इंटरनेट वापरण्यासाठी गुगलच्या गुगल क्रोम या वेब ब्राउजरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, गुगल आता काही ऑपरेटिंग सिस्टिमवर क्रोम सपोर्ट देण्याचे थांबविणार आहे. गुगलने विडोज ७ आणि विंडोज ८.१ ला २०२३ च्या सुरुवातीपासून क्रोम सपोर्ट देणे बंद करण्याचे जाहीर केले आहे. गुगल सपोर्ट पेजनुसार, क्रोम ११० हे या गुगल ऑपरेटिंग सिस्टिमला सपोर्ट करणारे शेवटचे व्हर्जन ठरेल.

गुगल क्रोम ११० हे ७ फेब्रुवारी २०२३ ला रिलीज होण्याची शक्यता आहे. क्रोम ११० च्या रिलीज नंतर अधिकृतरित्या विंडोज ७ आणि विंडोज ८.१ ला सपोर्ट देण्याचे थांबून जाईल. भविष्यातील क्रोम अपडेट्स मिळण्यासाठी तुमचे उपकरण विंडोज १० किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टिम वापरत आहे, याची तुम्हाला खात्री करावी लागेल, असे गुगलने आपल्या सपोर्ट पेजवर म्हटले आहे.

(एलॉन मस्क यांची अनोखी एन्ट्री, ट्विटर मुख्यालयात चक्क नेले सिंक; बायोडेटाही केला अपडेट)

सपोर्ट पेजनुसार, विंडोज ७ आणि विंडोज ८.१ मध्ये क्रोम काम करेल, मात्र ११० व्हर्जनपुढील अपडेट्स त्यांना मिळणार नाहीत. तुम्ही आता विंडोज ७ किंवा विंडोज ८.१ वापरत असाल तर नवे सिक्युरिटी अपडेट्स आणि क्रोम फीचर मिळण्यासाठी तुम्ही सपोर्टेड विंडोज व्हर्जन वापरा, असा सल्ला सपोर्ट पेजवर देण्यात आला आहे.

दरम्यान, मायक्रोसॉफ्टनेही विडोज ७ इएसयू (एक्सटेंडेट सिक्युरिटी अपडेट) आणि विंडोज ८.१ ला १० जानेवारीपासून सपोर्ट देणे बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टच्या एफएक्यू पेजनुसार, जे संगणक विंडोज ८.१ वर काम करत आहेत ते पुढेही काम करतील, मात्र कंपनीकडून त्यांना कोणतीही तांत्रिक सहायता मिळणार नाही. सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेटच्या अभावाने अशा संगणकांना व्हायरस आणि मालव्हेअरचा धोका राहू शकतो, असे कंपनीचे म्हणणे आहे.