18 January 2019

News Flash

‘पौष्टिक’ पिझ्झा!

पिझ्झाचा सर्वात खालचा भाग म्हणजे ‘बेस’ हा गव्हाच्या पिठाचा असतो.

डॉ. मानसी राजाध्यक्ष

‘पिझ्झा’मध्ये धान्य, फळं, भाज्या, दुधापासून तयार झालेले काही पदार्थ आणि कधी मांस; अशा अनेक आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थाचा समावेश असतो. पण बऱ्याच वेळा ‘पिझ्झा’ हा ‘जंक’ फूड या सदरात गणला जातो. त्यामुळे पिझ्झ्यातले कोणते घटक कधी त्याला ‘जंक’ तर कधी ‘हेल्दी’ फूड बनवतात, याचा जरा विचार करू या!

पिझ्झाचा सर्वात खालचा भाग म्हणजे ‘बेस’ हा गव्हाच्या पिठाचा असतो. त्यातही त्यासाठी मैद्यापेक्षा अख्ख्या गव्हाचं पीठ वापरलं तर आरोग्यासाठी खूप हितावह ठरतं. तेव्हा भरपूर फायबर असलेला ‘होल व्हीट’चा पिझ्झा बेस पिझ्झ्याचा ‘पौष्टिक’ दर्जा उंचावतो. पण मैद्याचा बेसही गव्हातली प्रथिनं आपल्याला मिळवून देतोच, तेव्हा तृणधान्याच्या पिठाचा पिझ्झाचा बेस आपल्यासाठी उत्तमच!

नंतर पिझ्झ्यावर लावला जाणारा टोमॅटो सॉस! मोठय़ा प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असणाऱ्या टोमॅटोसारख्या फळाचा सॉस! त्यातही सॉस तयार करताना त्यात योग्य त्या प्रमाणात मसाले वापरले गेले असतील, तर ते पिझ्झ्याला आणखी गुणकारी बनवू शकतात.

गव्हाच्या पिठाचा बेस, त्यावर उत्तम दर्जाचा टोमॅटोचा सॉस आणि मग त्यावर अनेक भाज्या, फळं किंवा शिजलेल्या मांसाचे तुकडे! त्यातही टोमॅटोचा सॉसच्या वर.. लोह, पोटॅशियम आणि ब, क आणि ड जीवनसत्त्व असलेलं मशरुम; जीवनसत्त्व, क्षार आणि अँटिऑक्सिडंट्स

यांचा उत्तम स्रोत असलेल्या पिवळ्या, लाल, हिरव्या सिमला मिरच्या; ब्रोकोली, झुकिनी, फ्लॉवर आणि अशाच काही इतर भाज्या; किंवा पालकसारखी एखादी हिरवीगार पालेभाजी यांचा मस्त थर, पिझ्झाला रंगीबेरंगी करून आकर्षक तर करतोच, पण त्याची पौष्टिकताही वाढवतो.

या सर्वावर शेवटी चीझची पेरणी! प्रथिन आणि कॅल्शियम यांचा उत्तम साठा असलेलं चीज आपल्या प्रकृतीसाठी जेवढं उपायकारक तेवढंच अपायकारकही ठरू शकतं. पण कोणत्या प्रकारचं चीज आणि ते किती प्रमाणात खाल्लं जातं, यावर त्याचा उपाय किंवा अपाय ठरतो. पिझ्झाचं पौष्टिकत्व राखायचं असेल तर अगदी नेमक्या प्रमाणात आणि उत्तम गुण असलेलं चीज वापरता येतं.

तेव्हा चांगल्या दर्जाच्या ‘होल व्हीट’चा बेस असलेला, सॉस आणि अनेक भाज्या आणि फळं यांनी सजलेला आणि नेमक्या प्रमाणातल्या चीझने नटलेला पिझ्झा हा पूर्णपणे चौरस आहार म्हणूनही खाता येईल. काळजी घ्यायची आहे ती फक्त त्यात असलेल्या घटकांच्या दर्जाची, पौष्टिक मूल्यांची आणि त्यांच्या योग्य त्या प्रमाणांची!

manasi.milind@gmail.com    

chaturang@expressindia.com

First Published on May 19, 2018 12:41 am

Web Title: article on nutritious pizza