मोबाइल येण्यापूर्वी बहुतांश घरात फोन नंबर्सची एक डायरी नक्की असायचीच. आजही अनेकांकडे अशा डायऱ्या असतात. या डायऱ्यांच्या सुरुवातीला किंवा शेवटी आपल्याला महत्त्वाच्या एसटीडीकोड्सची यादी दिलेली असते. त्यामुळे हे कोड आपल्याला पाठ करावे लागत नाहीत. परंतु असे अनेक प्रकारचे कोड्स किंवा नंबर्स असतात ज्यांची आपल्याला मधून मधून आवश्यकता भासत असते. जसे की, एखाद्या ठिकाणचा पिनकोड, बँकेचा आयएफएससी कोड किंवा एमआयसीआर कोड वगैरे.
असे हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिले गेलेले कोड लक्षात ठेवणे मोठे कठीण काम आहे. परंतु आता हे काम ‘इंडिया कोड फाइंडर’ India code finder) या अ‍ॅपमुळे अगदी सोपे झाले आहे. आरटीजीएस आणि एनईएफटी या पेमेंट सिस्टीमसाठी आपल्याला बँकेचा आयएफएससी कोड आवश्यक असतो. बँकेच्या प्रत्येक शाखेचा स्वत:चा असा एक आयएफएससी कोड असतो. आता देशभरातील १२८ बँकांच्या १ लाख ८० हजार शाखांचे आयएफएससी किंवा एमआयसीआर कोड या अ‍ॅपद्वारे सहज शोधता येतात.
बँकेचे, राज्याचे आणि शहराचे नाव टाकले की त्या शहरातील सर्व शाखांची यादी मिळते. तुम्हाला शाखेचे नाव माहीत असेल तर ते टाकूनदेखील शोधू शकता. तुम्हाला अपेक्षित असलेल्या शाखेचा तपशील बघण्यासाठी त्यावर क्लिक करा. शाखेचा आयएफएससी कोड आणि एमआयसीआर तुम्हाला दिसेल. शाखेचा पत्ता आणि उपलब्ध असल्यास फोन नंबरदेखील मिळेल. हा तपशील तुम्ही एसएमएस करू शकता किंवा शेअर करू शकता.
इतकेच नव्हे तर आपण टीव्हीवरील विविध वाहिन्यांचे डीटीएच किंवा केबल पुरवठादार कंपन्यांकडील क्रमांक आपल्याला या अ‍ॅपच्या माध्यमातून समजतात. याच अ‍ॅपमध्ये शहराचे नाव टाकून त्याचा पिनकोड शोधू शकता. तसेच एखादा पिनकोड कोणत्या शहराचा आहे हेदेखील जाणून घेता येते. पोस्टाचा पिनकोडही या अ‍ॅपद्वारे कळू शकतो. एखाद्या अनोळखी शहरात गेल्यावर तुम्हाला करमणुकीसाठी एफएम रेडिओ ऐकायची इच्छा असेल तर या अ‍ॅपद्वारे त्या शहरातील एफएम रेडिओ स्टेशन्सची यादी मिळू शकेल. तुम्ही रेल्वेचे बुकिंग केले असल्यास तुमचा दहा आकडी पीएनआर नंबर टाकून आरक्षणाची स्थिती बघण्याची सोयही या अ‍ॅपमध्ये आहे.
एखादा मोबाइल नंबर कुठल्या ऑपरेटरची सेवा घेत आहे किंवा एखादे वाहन कुठल्या राज्यातील, शहरातील आहे हेदेखील शोधण्याची सोय येथे आहे. हे अ‍ॅप ऑफलाइनदेखील वापरता येते. थोडक्यात हे बहुउपयोगी अ‍ॅप विविध प्रकारचे कोड पाठ करण्याच्या जबाबदारीपासून तुम्हाला मुक्ती देते.
manaliranade84@gmail.com