पेपरमध्ये किंवा इंटरनेटवर अनेक प्रकारची शब्दकोडी बघायला मिळतात. शब्दकोडी सोडवण्याचा नाद किंवा छंद असणाऱ्यांना शब्दकोडय़ाचा कुठलाही नवा प्रकार नेहमीच आकर्षित करतो. आज आपण अशीच हटके प्रकारच्या शब्दकोडय़ांची अ‍ॅप्स बघणार आहोत.
एखाद्या फोटोमध्ये आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात. त्या प्रत्येक गोष्टीला स्वत:चे असे नाव असते. हीच संकल्पना घेऊन ‘वर्डअलॉट’ (Wordalot) या अ‍ॅपमधे २५० हून अधिक शब्दकोडी बनवलेली आहेत.
उदाहरणार्थ, एका कपामध्ये बसवलेले मांजरीचे पिल्लू. उठून दिसणाऱ्या केवळ एवढय़ाच दोन गोष्टी. परंतु त्यावरून दहा शब्दांचे कोडे तयार होऊ शकते. म्हणजेच त्या कपाचा रंग, त्यावरील डिझाईन किंवा चित्र, मांजरीचे वर्णन, रंग इत्यादींसाठी वापरले जाणारे शब्द घेऊन हे कोडे तयार होते. तुम्ही फोटोचे किती सखोल निरीक्षण करता त्यावर ते कोडे सोडवण्यास सोपे आहे की अवघड ते ठरते.
प्रत्येक कोडय़ामध्ये एक फोटो दाखवला जातो. फोटोखाली रिकाम्या चौकटी कोडय़ाचे उत्तर लिहिण्यासाठी दिलेल्या असतात. कोडय़ातील उभे आडवे शब्द तुम्हाला चित्रात बघून ठरवायचे असतात. प्रत्येक शब्दातील काही अक्षरे मदत म्हणून दिली जातात. तुम्ही शब्द भरण्यासाठी आडवी किंवा उभी ओळ निवडता तेव्हा खालच्या बाजूला काही अक्षरांचा संच दिला जातो. अर्थातच त्यातील काही अक्षरे ही कोडय़ातील तो शब्द पूर्ण करण्यासाठी उपयोगी असणारी आणि उरलेली अक्षरे तुमचा गोंधळ वाढवण्यासाठी दिलेली असतात. एखादा शब्द अडल्यास तुम्ही हिंटची मदत घेऊ शकता. किंवा संपूर्ण कोडेच मित्रांबरोबर शेअर करू शकता.
आता या संकल्पनेच्या अगदी उलट असणाऱ्या ‘फोर पिक्स, वन वर्ड’ (4 pics 1 word) या अ‍ॅपबद्दल जाणून घेऊ यामध्ये एका कोडय़ात केवळ एकच शब्द मिळवायचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला हिंट म्हणून चार चित्रे दाखवली जातात. ती चारही चित्रे पूर्णपणे वेगवेगळी दिसत असली, तरी त्यात एक साधम्र्य नक्कीच असते, जे तुम्हाला शोधून काढायचे असते. उदाहरणार्थ, एखाद्या कोडय़ात धावणारी आगगाडी, जिम इन्स्ट्रक्टर एखादा व्यायाम प्रकार कसा करायचा हे सांगताना, शिक्षक विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिकवताना आणि एक लहान मुलगा त्याच्या कुत्र्याला शिकवताना असे फोटो दिलेले आहेत. यासाठी पाच अक्षरी शब्द शोधायचा आहे.
आगगाडीसाठी Train हा शब्द आहे. इतर तीन चित्रात एक जण दुसऱ्याला कसले तरी प्रशिक्षण देत आहे म्हणजे ट्रेनिंग देत आहे. म्हणजे चारही चित्रांशी साधम्र्य असलेला शब्द म्हणजे Train जो पाच अक्षरी आहे. अशाप्रकारे हे कोडे सोडवले गेले. फोटोखाली काही अक्षरांचा संच तुम्हाला अक्षरे निवडण्यासाठी दिलेला असतोच. त्याचा उपयोग योग्य शब्द कुठला असेल याचा अंदाज बांधण्यासाठी होतो. अक्षरांच्या संचातील योग्य अक्षर मिळवण्याची तसेच अनावश्यक अक्षरे काढून टाकण्याची सोयदेखील येथे आहे. मदतीसाठी तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप द्वारे इतरांची मदत घेऊ शकता. सोपी ते कठीण कोडी या अ‍ॅपमध्ये सोडवायला मिळतील.
विचार करून खेळायला लावणारी परंतु तरीही खिळवून ठेवणारी ही अभ्यासपूर्ण अ‍ॅप्स नक्कीच खेळून बघा आणि खेळाबरोबर शब्दसंग्रह वाढवा.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com