आपल्या भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी तरुणाईचे लोकप्रिय माध्यम म्हणजे फेसबुक. वापरकर्त्यांच्या याच भावनांचा वापर करून व्यवसाय करणारी फेसबुक ही कंपनी आता मात्र चिंतेत पडली आहे. याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे या संकेतस्थळावर वैयक्तिक शेअरिंगपेक्षा व्हायरल व्हिडीओज् किंवा छायाचित्र शेअरिंग करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
आपल्या मित्राचा वाढदिवस कधी आहे इथपासून ते तो आत्ता काय करीत आहे याची माहिती पाहिजे असेल तर फेसबुकवरील स्टेटसमधून मिळवली जात होती. समाज माध्यमांमध्ये नवी झळाळी आणणाऱ्या फेसबुकने लोकांना आपल्या भावनांना मोकळी वाट करून देण्याची सवय लावली. याच सवयीतून लोकांच्या भावनांचा अभ्यास करून विविध सर्वेक्षणांपासून संशोधकांना मदत करणारी फेसबुक ही कंपनी सध्या चांगलीच चिंतेत असल्याच समजते. या कंपनीच्या म्हणण्यानुसार रोज फेसबुक वापरणाऱ्यांपकी सुमारे एक अब्ज वापरकर्ते आपल्या भावाना शेअरिंग करीत नाहीत. जर हे प्रमाण वाढत गेले तर कंपनीला भविष्यात काम करणे अवघड होऊन बसणार आहे.
एक अब्ज वापरकर्ते आपल्या भावना शेअर करत नसले तरी संकेतस्थळावर शेअरिंगचे प्रमाण कमी झाले आहे असे नाही. वापरकर्ते तयार संदेश, व्हिडीओज् आणि छयाचित्रांचे जास्त शेअरिंग करतात. यामुळे फेसबुकने चक्क एक वेगळा चमू तयार केला असून हा चमू वापरकर्ते स्वत:बद्दल शेअरिंग का करीत नाहीत याचा अभ्यास करीत आहे. पण फेसबुकला हे असे का होते याबाबत चर्चा होणेही महत्त्वाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली. त्या वेळेस अनेक मुद्दे समोर आले.
ज्या वेळेस फेसबुक नव्याने सुरू झाले तेव्हा लोकांना त्याबद्दल खूप आकर्षण होते. आपल्या लहानपणच्या मित्रापासून ते कधीही न भेटलेल्या परदेशात राहणाऱ्या आजीपर्यंत सर्वाशी आपण जोडलो गेलो होते. यामुळे आपण फेसबुकवर जे काही टाकू ती माहिती या सर्वांपर्यंत पोहोचू लागली. कालांतराने यात गट सुरू झाले आणि माहिती शेअरिंगसाठी एक मर्यादा मिळाली. मग लोक आपली माहिती आपल्याला पाहिजे त्या गटापुरतीच शेअर करू लागले. याशिवाय आणखी एक महत्त्वाचे कारण समोर आले ते म्हणजे ‘कॉन्टेक्स्ट कोलॅप्स’चे. याचा अर्थ असा की फेसबुकवरील माणसे, माहिती एकमेकांना संदर्भहीन वाटू लागली किंवा एकमेकांच्या संदर्भावर आक्रमण करू लागले. माध्यमांमध्ये ‘कॉन्टेक्स्ट कोलॅप्स’ही संकल्पना सर्वप्रथम १९८०मध्ये समोर आली होती. त्याचाच संदर्भ आता लोकांच्या फेसबुक वापरासोबत जोडला जात आहे. याचबरोबर फेसबुकवरील माहितीच्या सुरक्षेचा प्रश्नही आजही ताजा आहेच. या संदर्भात जेव्हा जोरदार चर्चा सुरू होती तेव्हा कंपनीचे संभाषण आणि सार्वजनिक धोरण विभागाच्या अध्यक्षांनी जर तुम्ही शेअरिंग करणे योग्य मानत नसाल तर शेअरिंग करू नका असा सल्ला दिला होता. सध्या फेसबुकच्या माध्यमातून लोक कंपन्या किंवा स्वत:च्या व्यवसायाचा प्रचार करण्यात जास्त वेळ घालवतात. पण यापूर्वी स्वत:चा ब्रॅण्ड बनविण्यासाठी ज्याप्रमाणे या माध्यमाचा वापर होत होता तो होणे आता बंद झाला आहे. यामुळे फेसबुक भलतेच चिंतेत आहे.
याचबरोबर आपण शेअर केलेल्या भावनांचा वापर करून फेसबुक जाहिरात आणि विपणन संस्थांना माहिती पुरविण्याचे काम करते ही बाब जेव्हा समोर आली तेव्हापासून लोकांचे शेअरिंगचे प्रमाण कमी होऊ लागले. याचबरोबर भावना व्यक्त करण्यासाठी तरुणाईच्या हातात सध्या फेसबुकच्या बरोबरीनेच अनेक समाजमाध्यमे उपलब्ध आहेत. यामुळेही वैयक्तिक भावना फेसबुकच्या माध्यमातून शेअर करण्यापेक्षा इतर समाजमाध्यमातून शेअर करणे अनेकांना सोयीचे वाटत असल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे. यामुळे आता फेसबुकने आपल्या संकेतस्थळात अनेक बदल करण्याचे ठरविले आहे. नुकत्याचा पार पडलेल्या ‘एफ ८’ या परिषदेत फेसबुकने याबाबत चर्चा केली आणि लाइव्ह व्हिडीओ, सेव्ह लिंक्स, शेअर कोट्स यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. याचबरोबर फेसबुक चॅटबोट्स नावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे, यामध्ये कंपनी मेसेंजर संकेतस्थळावर थेट वापरकर्त्यांशी चॅट करू शकणार आहे. ‘कॉन्टेक्स्ट कोलॅप्स’ या संकल्पनेवर फेसबुकने खूपच काम करण्यास सुरुवात केली असून अशा पद्धतीने होणे कंपनीला धोकादायक असल्याचे कंपनीच्या संस्थापकांपासून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. यामुळे भविष्यात फेसबुक आपल्यासाठी काय आणेल याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com