नावाच्या होर्मोनचे प्रमाण, गर्भनलिका (टय़ूब) फाटली आहे की कसे यावर शस्त्रक्रिया की औषधोपचार हा निर्णय अवलंबून असतो. ही शस्त्रक्रिया आजकाल बहुतेक डॉक्टर दुर्बणिीद्वारे करतात.

दुसऱ्या तिमाहीत रक्तस्राव सुरू होणे तसेच ओटीपोटात आणि पाठीत दुखणे हे गर्भपात होण्याची शक्यता दर्शवते.

तिसऱ्या तिमाहीत रक्तस्राव : यावेळी होणारा रक्तस्राव वारेची समस्या दर्शवतो. सामान्यत: वार (प्लासेण्टा) गर्भाशयाच्या वरील भागात असते. गर्भाशयाचा खालील भाग गर्भावस्थेच्या उत्तरार्धात वाढतो. जर वार या भागात असेल तर तिसऱ्या तिमाहीत ती सुटू शकते व रक्तस्राव होतो. तिसऱ्या तिमाहीत पोटात न दुखता रक्तस्राव सुरू होणे हे वार गर्भाशयात खाली असून सुटत असल्याचे लक्षण असते. सोनोग्राफी करून याचे निदान होते. शक्यतो गर्भ परिपक्व होईपर्यंत थांबून मग सिझेरिअन सेक्शन करावे लागते.

जर पोटात दुखून रक्तस्राव झाला असेल तर ते सर्वसामान्य जागेत असलेली वार सुटणे (अ‍ॅब्रप्शन) चे लक्षण असते. जर वार या भागात असेल तर रक्तदाब वाढल्यास किंवा मार लागल्यास ती सुटू शकते व रक्तस्राव होतो.

गर्भपाताने होणारा रक्तस्राव हा अत्यंत गंभीर व जीवघेणा ठरू शकतो. आपल्याला जखम झाली तर ताबडतोब रक्त जखमेतच साकळते. रक्तातील काही घटक यासाठी आवश्यक असतात. गर्भपातामध्ये हे घटक वारेपाठी जमलेल्या रक्तामुळे घटतात आणि रक्त साकळण्याची क्रिया होत नाही. अशा वेळी जीव वाचवायला रक्त, प्लेटलेट, प्लाझ्मा या सर्वाच्या अनेक युनिट्सची गरज भासते. गर्भालाही यामुळे धोका असतो. नऊ महिने भरण्याच्या आधीच जन्माला आलेले वाढ पूर्ण न झालेले बाळ इन्क्युबेटरमध्ये ठेवावे लागते.

आपण अनेकदा अ‍ॅनिमिया (पंडुरोग)बद्दल ऐकले असेल. गर्भधारणेआधी जर स्त्रीचे हिमोग्लोबीन चांगले असेल आणि जर तिने लोहयुक्त आहार घेतला व लोहवर्धक गोळ्या नेमाने घेतल्या तर या संकटांना ती समर्थपणे तोंड देऊ शकेल.

गर्भारपणात योग्य वेळी सोनोग्राफी झाली असेल तर प्लासेण्टा प्रीव्हिया (खाली असलेली वार) दिसून आलेला असतो. आपले रिपोर्ट माहीत असणे, ते डॉक्टरांना दाखवणे, अशी गुंतागुंत असेल तर मोठय़ा सुसज्ज रक्तपेढी व नवजात बालकांचा कक्ष असलेल्या रुग्णालयात प्रसूतीसाठी जाणे योग्य!

निगेटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तींचे प्रमाण कमी असते. त्यामुळे रक्तपेढीत या गटांच्या रक्ताचा साठा कमी असतो. निगेटिव्ह रक्तगट असलेल्या गरोदर स्त्रियांनी डोनर (रक्तदान करणारे) तयार ठेवणे हे खूप आवश्यक आहे. निगेटिव्ह व्यक्तींच्या भावा-बहिणींचा गट निगेटिव्ह असण्याची शक्यता असल्याने त्यांनाही गट तपासून रक्त दानास तयार करून ठेवावे.

अति उलटय़ा होणे :

सामान्यत: प्रेग्नन्सीच्या पहिल्या दोन-अडीच महिन्यांत गरोदर स्त्रियांना मळमळ, उलटय़ा वगरे होतात आणि तिसरा महिना संपताना त्यांचे प्रमाण घटते. जर अति प्रमाणात उलटय़ा होत राहिल्या तर डिहायड्रेशन (शरीरात पाणी कमी होणे) होते, क्षारांचे प्रमाण घटते व वेळेवर इलाज न झाल्यास लिव्हर, किडनी, नव्‍‌र्हस सिस्टीम (चेता संस्था)वर परिणाम होतात. कुपोषण होऊ शकते. अशा वेळी आय.व्ही.फ्लुइड्ज (सलाइन, ग्लुकोज ई.) चढवावे लागतात.

गर्भजलाची पिशवी अकाली फुटणे :

जुळी किंवा तिळी बाळे असली तर गर्भजल जास्त बनते. तसेच गर्भाशयाचा आकारही अति प्रमाणात वाढतो, गरोदर स्त्रीला मधुमेह असेल तर त्यातसुद्धा गर्भजलाचे प्रमाण अधिक असते, तसेच गर्भाशयाचा आकार अतिप्रमाणात वाढतो. या परिस्थितीत गर्भजलाची पिशवी अकाली फुटण्याची शक्यता असते. पोटाला मार लागला तरीही गर्भजलाची पिशवी फुटण्याची शक्यता असते.

गर्भजलाची पिशवी अकाली फुटणे हे बाळासाठी धोक्याचे असते. बाळ गर्भाशयात गर्भवेष्टन म्हणजे पातळ पापुद्रे असलेल्या पाण्याच्या पिशवीत असते. जर काही कारणाने ही पिशवी फुटली तर पाणी जाऊ लागते. त्यामुळे अकाली प्रसूती वेदना होतात. आई तसेच बाळाला संसर्ग होऊ शकतो. पाणी खूप कमी झाले तर प्रसूती सुरळीत होत नाही. प्रसूतीदरम्यान नाळ (अम्बिलिकल कॉर्ड) दाबली जाऊन बाळाला प्राणवायू कमी पोहोचतो. अशा वेळी सिझेरियन सेक्शनची गरज भासते. दीर्घ काळ पाणी खूप कमी असेल तर बाळाच्या फुप्फुसांवर त्याचा दुष्परिणाम होतो.

बाळाची हालचाल घटणे

जर बाळाला गर्भाशयात प्राणवायूचा पुरवठा कमी होऊ लागला तर त्याची वाढ खुंटते. हे अचानक झाले तर बाळाच्या हालचाली कमी होतात. याकडे दुर्लक्ष झाल्यास अनर्थ ओढवू शकतो. बाळाच्या हृदयस्पंदनांच्या काही तपासण्या, रक्त प्रवाह कसा आहे हे पाहाण्यासाठी डॉपलर सोनोग्राफी करून डॉक्टर इलाज ठरवतात.

अकाली प्रसूतिवेदना: जर दर थोडय़ा मिनिटांनी पाठीत आणि पोटात दुखून पोट घट्ट होऊ लागले तर अकाली प्रसूती होऊ शकते. यासाठी डॉक्टर बहुधा गोळ्या, इंजेक्शने देऊन कळा शमवतात.

प्रिएक्लेम्प्सिआ: शेवटी सर्वात गंभीर आजार म्हणजे गरोदरपणात रक्तदाब वाढून आकडी येण्याचा आजार- प्रिएक्लेम्प्सिआ! हे मातामृत्यूंचे अत्यंत महत्त्वाचे आणि, योग्य इलाजाने मात करता येण्यासारखे कारण आहे. पण त्यासाठी वेळेवर ब्लड प्रेशर वाढत असल्याचे निदान झाले पाहिजे. या आजारात प्रथिने लघवीवाटे बाहेर फेकली जातात, प्रथम पायांना सूज येते. जसजशी प्रथिने कमी होतात तशी सूज सर्वागावर येते. ब्लड प्रेशर वाढून आकडी यायची सूचना मिळते ती तीव्र डोकेदुखी, धुरकट दिसणे, पोटात दुखणे, लघवी कमी होणे या लक्षणांनी!

याकडे दुर्लक्ष झाल्यास शरीराच्या जवळजवळ सर्वच अवयव संस्थांवर दुष्परिणाम होतात व किडनी निकामी होऊन, मेंदूत रक्तस्त्राव होऊन किंवा रक्त साकळण्याची क्रिया बिघडून मृत्यू ओढवतो.

ब्लड प्रेशर व लघवीतले प्रथिन यांची नियमित तपासणी केल्यामुळे लवकर निदान होऊ शकते व जीव वाचू शकतो.

मातृत्व प्राप्त होणे हा सोहळा आहेच, पण त्यापेक्षाही ती मोठी जबाबदारी आहे, स्वत:चे व स्वत:च्या बाळाचे आरोग्य सांभाळण्याची. यात स्त्रीला सर्व कुटुंबीयांचा सक्रिय आधार लागतो. तो तिचा हक्क आहे. म्हणून सप्तपदीवेळी घेतलेली तिच्या संरक्षणाची शपथ विसरता कामा नये.
डॉ. पद्मजा सामंत – response.lokprabha@expressindia.com