भारतीय स्मार्टफोन बाजारात अल्पावधीत आपला ठसा उमटवणाऱ्या व्हिवोने या वर्षांत व्ही मॅक्स ३ हा नवा आणि वेगवान स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल केला. इतर स्मार्टफोनला टक्कर देणारा हा फोन नेमका कसा आहे ते पाहू या.
रचना
सध्या बाजारात स्मार्टफोनच्या मेटल युनिबॉडीला चांगलीच मागणी आहे. याचाच विचार करून व्हिवो व्ही ३ मॅक्समध्ये मेटल युनिबॉडीचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये अ‍ॅल्युमिनियम मॅग्नेशियमचा वापर करण्यात येतो. यामुळे फोन हातात घेतल्यावर धातूचा वापर असूनही तो खडबडीत जाणवत नाही. याचबरोबर फोन पकडण्यासाठीही अगदी सोपा आहे. धातूची बॉडी असलेला फोन हाताळणे तुम्हाला अवघड जाऊ नये यासाठी कंपनीने फोनसोबत प्लॅस्टिकचे बॅक प्लॅनल दिले आहे. हा फोन आकाराने आटोपशीर आहे. म्हणजे फार मोठाही नाही व फार लहानही नाही. याचा डिस्प्ले ५.५ इंचाचा असून त्याचे वचन १६८ ग्रॅम इतके आहे. यामध्ये बॅटरीची क्षमता ३००० एमएएच इतकी देण्यात आली आहे. फोन पुढच्या बाजुने पांढरा असून मागच्या बाजूला सोनेरी पॅनल देण्यात आला आहे. यामुळे फोन पुढून फारसा आकर्षक दिसत नसला तरी फोनवर बोलत असताना इतरांना नक्कीच आकर्षित करून घेतो. पुढच्या बाजूला डिस्प्लेच्या खाली तीन ऑफ स्क्रीन बटन्स देण्यात आली आहेत. याशिवाय त्याच्यावर लहान स्पीकर्स, फ्रंट कॅमेरा आणि प्रोक्सिमिटी सेन्सर देण्यात आला आहे. मागच्या बाजूला मधोमध कंपनीचे नाव असून त्याच्यावर चौकोनी आकारात फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यावर १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश लाइट देण्यात आला आहे.

डिस्प्ले
यामध्ये फूल एचडीचा ५.५ इंचाचा डिप्ले देण्यात आला आहे. फोनची जितकी किंमत आहे तितक्या किमतीत मिळणाऱ्या इतर ब्रँड्सच्या फोन्सच्या तुलनेत हा डिस्प्ले चांगला आहे. डिस्प्लेला चांगला ब्राइटनेस देण्यात आला आहे. यामुळे बाहेरच्या उजेडात फोनचा डिस्प्ले पाहणे सोपे होते.

वापरकर्त्यांसाठी
या फोनमध्ये अँड्रॉइड ५.१.१ लॉलिपॉप ही ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आली आहे. याचबरोबर वापरकर्त्यांला फोन वापरणे सोपा जाण्यासाठी कंपनीने फोर्सटच २.५ ही प्रणालीही दिली आहे. यामुळे अँड्रॉइडच्या इतर फोनमध्ये वापरकर्त्यांना मिळणारा युजर इंटरफेसपेक्षा या फोनचा इंएटरफेस वेगळा ठरतो. यामध्ये खालच्या बाजूस क्विक सेटिंग पॅनल देण्यात आला आहे. यामध्ये आपल्याला स्क्रीनच्या खालच्या बाजूने वरती स्वाइप करावे लागते. यामध्ये देण्यात आलेले सेटिंग्जचे पर्याय तुम्ही तुमच्या सोयीने बदलूही शकता. या क्विक सेटिंगमध्ये फ्लॅश लाइट, स्क्रीनशॉटसाठी एस कॅप्चर अशा विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.

असा काम करतो फोन
हा फोन मध्यम किंमत गटात मोडत असून यामध्ये १.८ गीगाहर्टझचा स्नॅपड्रॅगन ६५२ ऑक्टा कोर प्रोसेसर वापरण्यात आला असून चार जीबी रॅम देण्यात आले आहे. हा फोन उच्च क्षमतेचे गेम्स खेळण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. यामुळे फोनचा वापर करताना कुठेही फारशी अडचण जाणवत नाही. मात्र याच किमतीत फोन विकणाऱ्या इतर ब्रँड्स यापेक्षा चांगला प्रोसेसर देतात. यामध्ये बॅटरी बॅकअपही चांगला देण्यात आला आहे. जर तुम्ही फोनचा वापर सातत्याने करत असाल तर तुम्हाला तो दिवसातून किमान दोन वेळा तरी चार्ज करावा लागतो. यामध्ये जलद चार्जिगचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण फोन कमीत कमी वेळात चार्ज होतो. व्हिवोच्या आधाच्या फोन्सप्रमाणेच याही फोनला स्पीकरबार खालच्या बाजूस देण्यात आला आहे. यामुळे फोन टेबलवर ठेवला तरी आवाजाचा काही परीणाम होत नाही.

कॅमेरा
या फोनमध्ये चांगल्या दर्जाचा कॅमेरा देण्यात आला आहे. याचा मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा असून फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. यामध्ये कॅमेरासाठी वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर वेगळे आणि चांगल्या दर्जाचे असून यामध्ये आपल्याला छायाचित्रांना विविध इफेक्ट्स देण्यापासून विविध प्रकारचे छायाचित्र टिपण्यापर्यंतची सुविधा देण्यात आली आहे. यातील एका प्रकारात आपण विविध संदेश घेऊन छायाचित्र टिपू शकतो.
– नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com