ओसीस सफायर इमारतीमधील घटना

रस्ता रुंदीकरणामुळे विस्थापित झालेल्या रहिवाशांसाठी महापालिकेने खोपट येथे उपलब्ध करून दिलेल्या ओसीस सफायर या इमारतीचे उद्वाहक (लिफ्ट) बंद पडून त्यात तीन रहिवासी सुमारे तीन तासांहून अधिक काळ अडकून पडले होते. पालिकेच्या आपत्तिव्यवस्थापन कक्षाचे अधिकारी आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठय़ा प्रयत्नांनी त्यांची सुटका केली. एमएमआरडीए कडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या या इमारतीच्या लिफ्टची देखभाल दुरुस्ती होत नसल्यामुळे तसेच महापालिका प्रशासन इमारतीची जबाबदारी टाळत असल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचा दावा रहिवाशांकडून केला जात आहे.

ठाणे शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी राहत्या घराची जागा सोडून विस्थापित झालेल्या ठाण्यातील रहिवाशांना पुनर्वसन केलेल्या इमारतींमधल्या अनंत अडचणींचा   सामना करावा लागत आहे. कळवा आणि बाळकुम परिसरातील काही रहिवाशांना खोपट एसटी आगारासमोरील एमएमआरडीएच्या ओसीस सफायर या इमारतीमध्ये विस्थापित करण्यात आले. अठरा मजल्याच्या या इमारतीमध्ये १५० पेक्षा अधिक कुटुंबांचे वास्तव्य आहे. या इमारतीत अवघ्या दोन लिफ्ट असल्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गेल्या काही दिवसापांसून या लिफ्ट वारंवार बंद पडू लागल्यामुळे येथील नागरिकांची कोंडी होऊ लागली आहे. सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान इमारतीच्या अकराव्या मजल्यावर राहणारे प्रमोद आणि प्रणाली कदम कामानिमित्ताने बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत तेथील आणखी एक रहिवासी शंकर पांडे हेदेखील लिफ्टमध्ये होते. मात्र ही लिफ्ट अवघ्या काही मिनिटांमध्ये थांबली. इमारतीतील अन्य रहिवाशांनी प्रयत्न करूनही अडकलेल्यांची सुटका होऊ शकली नाही. त्यानंतर मदतीसाठी अग्निशमन दल आणि आपत्तिव्यवस्थापन विभागाच्या पथकाला बोलावण्यात आले. साडेदहाच्या सुमारास बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. साध्या स्वरूपाची असलेल्या या लिफ्टला दोन दरवाजे असून अनेक प्रयत्न करूनही लिफ्ट उघडत नव्हती किंवा सुरूही होत नव्हती. अखेर या लिफ्टच्या ठेकेदाराला मुंबईवरून बोलवून त्यानंतर दुपारी १२च्या सुमारास अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

हस्तांतरणावरून संभ्रम

एमएमआरडीएकडून ही इमारत पालिकेकडे हस्तांतरित झाली असली तरी त्यातील लिफ्ट हस्तांतरित झाली नसल्याचा पालिकेचा दावा आहे. इमारतीमधील सातव्या मजल्यावरील लिफ्ट दरवाजादेखील तुटलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनीच या लिफ्टची नासधूस केल्याची शक्यताही पालिकेकडून व्यक्त करण्यात आली.