मायक्रोसॉफ्ट एक्सेलला कोणते पर्याय आहेत? यापैकी ऑफिसच्या कामांसाठी कोणता पर्याय योग्य आहे?    

संजय बोराडे, भांडुप

मायक्रोसॉफ्ट ऑफिसला समकक्ष असे अनेक मोफत पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये फ्री ऑफिस, अपाचे ऑफिस, लिब्रा ऑफिस, गुगल डॉक्स, अटलांटिस नोवा, डब्लूपीएस ऑफिस असे पर्याय आहेत. या सर्व पर्यायांमध्ये एमएस एक्सेलसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय या सुविधा संपूर्ण मायक्रोसॉफ्ट ऑफिसलाच पर्याय ठरू शकतील अशा आहेत. यापैकी अपाचे ऑफिस आणि लिब्रा ऑफिस हे पर्याय मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या जास्त जवळ जाणारे आहेत. यामुळे काम करताना तुम्हाला फारसे अडथळे जाणवणार नाहीत.

मी ७२ वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आहे. मला स्मार्टफोनचा वापर बऱ्यापैकी येतो. रोकडरहित अर्थव्यवस्थेसाठी यूपीआयचा पर्याय स्वीकारावा असे अनेक जण सांगतात. पण यूपीआय म्हणजे काय ते समजावून सांगा.

      – चंद्रमोहन पिंगळे, नाशिक

उत्तर – स्मार्टफोनचा वापर करून बँक खात्यात पैसे पाठविण्याचे सर्वात सोपे माध्यम म्हणून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)कडे पाहिले जाते. बँकिंग क्षेत्रात एटीएमनंतर झालेले हे सर्वात मोठे संशोधन मानले जाते. यामध्ये आपण विक्रेत्याला थेट पैसे देऊ शकतो. यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन असे दोन्ही पर्याय आहेत. ही सुविधा वापरण्यासाठी आपल्याला डेबिट कार्डनंबर किंवा आयएफएससी कोड किंवा नेट बँकिंग किंवा ई-वॉलेट पासवर्ड आदी गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नसते. ही सुविधा वापरण्यासाठी बँकेत खाते

असणे आणि मोबाइल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी बँकेच्या ग्राहकाला आपल्या स्मार्टफोनमध्ये यूपीआय आधारित अ‍ॅप डाऊनलोड करावे लागते. या अ‍ॅपमधून व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्ही आड्टाासी वापरकर्ता क्रमांक तयार करू शकता किंवा तुमच्या बँकेचा आयएफएससी कोडही वापरू शकता. सध्या बाजारात बहुतांश सर्वच बँकांचे यूपीआय अ‍ॅप उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये वापरकर्त्यांची आभासी ओळखच गृहीत धरली जाते. यामुळे हे अ‍ॅप वापरणे इतर पेमेंट अ‍ॅप्सच्या तुलनेत सुरक्षित मानले जाते. तसेच या अ‍ॅपच्या माध्यमातून एकावेळी एक लाख रुपयापर्यंतचे व्यवहार करता येतात. हे अ‍ॅप असलेल्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक टाकूनही व्यवहार करता येतो.