ऐंशी लाख पिक्सेल्सचा टीव्ही घराघरात पोहोचू लागला आहे. यामुळेच या टीव्हीची किंमत दिवसागणिक कमी होऊ लागली आहे. चित्रपट, मालिका, अ‍ॅनिमेशनपट यांच्या निर्मिती प्रकियेत ज्याप्रमाणे उच्च तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. तो अनुभव घरबसल्या घेण्यासाठी चांगला टीव्ही असणे आवश्यक आहे. यामुळेच थ्रीडी, एचडी याहीपलीकडे जाऊन आता फोर के टीव्ही बाजारात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांत या टीव्हीना महानगरांमधून चांगली मागणी वाढू लागली आहेत. सध्या बाजारात कोणते फोर के टीव्ही उपलब्ध आहेत ते पाहुयात.

सॅमसंग केएस ९५००एस

सर्वोत्तम ब्राइटनेस अशी खासियत असलेला हा टीव्ही आहे. केवळ सर्वोत्तम ब्राइटनेस नव्हे तर या टीव्हीमध्ये सॅमसंगने उच्च दर्जाची बॅक लाइटिंग प्रणाली वापरली आहे. याचबरोबर यात क्वांटम डॉट तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे टीव्हीचा ब्राइटनेस अधिक प्रभावीपणे काम करतो. तसेच यामुळे व्हिडीओमधील रंगसंगतीही अधिक प्रभावीपणे दिसते. यामुळे या टीव्हीवर अल्ट्रा एचडी ब्लू रे फॉरमॅटमधील व्हिडीओ पाहणे म्हणजे रसिकांसाठी एक पर्वणीच ठरते. अर्धवर्तुळाकार असलेल्या या टीव्हीमध्ये थ्रीडीची सुविधा देण्यात आलेली नाही. यामुळे जर तुम्हाला थ्रीडी चित्र पाहायची असतील तर त्याचा अनुभव यात घेता येणार नाही. हा टीव्ही ६५ इंच, ७८ इंच व ८८ इंच या आकारांमध्ये उपलब्ध आहे.

पॅनासॉनिक डीएक्स ८०२

परवडणाऱ्या दरात एचडीआर आणि फोरकेचा अनुभव देणारा टीव्ही म्हणून या टीव्हीकडे पाहिले जाते. यामध्ये चांगल्या दर्जाचा ब्राइटनेस आणि स्थानिक कॉन्ट्रास्ट देण्यात आला आहे. पण एचडीआरचा पुरेपूर अनुभव घेण्यासाठी यातील ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्टची क्षमता अपुरी पडते. तसेच सर्वोच्च पातळीवरील अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला टीव्हीमधील बॅक लाइटवर नियंत्रण आणावे लागते. कारण त्यात काळा रंग अधिक प्रभावीपणे दिसू लागतो. पण एलसीडी आणि एलईडी टीव्हीचा वापर करणाऱ्या दर्शकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारा हा टीव्ही फोर केचा उत्तम अनुभव देऊ शकतो. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या चित्रफितींमध्ये तसेच चित्रीकरणाच्या तंत्रातून निर्माण होणारी कलाकृती पाहण्यासाठी हा टीव्ही अगदी योग्य आहे. या टीव्हीसोबत एक साऊंडबार मोफत देण्यात आला आहे. यामुळे परवडणाऱ्या दरात चित्र आणि आवाज या दोन्हींचा अनुभव घेण्यासाठी हा टीव्ही योग्य ठरू शकतो.

एलजी ओएलईडी६

गेल्या दोन वर्षांमध्ये ओएलईडी टीव्हीची चर्चा बाजारात सुरू आहे. मात्र एलजीने आत्तापर्यंत बाजारात दाखल झालेल्या ओएलईडी टीव्हीपेक्षा वेगळा प्रयोग केला आहे. एलजीने बाजारात आणलेली ओएलईडी६ मालिकेतील टीव्हीची जाडी अगदी कमी करण्यात आली आहे. यामुळे ध्वनिचित्र पाहात असताना आवश्यक असलेला कॉन्ट्रास्ट या टीव्हीमध्ये उत्तम प्रकारे जाणवतो. या टीव्हीमध्ये प्लाझ्मा, एलसीडी आणि ओएलईडी टीव्हीमधील तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे चित्र अधिक स्पष्ट दिसते. तसेच त्याची रंगसंगती रसिकाला मोहात पाडते. पण हा टीव्ही एचडीआर ध्वनिचित्राला अधिक चांगल्या प्रकारे झळकावू शकत नाही. यामुळे या टीव्हीमधील ही त्रुटी ब्लूरेफितीवरील मालिका पाहणाऱ्याला प्रकर्षांने जाणवू शकतात. पण घरातील सामान्य रसिकांना हा टीव्ही मोहात टाकणारा आहे. याच मालिकेत फोर के टीव्हीही उपलब्ध असून त्यात थ्रीडी आवाजासह चित्र पाहण्याची विशेष सुविधा देण्यात आली आहे. हा टीव्ही ५५ आणि ६५ इंच आकारात उपलब्ध आहे.

सोनी केडी ७५एक्सडी ९४०५

सोनी आणि उत्तम चित्र आणि आवाज हे म्हणजे टीव्हीचे एक गूणसूत्रच मानले जाते. हीच खासियत कंपनीने स्मार्ट टीव्हीमध्येही कायम ठेवली आहे. सोनीने ७५ इंचाचा स्मार्ट टीव्ही बाजारात आणला आहे. सोनीचा हा अ‍ॅण्ड्रॉइड टीव्ही तुम्हाला घरात चित्रपटगृहासारखा अनुभव देतो. यामध्ये एचडी टीव्हीपेक्षा चौपट जास्त पिक्सेल्स देण्यात आले आहेत. याचबरोबर सोनीची खासियत असलेले ‘ट्रायमिनोस वाइड कलर स्पेक्ट्रम तंत्रज्ञान’ आणि थेट एलईडीमधून काम करणारा चांगल्या दर्जाचा कॉन्ट्रास्ट ही या टीव्हीची विशेष खासियत आहे. यामुळे रंग व चित्राचे आकार याचा योग्य ताळमेळ घातला जात असल्यामुळे चित्र अधिक उत्तम प्रकारे दिसते. यामध्ये अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आल्यामुळे आपला मोबाइल जोडून त्याचा वापरही टीव्हीच्या माध्यमातून करू शकतो. तसेच अ‍ॅण्ड्रॉइड प्रणालीवर चालणारे विविध अ‍ॅप्सही या टीव्हीवर वापरता येऊ शकतात.

फिलिप्स ६५ पीयूएस ७६०१

परवडणाऱ्या दरात सर्वोत्तम बॅकलाइट नियंत्रित असलेला फिलिप्सचा हा फोर के टीव्ही २०१६ वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रात आश्चर्याचा धक्का होता. या टीव्हीमध्ये अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आली आहे. यामुळे हा केवळ फोर के डिस्प्ले टीव्ही न राहता स्मार्ट टीव्हीही झाला आहे. एचडीआरचा अनुभव घेण्यासाठी आवश्यक असलेले ‘डीसीआय-पी३’ हे तंत्रज्ञानही यामध्ये वापरण्यात आले आहे. या टीव्हीचे वैशिष्टय़ म्हणजे या टीव्हीला थेट एलईडी बॅकलाइट वापरण्यात आले आहेत. ज्याच्यामुळे एचडीआरचा चांगला अनुभव घेता येतो.

– नीरज पंडित

nirajcpandit   Niraj.pandit@expressindia.com