20 January 2018

News Flash

स्मार्ट चॉइस : पोर्टेबल संगीत

गेल्या काही दिवसांत बाजारात आलेली उपकरणे / उत्पादने पाहिली तर एक महत्त्वाची बाब संगीताच्या क्षेत्रातील उपकरणांमध्ये लक्षात येईल, ती म्हणजे ही सर्व आता पोर्टेबल झाली

विनायक परब - vinayak.parab@expressindia.com | Updated: December 11, 2012 2:52 AM

गेल्या काही दिवसांत बाजारात आलेली उपकरणे / उत्पादने पाहिली तर एक महत्त्वाची बाब संगीताच्या क्षेत्रातील उपकरणांमध्ये लक्षात येईल, ती म्हणजे ही सर्व आता पोर्टेबल झाली आहेत. म्हणजेच एका ठिकाणाहून कुठेही दुसरीकडे सहज नेता येतील, अशीच त्यांची रचना करण्यात आली आहे. कंपनी मग ती कोणतीही असो, त्यांनी फिलिप्स किंवा मग जाम्मिन. अलीकडच्या काळात संगीत हा काही केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला अनुभव नाही. सध्याच्या पिढीला ते सर्वासोबत ऐकण्यात आणि त्याची मजा लुटण्यामध्ये आनंद वाटतो. किंबहुना म्हणूनच ही उत्पादने अशा प्रकारची रचना घेऊन बाजारपेठेत आली आहेत.
या पोर्टेबल संगीतामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावतात ते स्पीकर्स. सुमारे १० वर्षांपूर्वी एफएम रेडिओने चांगले मूळ धरले सुरुवातीस एफएम रेडिओचे छोटेसे उपकरण अगदी सहज १०० रुपयांना मिळायचे. नंतर या एफएम रेडिओने थेट मोबाइलमध्येच प्रवेश केला आणि आता तर तो तिथेच रुळला, पूर्णपणे स्थिरावला आहे. इतका की, ब्लॅकबेरीसारख्या केवळ व्यावसायिक फोन असल्याचा दावा करणाऱ्या कंपनीलाही आता त्यांच्या नव्या उत्पादनामध्ये एफएम रेडिओचा समावेश करावा लागला आहे.
या खेपेस टेक- इटमध्ये पाहू या पोर्टेबल संगीताशी संबंधित विविध उत्पादने..

बॅग ऑफ ऱ्हिदम
जाम्मिन कलेक्शन या कंपनीने आता बॅग ऑफ ऱ्हिदम नावाचे उत्पादन बाजारपेठेत आणले आहे. हा खरे तर पोर्टेबल आयपॉड किंवा आयपॅड डॉक आहे. मात्र तो केवळ डॉक नाही तर त्याला स्पीकर्सची जोड देण्यात आली आहे. ४.५ इंचांचे वुफर्स आणि १ इंचाचे ट्विटर्स याला जोडण्यात आले आहेत, त्यामुळे त्याची सुश्राव्यतेची पातळी वाढली आहे. सुरुवातीचा काळ असा होता की, त्या वेळेस आयपॉड किंवा आयपॅड हेच केवळ स्टेटस सिम्बॉल मानले जात होते. मात्र आता ती परिस्थिती कायम राहिलेली नाही. लोक सॅमसंगचा गॅलेक्सी नोट आणि आयपॉड या दोन्हींचा वापर करताना दिसतात. त्यामुळेच केवळ आयपॅड किंवा आयपॉड पुरते आपले उत्पादन मर्यादित ठेवले तर ते खपणार नाही, याची जाणीव या कंपन्यांना झाली असून त्यांनी आता सर्वच उत्पादनांना वापरता येईल, असे चार्जिग डॉक असलेले उत्पादन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. ही बॅग ऑफ ऱ्हिदमदेखील त्याच प्रकारातील आहे. त्यामुळे इतर कंपन्यांच्या उपकरणांच्या चार्जिगसाठीही याचा वापर करता येईल.
यासाठी वापरण्यात आलेल्या बॅगसाठी कॅनव्हासचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ते दिसायला तर छान दिसतेच पण अधिक टिकाऊदेखील आहे. एका ठिकाणाहून इतरत्र कुठेही नेण्यासाठी सोयीचे जावे म्हणून त्याला हॅण्डल्सही देण्यात आली आहेत. थेट कनेक्शन जोडण्याबरोबरच याला वीजपुरवठय़ासाठी बॅटरीचाही पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही प्रवासात असाल आणि आतमध्ये असलेली बॅटरी चार्ज असेल तरीदेखील त्याचा वापर करता येऊ शकेल.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. २५,९९९/-

ऑन द गो – जाब्रा सोलमेट
ब्लूटूथचा वापर सध्या वेगात वाढतो आहे. केवळ मोबाइलमध्येच नव्हे तर इतर उपकरणांमध्येही त्याचा वापर खूप मोठय़ा प्रमाणावर होऊ लागला आहे. खास करून संगीताशी संबंधित उपकरणांतील वापर वाढला आहे, आता स्पीकर्स ब्लूटूथमुळे वायरलेस झाले आहेत. ब्लूटूथच्या क्षेत्रात अग्रणी असलेल्या जाब्रा या कंपनीने आता जाब्रा सोलमेंट हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. हे ब्लूटूथ स्पीकर्स असून त्यामध्ये एक सबवूफर आणि २ ट्विटर्सचा वापर करण्यात आला आहे. त्याचे वजन अवघे ६१० ग्रॅम्स असून त्यामुळे ते प्रवासात अतिशय सोयीचे आहेत. अलीकडे अशा उत्पादनांचा वापर मोटारींमध्ये प्रामुख्याने केला जातो. ते धूळ आणि पाणी यांच्यापासून सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे.
१० मीटर परिसरात असलेल्या कोणत्याही उपकरणाशी ते सहज जोडले जाऊ शकतात. यामध्ये स्पीकरफोनबरोबरच व्हॉइस गायडन्स सिस्टमचाही समावेश आहे. यामध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला असून ती मोबाइलच्या बॅटरीप्रमाणेच रिचार्जेबल आहे. त्यामुळे तिचा वापर तब्बल सलग आठ तासही करता येऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १०,९९०/-

साऊंडमॅटर्स-फॉक्स व्ही एल२
साऊंडमॅटर्सचे हे स्पीकर्स तसे छोटेखानी आहेत. अलीकडे तर काहींना सायकलवरून जाताना किंवा बागेत फिरतानाही गाणी ऐकण्याची सवय असते. प्रत्येक खेपेस काही कानात इअरफोन घालून गाणी ऐकणे प्रत्येकाला आवडतेच असेही नाही आणि तुमच्यासोबत मित्र- मैत्रिणीही असतील, त्यांनीही गाणी ऐकावीत, असे वाटत असेल तर.. तर मग आपल्याकेड पर्याय नसतो. अशा वेळेस साऊंडमॅटर्सचा पर्याय चांगला आहे. फॉक्स व्ही एल २ हे स्पीकर्स आडव्या आकारातील आयताकृती असून सायकलच्या हॅण्डलवरही सहज अडकवता येण्यासारखी त्याची रचना आहे. एरवी एखाद्या ठिकाणी तो ठेवायचा असेल म्हणजे खासकरून तुम्हाला कारमध्ये ठेवायचा असेल तर गचक्यांबरोबर तो मागे-पुढे होऊ नये यासाठी सोबत एक रबर मॅटही असते. त्यामुळे तो एकाच जागी स्थिर राहतो. यात मेगा-बासची सोय नसली तरी आवाजाची सुश्राव्यता चांगली आहे. याला यूएसबी चार्जिगची सोयही आहे. त्यामुळे त्याचा वापर दीर्घकाळ केला जाऊ शकतो.
भारतीय बाजारपेठेतील किंमत  रु. १५,०००/-

लॉजिटेक मिनी बूमबॉक्स
लॉजिटेक ही नावाजलेली कंपनी असून संगणकीय उपकरणांच्या बाबतीत त्यांनी एक विश्वासार्हता प्राप्त केली आहे. त्यामुळे लॉजिटेकच्या स्पीकर्सनाही चांगली मागणी आहे. अनेक घरांमध्ये संगणकासोबत लॉजिटेकचेच स्पीकर्स पाहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या बूमबॉक्सची किंमत तशी किफायतशीर आणि सामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. लॉजिटेकचा माऊस असो किंवा मग स्पीकर्स किफायतशीर किंमत हेच त्यांचे प्रमुख वैशिष्टय़ राहिले आहे. या स्पीकरलाही ते तंतोतंत लागू होते. ब्लूटूथच्या माध्यमातून हा स्पीकर कॉन्फिगर करणे तसे सोपे आहे. तुमच्या आयफोनमधील गाणी किंवा मग तुमच्या मोबाइलमधील गाणी मग या स्पीकरच्या वरच्या भागात देण्यात आलेल्या नेविगेशन स्क्रोलवरून धुंडाळता येतात. याचे कंट्रोल्स टच- सेन्सिटिव्ह आहेत.
आवाजातील बारकावे नसले तरी त्याची सुश्राव्यता काही कमी होत नाही. आवाजाचे अगदीच जाणकार असाल तरच त्यातील कमी जाणवेल. अन्यथा सामान्य श्रोते असाल तर या स्पीकर्सचा पर्याय हा तुमच्यासाठी चांगला आहे. फोन घेण्यासाठी याला हॅण्डस्फ्रीची सोयही देण्यात आली आहे. शिवाय माइकची सोयही आहेच. याला दिलेल्या यूएसबी सुविधेच्या माध्यमातून फोनचे चार्जिगही करता येईल. याची बॅटरी क्षमता तब्बल सात तासांची आहे, हा आणखी एक महत्त्वाचा विशेष.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ४,९९९/-

बोस साऊंडिलक
बोस साऊंडलिंकचा आकार हा जिनेव्हा एक्सएसपेक्षा जवळपास दुप्पट आहे. हा काही तसा प्रवासासाठीचा आकाराने छोटेखानी स्पीकर नाही. मात्र आवाजाच्या बाबतीत याच्या सुश्राव्यतेला तोड नाही. सध्या तरी याच्याइतका उत्तम आवाजाचा स्पीकर दुसरा कोणताही उपलब्ध नाही. कोणत्याही प्रकारच्या वातावरणाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. एरवी पावसात आद्र्रता अधिक असल्याचा परिणाम स्पीकर्सवर होतो. ब्लूटूथच्या माध्यमातून केली जाणारी जोडणीही अतिशय सोपी आणि केवळ एकाच बटनावर उपलब्ध आहे. त्यावर ‘पेअर’ करण्यात आलेली पूर्वीची सहा उपकरणे हा स्पीकर सहज लक्षात ठेवतो. याची किंमत काहीशी अधिक वाटत असली तरी तुम्ही खास कानसेन असाल तर एवढे पैसे खर्च करणे हा तुमच्या आनंद आणि समाधानाचा भाग असेल. याची बॅटरीक्षमताही चांगली पाच तासांची आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १९,०१३/-

First Published on December 11, 2012 2:52 am

Web Title: smart choiceportable music
  1. No Comments.