04 August 2020

News Flash

शब्दांचे खेळ

विज्ञान क्षेत्रातील टेलर नावाचा एक शिकाऊ उमेदवार आपल्या वरिष्ठांसोबत चंद्रावर जातो.

गेम्स जे आपल्याला मनोरंजनासोबतच थोडसं डोकं चालवायलाही भाग पाडतात.

मोबाइल गेम्स किंवा एकूणच संगणक गेम्स म्हटले की भडक रंग, वेगवेगळे इफेक्ट्स, हाणामारी, जलद पळणे, जलद गाडी पळवणे असे एक ना अनेक गेम्सच्या स्क्रीन्स आपल्या डोळ्यासमोरून जातात. या सर्व गेम्समुळे काही चांगले अर्थात ज्या गेम्समध्ये विचार करावा लागतो किंवा जे गेम्स शब्दांशी संबंधित आहेत असे सर्व गेम्स पुरते झाकोळले गेले आहेत. अशा गेम्समध्ये चांगले चित्र आणि आवाज नसतात. मात्र त्या गेम्सच्या माध्यमातून एखादा वैज्ञानिक सिद्धांत असेल किंवा एखादी प्रसिद्ध कथा असेल ती आपल्या समोर उभी राहते. पाहुयात असे काही गेम्स जे आपल्याला मनोरंजनासोबतच थोडसं डोकं चालवायलाही भाग पाडतात.

लाइफलाइन

विज्ञान क्षेत्रातील टेलर नावाचा एक शिकाऊ उमेदवार आपल्या वरिष्ठांसोबत चंद्रावर जातो. तेथे त्यांचे अंतराळयान क्रॅश होते. तेथे तो एकटा अडकलेला असतो. मग तो मदतीसाठी पृथ्वीवरील केंद्रावर संपर्क साधतो. त्यावेळेस तुम्ही त्याला मार्गदर्शन करून तेथून सुरक्षितपणे बाहेर काढायचे असते. अशा प्रकारचा  एक वेगळाच अनुभव देणारा हा गेम आहे. या गेममध्ये आपण संदेश पाठविण्यासाठी ज्याप्रमाणे शब्दांचा वापर करतो. तशाच प्रकारे शब्दांचा वापर करून टेलरला मार्गदर्शन करायचे असते. तुमच्यासमोर मांडण्यात आलेल्या परिस्थितीतून तुम्ही जे निर्णय घ्याल त्या निर्णयावर टेलरचं जगणं किंवा मृत्यू अवलंबून असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला विज्ञानातील थरारक गोष्ट अनुभवायची असेल तर हा गेम खरोखरच त्यासाठी उत्तम आहे.

अ‍ॅप कुठे उपलब्ध – आयओएस आणि अँड्रॉइडवर

स्कोरी

शब्द आणि चित्र यांचा उत्तम मिलाप असलेला हा गेम आपल्याला पुस्तक वाचनाचा आनंद देतो. यामध्ये आपण निवडलेल्या वाक्यावरून प्रत्येक वेळी गेमची पुढची पायरी अवलंबून असते. यामुळे तुम्ही कोणत्या वेळी कोणते वाक्य निवडतात हे महत्त्वाचे ठरते. यातही अनेक कथा देण्यात आल्या असून त्यातील वाक्यांवरून खेळाची संपूर्ण रचना आहे.

अ‍ॅप कुठे उपलब्ध- आयओएस आणि अँड्रॉइडवर

अ डार्क रूम

अ‍ॅप बाजारात हा गेम्स या सदरात मोडतो खरा. पण या अ‍ॅपकडे आपण पाहिले तर आपल्याला कुठल्याही बाजूने तो एक गेम आहे असे वाटणार नाही. कारण हे अ‍ॅप पूर्णत: विविध शब्दांनी भरलेले आहे. यात चित्रांचा पूर्णत: अभाव आहे. मात्र या गेममध्ये विज्ञानकथा उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. यात आपल्याला काही पात्र देण्यात आली आहेत आणि काही सूचक वाक्य देण्यात आली आहेत. ही वाक्य जुळवत आपल्याला विज्ञानकथा साकारायची आहे. अर्थात या गेममध्ये एकही फोटो नसल्यामुळे आपल्याला तो स्क्रीनवरील त्याचे बेढब दिसणे सहन करावे लागते. पण एकदा का आपण या खेळात रमत गेलो की विविध टप्पे पार केलेच म्हणून समजा. जसे तुम्ही टप्पे पार करत जाता तसे तुम्हाला विज्ञानकथांचा उलगडा होत जातो.

अ‍ॅप कुठे उपलब्ध – आयओएस आणि संकेतस्थळ

आऊट देअर

हृतिक रोशनच्या कोई मिल गया या चित्रपटात एक परग्रहावरील जीव दाखविण्यात आला आहे. अशा प्रकारच्या अ‍ॅलीयनशी आपल्याला या गेमच्या माध्यमातून संवाद साधायचा आहे. ते फक्त त्यांचीच भाषा बोलू शकतात. यामुळे त्यांचा संवाद ऐकून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे हे समजून आपल्याला आपली खेळी खेळावी लागणार आहे. एखाद्या चित्रकथांच्या पुस्तकाप्रमाणे या गेमचे स्वरूप आहे. याशिवाय हे सर्व संवाद चालू असताना तुम्हाला अंतराळयानासारखे विविध सुरक्षित पर्याय निवडून पुढचा प्रवास करावयाचा असतो. यामुळे या गेममध्ये विज्ञानकथा असली तरी तो थरारकही ठरतो.

अ‍ॅप कुठे उपलब्ध- आयओएस आणि अँड्रॉइडवर

रायन नॉर्थज टू बी ऑर नॉट टूबी

शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकावर आधारित हा गेम आहे. अतिशय कलात्मकरित्या विकसित करण्यात आलेल्या या गेममध्ये आपल्याला हॅम्लेट नाटकातील विविध पात्रांची भूमिका करता येते आणि कथेत पुढे काय होईल हे ठरविण्याची मुभाही यात मिळते. यात तुम्ही हॅम्लेटची भूमिका साकारू शकता किंवा ओफिलिआ म्हणूनही तुम्ही हा गेम खेळू शकता.

अ‍ॅप कुठे उपलब्ध- आयओएस आणि अँड्रॉइडवर

चॉइस ऑफ रोबोज

गेमबुक नावाचा नवीन प्रकार गेम बाजारात येऊ घातला आहे. याच प्रकाराचे उत्तम उदाहरण म्हणजे हा गेम आहे. ‘चॉइस ऑफ’ या इंग्रजी कादंबरीच्या मालिकेतील रोबो ही मालिका या गेमच्या रूपाने सर्वासमोर आणली आहे. ही मालिका खूप संवादात्मक आहे. यामध्ये आपण महत्त्वाची भूमिका बजावर असून आपण आपले आयुष्य रोबो विकसित करण्यात घालविलेले असते. आता हे विकसित रोबो माणसाचा उपद्रव करण्यासाठी कामी आणायचे की माणसाला मदत करण्यासाठी उपयोगात आणायचे हे आपण ठरवायचे आहे. चित्र किंवा आवाज नसलेल्या या खेळात केवळ लिखित संवादाच्या माध्यमातून आपल्याला गेममधील रोबोवर नियंत्रण आणायचे आहे.

अ‍ॅप कुठे उपलब्ध- आयओएस आणि अँड्रॉइडवर

नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2017 1:17 am

Web Title: best mobile app game to experience thrilling in science
Next Stories
1 टेक-न्यूज :  ‘नोकिया ५’मध्ये जास्त ‘रॅम’
2 टेक-नॉलेज : बारकोड रीडर
3 फिट्टम‘फिट’
Just Now!
X