08 March 2021

News Flash

‘कशी जाऊ मी वृंदावना..’

रेकॉर्डवर पिन ठेवल्यावर गाणे सुरू होण्याआधीची खरखर  गतरम्यतेत नेते.

 

माझे मन पुन्हा एकदा भावगीत प्रवासाच्या मधल्या टप्प्यात अडकले आहे. आज नवीन आलेली मंडळीही भावगीत पुढे नेत आहेत. फक्त त्याचा रंग-ढंग बदलला आहे. यू-टय़ूबवर गाणे ऐकण्याच्या आजच्या काळातही ग्रामोफोनच्या कण्र्यामधून ऐकू येणारे संगीत कधी विसरता येणार नाही. रेकॉर्डवर पिन ठेवल्यावर गाणे सुरू होण्याआधीची खरखर गतरम्यतेत नेते. या खरखरीत गाणे ऐकण्यासाठी मन सज्ज होई. तेव्हा हेडफोन नव्हते. आज संगीत ऐकण्यात ते मुख्य भूमिका बजावतात. भावगीताच्या सुवर्णकाळातले असंख्य मोती ओंजळीत पकडताना ते हातून निसटू नयेत, बोटांमधून घरंगळू नयेत यासाठीची धडपड ही निखळ आनंद देणारी असते. ‘आणिले टिपूनी अमृतकण’ ही त्यामागची  भावना असते. अशी भावना ज्यांच्या संगीत कारकीर्दीविषयी व्यक्त करता येईल अशांपैकी एक ठळक नाव म्हणजे संगीतकार-गायक स्नेहल भाटकर. गायिका आशा भोसले यांनी भाटकरांकडे गायलेली मोजकी गाणी आठवतात. त्यातील सर्वाधिक लोकप्रिय गीत-

‘कशी जाऊ मी वृंदावना

मुरली वाजवी गं कान्हा।

पैलतीरी हरी वाजवी मुरली

नदी भरली यमुना

कांसे पितांबर कस्तुरी टिळक

कुंडल शोभे काना

काय करू बाई कोणाला सांगू

नामाची सांगड आणा

नंदाच्या हरीने कौतुक केले

जाणे अंतरीच्या खुणा

एका जनार्दनी मनी म्हणा

देवमाहात्म्य कळे ना कोणा।’

गीत सुरू होताना गीताच्या चालीचेच म्युझिक आहे. त्यातून आशा भोसले यांचा कसदार स्वर, रियाजी आवाज श्रोत्यांना गाण्याच्या भावनेत सहजी नेतो. उत्तम स्वररचनेच्या या मधुर भावगीतामध्ये मारुती कीर (तबला), राम कदम (क्लॅरोनेट) आणि पं. पन्नालाल घोष (बासरी) अशी मोठी नावे साथसंगतीला होती.

आशा भोसले यांनी भाटकरांकडे गायलेले आणखी एक गीत..

‘माझ्या वडिलांची मिराशी गा देवा

तुझी चरणसेवा पांडुरंगा।

उपवास पारणे राखिला दारवंटा

केला भोगवटा आम्हा लागी।

वंश परंपरा दास मी अंकिता

तुका मोकलिता लाज कोणा।’

अभिनेते रमेश भाटकर यांच्याकडून त्यांच्या वडिलांच्या.. म्हणजे गायक-संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. स्नेहल भाटकर मूळचे रत्नागिरीजवळील भाटय़े गावचे. लहानपणापासून आईचे गाणे सतत त्यांच्या कानावर पडायचे. घरी मामांना हार्मोनियम शिकवायला मास्तर यायचे. भाटकर या मास्तरांकडूनच हार्मोनियम वाजवायला शिकले. भाटकरांच्या आई त्या काळात व्हर्नाक्युलर फायनल उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांना पुढे शिक्षिकेची नोकरीही मिळाली.

स्नेहल भाटकरांना मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकरी करणे आवश्यक झाले. त्यामुळे एच. एम. व्ही. कंपनीत हार्मोनियमवादक म्हणून ते रुजू झाले. तिथे चित्रपट निर्माते केदार शर्मा आणि निर्माते कारदार भेटले. केदार शर्माच्या चित्रपटातील एका गाण्यासाठी संगीतकार झंडेखान उपलब्ध नव्हते. आणि त्यांना तर गाणे लगेचच संगीतबद्ध करून हवे होते. तेव्हा केदार शर्मानी स्नेहल भाटकरांना ते गीत संगीतबद्ध करण्यास सांगितले. गीत उत्तम झाले. केदार शर्मानी मग भाटकरांना ‘स्वतंत्र संगीतकार म्हणून काम करा,’ असा सल्ला दिला. त्यावेळी केदारजी ‘नीलकमल’ हा चित्रपट करत होते. त्याचे नायक होते राज कपूर. त्यात गायक म्हणून मुकेश आणि गाणी नारायण दत्त यांची होती. मात्र, राज कपूर यांना पहिला प्लेबॅक भाटकरांनी दिला. त्यावेळी ‘बी. वासुदेव’ या नावाने भाटकर संगीतकार म्हणून काम करू लागले. याच काळात भाटकरांना कन्यारत्न झाले. तिचे नाव त्यांनी ‘स्नेहलता’ ठेवले. त्यातील ‘स्नेहल’ हा शब्द म्युझिकल वाटल्यामुळे भाटकरांनी स्वत:साठी ‘स्नेहल भाटकर’ हे नाव घेतले. निर्माते केदार शर्मा यांनी पुढील काळात बरेच चित्रपट केले. ‘सेहमें हुए सितारे’ हा शर्माचा अखेरचा चित्रपट. त्याचे संगीत स्नेहल भाटकरांनीच केले. चित्रपटाचे नायक होते अभिनेते रमेश भाटकर. अभिनेत्री वंदना गुप्ते यांचीही त्यात भूमिका होती. गायक सुरेश वाडकर यांनी त्यात प्लेबॅक दिला होता.

खरे पाहता स्नेहल भाटकर हे भजनीबुवांमधले ‘स्टार परफॉर्मर’ होते. नोकरी करत असतानाच ते भजनांचे कार्यक्रमही करायचे. त्या काळात फुलाजीबुवा, हातिस्करबुवा, साटमबुवा ही मंडळी ‘नावाजलेले भजनीबुवा’ म्हणून प्रसिद्ध होती. भाटकरबुवा भजनांमध्ये स्वत:च्या चाली गायचे आणि त्यात आलाप, ताना, सरगम या शास्त्रीय गोष्टींचाही अंतर्भाव करायचे. त्यांच्या भजनी मंडळाचे नाव ‘विश्वंभर प्रासादिक भजन मंडळी’ असे होते. त्याकाळी भजनांचे कार्यक्रम गावोगावी होत असत. त्यात राम तिरोडकरबुवांच्या नवयुग प्रासादिक भजन मंडळीचे खूप कार्यक्रम होत. एकूणच अशा प्रकारच्या गायनसेवेच्या सुपाऱ्या तेव्हा भरपूर मिळायच्या.

स्नेहल भाटकर यांनी एका बाजूला भजने आणि दुसऱ्या बाजूला सिनेसंगीत या दोन्ही गोष्टी जीव ओतून केल्या. संगीतकार सी. रामचंद्र आणि गीतकार ग. दि. माडगूळकर भाटकरांना ‘बुवा’ म्हणूनच हाक मारायचे. हिंदी संगीतामध्ये भाटकर हे पहाडी संगीताचे ट्रेंडसेटर ठरले. गायिका गीता रॉय यांची पहिली गैरफिल्मी गीतांची रेकॉर्ड भाटकरांच्या संगीतातील आहे. भाटकरांनी ‘गीत शिवायन’ स्वरबद्ध केले. त्यात भावगीत, कटाव, शास्त्रीय रागांवर आधारित गीते असे अनेक प्रयोग केले. एका बाजूला ‘उंचनीच काही नेणे भगवंत..’, तर दुसऱ्या बाजूला ‘कभी तनहाइयों में यूं हमारी याद आएगी..’ असे वेगवेगळे संगीतप्रयोग त्यांनी केले. गायिका राजकुमारी व गायक तलत महमूद यांनी भाटकरांकडे चित्रगीते गायली. ‘राधामाई’ या नाटकासाठी ‘खेळेल का देव माझिया अंगणी..’ हे भाटकरांनी संगीतबद्ध केलेले गीत ज्योत्स्ना भोळे यांनी गायले होते. गायक-संगीतकार दशरथ पुजारी यांनी भाटकरांकडे ‘भविष्य तुमचे उजळायास्तव, वर्तमान मी बळी दिला..’ हे गीत गायले. ‘जे सत्य मानले मी, आभास तो ठरावा, दोघांतला कसा हा साहू अता दुरावा..’ हे गीत अरुण दाते यांनी गायले. तसेच

‘पुनवेचा उगवे चंद्र, नभीचा इंद्र, तमाते जाळी

खेळीया सखा श्रीरंग, राधिके संग, खेळतो रंग,

रंगली होळी..’ हे वेगळ्या बाजाचे गीत रामदास कामत, शरद जांभेकर आणि प्रभाकर कारेकर या तिघांनी गायले. ‘अब जमानें का डर नहीं’ या चित्रपटासाठी भाटकरांनी कविता कृष्णमूर्ती आणि रवींद्र साठे यांच्याकडून गीते गाऊन घेतली. रवींद्र साठे यांनी गायलेल्या गीताचे शब्द होते- ‘मैं कहाँ चलू, मैं किधर चलू, मेरी अपनी कोई डगर नही..’ पण दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण झाला नाही.

गायिका ललिता परुळेकर यांनी लावणी बाजाची दोन गीते भाटकरांकडे गायली. त्यातले पहिले गीत होते-

‘शाळूवरती आलं पाखरु, नका आणू हो फणी

घरधनी होतील ना घायाळ, मंजुळा मुसमुसली ज्वानी।’

आणि दुसरे गीत..

‘कळला रे राया मला, तुला लागलेला छंद

पुन्हा लागी आठविता सैल झाले बाजुबंद।’

गीतकार गंगाधर दांडेकर, संगीतकार प्रभाकर पंडित आणि गायक स्नेहल भाटकर या त्रयीचे एक गीत लोकप्रिय झाले. ते गीत असे..

‘मीलनास आपुल्या साक्ष धवल चंद्रकोर

अक्षता अन् मंत्र नको, नको साक्षी सनई सूर।

का असेल ऋ तू वसंत, मन कोकीळ गाई गीत

रातकिडा देई साथ, छेडुनिया एक सूर।’

स्नेहल भाटकरांनी गायलेले पुढील गीतही रसिकप्रिय झाले..

‘मालिनीच्या जळीं डुले पुढेमागे नांव

वल्हव नाव नाविका, घे भगवन् नांव

श्री भगवन्, जय भगवन् (कोरस)।’

महाभारतात अगस्ती ऋ षींनी केलेल्या समुद्रप्राशनाच्या कथेवरील भाटकरांचे एक गीत खूप गाजले. ते गीत म्हणजे..

‘जंववरी तववरी युद्धाची मात

जंव परमाईचा पूत देखिला नाही बाप।’

तसेच संत ज्ञानेश्वररचित-

‘काटय़ाच्या आणीवर वसले तीन गाव

दोन ओसाड, एक वसेचिना’

या गीतातील ‘वसेचिना’ हा शब्द वेगवेगळ्या चालीत बांधून अधोरेखित झाला आहे.

संत एकनाथ महाराजांची भाटकरबुवांनी गायलेली गवळण कोण विसरेल! ‘वारीयाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले..’ हे गीत तर प्रत्येक संगीतरसिकाला मुखोद्गत आहे. चित्रपटगीतांमध्ये भाटकरांनी गायिका वसुमती दोंदे यांच्यासह गायलेले ‘कशी होती रे माझी आई’ हे गीत तर अफाट लोकप्रिय झाले. भावगीतांपासून चित्रगीतांपर्यंत असे भाटकरांचे लक्षवेधी काम आहे.

वासुदेव भाटकर, बी. वासुदेव, व्ही. जी. भाटकर आणि स्नेहल भाटकर ही चारही नावे एकाच व्यक्तीची आहेत. त्यांचे गायन आणि संगीतरचना या दोहोंेमध्ये स्नेहभाव ओतप्रोत भरलेला आहे. अनेक गोड गाण्यांशी भाटकर या नावाचे नाते आहे. या नावातच स्वरभाव आहे.. भक्तिभाव आहे. यालाच म्हणतात नाममहिमा!

vinayakpjoshi@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2017 2:38 am

Web Title: snehal bhatkar film music composer indian singer asha bhosle
Next Stories
1 ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना..’
2 ‘मालवून टाक दीप..’
3 ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी..’
Just Now!
X