आपण सर्वचजण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत असतो. ही काळजी घेण्यात आपले डॉक्टर आपल्यासोबतच असतात. पण तंत्रज्ञानाच्या मदतीने आता आपण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेऊ शकणार आहोत. यासाठी बाजारात विविध कंपन्यांनी हेल्थ बँड आणले आहेत. हे बँड्स आपल्या हृदयाचे ठोके मोजण्यापासून ते आपण दिवसभरात किती कॅलरीज गमावल्या या साऱ्याचा हिशेब ठेवतात. ज्याप्रमाणे मोबाइल हा आपला सोबती झाला आहे, तसेच येत्या काळात हे हेल्थ बँड आपले आरोग्य सोबती होऊ शकणार आहेत. पाहूयात बाजारात उपलब्ध असलेल्या दीड हजार रुपयांपर्यंतच्या हेल्थ बँडविषयी.

झेब फिट १००

झेब्रॉनिक्स या कंपनीने नुकताच झेब फिट 100 हा हेल्थ बँड बाजारात आणला आहे. या बँडची खासियत म्हणजे हा बँड वजनाने हलका असून यामध्ये १.२४ इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. या स्क्रीनमध्ये आपल्यालाला बँडमधील सर्व माहिती दिसते. हा बँड वापरण्यासाठी आपल्याला प्रथम झेब फिट हे अ‍ॅप डाउनलोड करून घ्यावे लागते. अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी हेल्थ बँडच्या खोक्यात क्यूआर कोड देण्यात आला आहे. जेणेकरून अ‍ॅप बाजारात अ‍ॅपचा शोध घेण्यापेक्षा क्यूआर कोडच्या माध्यमातून अ‍ॅप डाउनलोड करणे सोपे जाते. या अ‍ॅपमध्ये आपल्याला आरोग्याचा तक्ता दिसू शकतो. बँडमध्ये देण्यात आलेल्या स्क्रीनमध्ये आपल्याला सतत वेळ दिसत असते. जेव्हा आपण बँडवर देण्यात आलेले एकमेव बटन वापरतो तेव्हा आपण किती कॅलरीज गमावल्या याचा तपशील मिळतो, तर पुढे आपण किती अंतर चाचलो, किती पावले टाकलीत हाही तपशील मिळतो. हा सर्व तपशील बँडच्या अ‍ॅपमध्येही साठवला जातो आणि आपल्याला हा तपशील पाहिजे तेव्हा उपलब्ध होऊ शकतो. या बँडची आणखी एक खासियत म्हणजे आपण झोपताना हा बँड स्लीपमोडवर ठेवला की आपल्या झोपेचा दर्जाही हा बँड सांगतो. आपल्याला आवश्यक असलेली झोप पूर्ण झाली की नाही याबाबतही हा बँड आपल्याला सांगत असतो. या बँडमध्ये एकच त्रुटी जी प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे यामध्ये जीपीएस आणि हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणतीही यंत्रणा दिलेली नाही.
किंमत – १४१४ रुपये

मी बँड

फोन बाजारात अधिराज्य गाजवणाऱ्या शिओमीच्या मी याच ब्रँडचा आरोग्य बँडही भारतीय बाजारात दाखल झाला आहे. सध्या भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या बँड्समध्ये सर्वात स्वस्त बँड हा याच कंपनीचा आहे. पण हा स्वस्त असल्यामुळे यामध्ये सुविधाही तशा कमी आहेत. या बँडला स्क्रीन नसल्यामुळे आपल्याला मोबाइलशी जोडून राहणे हे बंधकारक आहे. हा बँड लावल्यावर आपल्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते, तसेच आपले लक्ष वेधून घेण्यासाठी तो व्हायब्रेटही होतो. या ट्रॅकरमध्ये नेमक्या कोणत्या हालचालींचा तपशील नोंदविला गेला आहे हे आपल्याला जाणून घेण्यासाठी मी अ‍ॅप डाउनलोड करावे लागते. यामध्ये जीपीएस प्रणाली देण्यात आली आहे. तसेच हा बँडही आपल्या झोपेतील हालचाली टिपतो. यामुळे केवळ स्क्रीन नसणे हा भाग वगळता या बँडमध्ये इतर सर्व बँड्ससारख्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. या बँडची सर्वात मोठी खासियत म्हणजे याला चांगल्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे हा बँड चार्ज झाल्यानंतर १५ ते २० दिवस काम करू शकतो.

 किंमत – ७९९ रुपये

यू फिट

भारतीय स्मार्टफोन उत्पादन कंपनीने विकसित केलेला हा पहिला भारतीय बनावटीचा हेल्थ बँड आहे. यामध्ये आपल्याला मी बँडसारखीच सुविधा देण्यात आली असली तरी यावर लंबगोल स्क्रीन देण्यात आला आहे. ज्यामध्ये आपल्याला वेळ आणि इतर तपशील समजू शकतात. या बँडमध्ये आपण दिवसभरात किती कॅलरीज गमवायच्या आहेत हे उद्दिष्ट निश्चित केले की ते पूर्ण होईपर्यंत सतत आपल्याला आठवण करून दिली जाते. यामध्येही आपल्या झोपेचा दर्जा ओळखण्याची क्षमता आहे. याशिवाय यातील रिमोट वापर तंत्रज्ञानानामुळे फोनमधील रिंग, व्हिडीओ किंवा इतर गोष्टी वापरू शकतो. याशिवाय हा बँड आपल्याला फोन आल्याची सूचनाही देतो. याची बॅटरीची क्षमताही चांगली असून तो दहा दिवस काम करू शकतो.

 किंमत – ९९९ रुपये

नीरज पंडित – Niraj.pandit@expressindia.com