डिजिटल कॅमेरा ही काही आता फक्त श्रीमंत वर्गाची मक्तेदारी राहिलेली नाही. त्यातही कॅमेरा वापरण्याच्या पद्धतीमध्ये तर गेल्या अनेक वर्षांमध्ये बदल होत गेले आहेत. पूर्वी एखादा समारंभ असेल तर किंवा बाहेर सहलीला जाताना सामान्य माणसे कॅमेरा सोबत न्यायची. मात्र आता तसे राहिलेले नाही. त्यातही तरुण मंडळी तर सतत कॅमेरा सोबत ठेवतात. अपडेशन आणि अपलोड हे त्यांच्या आयुष्यातील परवलीचे शब्द ठरले आहेत. अशा या तरुण पिढीची हीच ओळख आणि सवय लक्षात घेऊन गेल्याच महिन्यात ऑलिम्पस या आघाडीच्या कंपनीने पॉइंट अ‍ॅण्ड शूट प्रकारामध्ये सूपरझूम क्षमता देणाऱ्या कॅमेऱ्यांची मालिकाच भारतीय बाजारपेठेत आणली. त्यातील एस- झेड १६ आयएचएस हे मॉडेल कंपनीने ‘लोकसत्ता’कडे ‘टेक इट’च्या ‘रिव्ह्य़ू’साठी पाठवले होते.
१६ मेगापिक्सेल
खरे तर याचे वैशिष्टय़ हे त्याच्या नावामध्येच दडलेले आहे. १६ मेगापिक्सेल आणि सपुरझूम. पण सुपरझूम म्हणजे नेमके किती ते समजून घेणे महत्त्वाचे ठरावे. गेल्या काही वर्षांमध्ये १० मेगापिक्सेल हे स्टँडर्ड झाले होते. ते आता १६ मेगापिक्सेलकडे सरकले असून आताच्या बाजारपेठेत तेच स्टँडर्ड मानले जाते. हा पॉइंट अ‍ॅण्ड शूट कॅमेरा तुम्हाला आताचे स्टँडर्ड म्हणजेच १६ मेगापिक्सेल क्षमता देतो.
सुपरझूम हेच वैशिष्टय़
या कॅमेऱ्याच्या १६ मेगापिक्सेल क्षमतेला २४ एक्स झूमची सोय आहे. २४ एक्स म्हणजेच साधारणपणे ६०० मिमी. झूम क्षमता. प्रवासी किंवा सहलीसाठी ही खूप क्षमता झाली. खरे तर एवढय़ा क्षमतेच्या व्यावसायिक लेन्सेस व्यावसायिक छायाचित्रकार वापरतात. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये बर्डिंगचे किंवा वन्यजीव चित्रण करण्याचे एक मोठे वेड समाजामध्ये रुळते आहे.आपण वन्यजीव चित्रण करतो, असे सांगण्यात अनेक जण धन्यता मानतात. मग वन्यजीव चित्रण करायचे असेल तर एवढी मोठी क्षमता असलेली लेन्स हवीच हवी.
वाइड अँगल
म्हणजेच तुम्ही या कॅमेऱ्यावर चित्रण करताना लेन्सचा वापर पूर्ण क्षमतेत करता तेव्हा तो २५-६०० मिमी. या क्षमतेचा वापर असतो.
अर्थातच हे सारे ३५ मिमी.च्या फॉरमॅटमध्येच होत असते. २५ मिमी.मध्ये एखाद्या गोष्टीचे चित्रण करताना आपल्याला पूर्ण वाइड अँगलमध्ये चित्रण केल्याचा अनुभव घेता येतो. खासकरून इंटिरीअर किंवा एखाद्या घरात अथवा हॉलमध्ये असलेल्या समारंभातील चित्रण करताना याचा फायदा होऊ शकतो.
 प्रकाशातील छायाचित्रे चांगली
त्यामुळे प्रत्यक्ष जंगलात आणि मुंबई जवळ घारापुरी लेणींच्या परिसरात जाऊन ही क्षमता वापरून पाहिली. त्यावेळेस असे लक्षात आले की, भरपूर अर्थात पुरेसे ऊन असेल त्यावेळेस याची पूर्ण क्षमता वापरल्यानंतरही छायाचित्रे चांगली येतात. पिक्सेलचा आकार फारसा फाटत नाही. ही चांगली गोष्ट आहे. मात्र उन थोडे कमी झाले किंवा प्रकाश कमी असेल तर मात्र त्याचा परिणाम चित्रणाच्या सुस्पष्टतेवर निश्चितच होतो. उन अर्थात प्रकाश चांगला असेल तर यामध्ये असणारा पॅनोरमा मोडही चांगले काम करतो. म्हणजेच त्याच्यावर असलेला पॅनोरमा आपल्याला सुस्पष्ट चित्रण देतो.
ट्रुपिक फाइव्ह
या चांगल्या सुस्पष्ट चित्रणामागची महत्त्वाची बाब म्हणजे १६ मेगापिक्सेल सीमॉस सेन्सरला ट्रुपिक फाइव्ह या चांगल्या इमेज प्रोसेसरची जोड मिळाली आहे. त्यामुळेच कॅमेऱ्याच्या वेगामध्येही चांगला बदल झालेला दिसतो. चित्रण वेगवान पद्धतीने करता येते.
फूल एचडी व एचडीएमआय
फूल एचडी व्हिडिओ चित्रण हे याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़. त्यासाठी याला उजव्या हाताच्या बाजूस वरती एक स्वतंत्र बटन देण्यात आले आहे. १०८०पी क्षमतेने हे व्हिडिओ चित्रण केले जाते. शिवाय त्याला एचडीएमआय आऊटपूटची सोय देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही केलेले चित्रण थेट टीव्हीवरही पाहू शकता.
डय़ुएल इमेज स्टेबिलायझेशन
या कॅमेऱ्यामध्ये आणखी एक महत्त्वाची सोय आहे, ती म्हणजे डय़ुएल इमेज स्टेबिलायझेशन. सर्वसाधारणपणे आपण झूम मोडवर चित्रण करतो त्यावेळेस आपला हात स्थिर असावा लागतो. अन्यथा चित्र हललेले किंवा अस्पष्ट असे दिसते. त्यासाठीच अनेकदा झूम मोडवरील चित्रणासाठी ट्रायपॉड वापरला जातो. पण या कॅमेऱ्याला डय़ुएल इमेज स्टॅबिलायझेशनची सोय देण्यात आली आहे. त्यामुळेच हात किंचित हलला तरी चित्रण मात्र सुस्पष्टच येते. याचा फायदा सामान्य रसिकांना होऊ शकतो.
अँटी ग्लेअर एलसीडी
मागच्या बाजूस याला ३ इंचाचा एलसीडी स्क्रीन देण्यात आला आहे. तो अँटी ग्लेअर असल्यामुळे भर उन्हात चित्रण करून नंतर ते एलसीडीवर पाहताना त्रास होत नाही.
सीन मोड
या काही विशेष बाबी वगळता हल्ली इतरत्र सर्व कॅमेऱ्यांमध्ये देण्यात येणाऱ्या इतर सुविधाही या स्टायलस मालिकेतील कॅमेऱ्यांमध्ये ऑलिम्पसने दिल्या आहेत. त्यात सीन मोडचा समावेश आहे. या मोडमध्ये क्रीडा, सनसेट, नाइट पोर्ट्रेट, इंटेलिजन्ट ऑटो, ब्युटी मोड, पॅनोरमा अशा सोयीही देण्यात आल्या आहेत.
इंटेलिजन्ट ऑटो
या मोडचा वापर हल्ली सर्वाधिक केला जातो. यामध्ये विषय, उपलब्ध प्रकाश आदी सारे पाहून कॅमेराच त्यामध्ये असलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने सुयोग्य अशा मोडची निवड करतो. आणि मग तुम्ही बटन क्लिक् करता तेव्हा कॅमेऱ्याने निवडलेल्या मोडमध्ये चित्रण केले जाते. या शिवाय सीनमध्ये लँडस्केप, सेल्फ पोर्ट्रेट, फायरवर्क्‍स, बीच, स्नो, डॉक्युमेंटस्, पाळीव प्राणी आदी मोडस्ही आहेतच मदतीला.
सुपर मायक्रो
सुपर झूम प्रमाणेच या कॅमेऱ्यात सुपर मायक्रो हा मोडही देण्यात आला आहे. क्लोज अप टिपताना याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी लेन्स आणि विषय यातील अंतर ३ सेंमी. असावे लागते.
डिजिटल झूम
डिजिटल झूमचा वापर करताना मात्र काहीसा परिणाम चित्राच्या सुस्पष्टतेवर होतो, असे या रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले. त्यात उन किंवा प्रकाश कमी असेल अशा अवस्थेत तर चित्रण न केलेलेच बरे, असे वाटू शकते. मात्र चांगले उन असताना याचा वापर करण्यास हरकत नाही.
हायस्पीड शूटिंग
३ फ्रेम्स प्रतिसेकंद या वेगात या कॅमेऱ्यावर चित्रण करता येते. रिझोल्युशन कमी केलेत तर सेकंदाला ३० फ्रेम्स या वेगातही चित्रण करणे शक्य होते.
हॅण्डहेल्ड स्टारलाइट मोड
हा मोड ही देखील एक चांगली सु विधा आहे. कमी प्रकाश असताना किंवा रात्रीच्या वेळेस या मोडमध्ये चित्रण करणे फायद्याचे ठरू शकते. कारण यात हात सतत हलता असल्याने वेगवेगळी छायाचित्रे टिपली जातात आणि मग ती कॅमेऱ्यामध्येच एकत्र जोडून आपल्याला चांगले चित्र मिळण्याची सोय यात आहे.
आयएसओ
नॉर्मल असलेल्या १०० पासून ते ६४०० आयएसओपर्यंत शूट करण्याची सोय यात आहे. याशिवाय श्ॉडो अ‍ॅडजस्टमेंट तंत्रज्ञान, ऑटोफोकस ट्रॅकिंग, पॅनोरमा आदी सुविधाही यात आहेत.
मॅजिक फिल्टर्स
हल्ली अनेकांना आवडणारी सुविधा म्हणजे मॅजिक फिल्टर्स. त्यातही ऑलिम्पसचे मॅजिक फिल्टर्स उत्तम काम करतात, असा अनुभव आहे. त्याचाच प्रत्यय या मॉडेलमध्येही येतो. पॉप आर्ट, पिन होल, फिशआय, सॉफ्ट फोकस, पंक, स्पार्कल, वॉटरकलर, मिनीएचर, रिफ्लेक्षन, ड्रामॅटिक, फ्रॅग्मेंटेड असे विविध फिल्टर्स यात देण्यात आले आहेत.
निष्कर्ष
बाजारपेठेत असलेली सूपरझूम कॅमेऱ्यांची उणीव या कॅमेऱ्याने भरून काढली आहे. त्याची किंमतही किफायतशीर आहे. उन असतानाची चांगली छायाचित्रे हे वैशिष्टय़ असले तरी प्रकाश कमी झाल्यानंतर मात्र क्षमतेवर परिणाम झालेला दिसतो. सहलीला जाणाऱ्या आणि अपडेटस्मध्ये रमलेल्या हौशी छायाचित्रकारांसाठी हा कॅमेरा म्हणजे गंमतीची पर्वणी ठरू शकते. पण गांभीर्याने चित्रणाकडे पाहात असला तर कदाचित वेगळा पर्याय शोधावा लागेल.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. २१,९९०/-