Elon musk on twitter 280 character limit : लोकांपुढे व्यक्त होण्यासाठी, माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी ट्विटर हे आघाडीचे व्यासपीठ आहे. लोक मोठ्या प्रमाणात अभिव्यक्तीसाठी ट्विटरचा वापर करतात. ट्विटरनेही लोकांचा वाढता वापर पाहता फीचर्समध्ये बदल केले होते. यात १४० अक्षर मर्यादा (विराम चिन्हांचा समावेश) वाढवून ती २८० करण्यात आली. या फीचरवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मस्क यांनी अधिकृतरित्या ट्विटरची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी या फीचरबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर काही आश्चर्यकारक निर्णय झालेत. मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर कंपनीतून काढले जाऊ शकतात, अशा कर्मचाऱ्यांची यादी बनवण्याचे मस्क यांनी व्यवस्थापकांना सांगितले आहे. तसेच मस्क यांनी कंटेंट मॉडरेशन आणि डिप्लॅटफॉर्मिंग धोरणाचे पुनरावलोकन करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

(मायक्रोसॉफ्ट नंतर गुगलही सोडणार साथ, ‘या’ ऑपरेटिंग सिस्टिम्सना मिळणार नाही क्रोम सपोर्ट)

अमुलाग्र बदलांसह शब्द मर्यादेवर भविष्यात मस्क महत्वाचा निर्णय घेतील, असा अंदाज व्यक्त होतच आहे. अशात, मस्क यांनी देखील एका ट्विटला प्रतिक्रिया देत या फीचरवर सूचक वक्तव्य केले आहे. अक्षर मर्यादेपासून आम्हाला सुटका मिळेल का? किंवा मर्यादा वाढेल का? जे ट्विटरच्या तुलनेत विचॅटमधील एक चांगले फीचर आहे, असे एका युजरने मस्क यांना विचारले होते. त्यावर मस्क यांनी ‘अ‍ॅब्सोल्युटली’ असे म्हणत युजरच्या मतांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावरून अक्षर मर्यादेमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अक्षर मर्यादा हटवण्याबरोबर हे फीचरच काढून टाकले जाऊ शकते, अशी देखील शक्यता आहे. सध्या ट्विटर २८० अक्षर मर्यादेसह ट्विट पोस्ट करण्याची परवानगी देते. या आधी मर्यादा १४० होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये ती वाढवून २८० करण्यात आली. युजरकडून अक्षर मर्यादा वाढवण्याची वारंवार मागणी होते. मात्र, ट्विटरने स्वत:ला संक्षिप्त विचारांचे व्यासपीठ म्हणून संबोधले आहे. यावरच ते ठाम दिसून आले आहे. मात्र, मस्क यांनी ट्विटरची धुरा सांभाळल्यानंतर या फीचरमध्ये काही बदल केले जातील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.