कोटय़वधी रुपयांची मालमत्ता जप्त, गुन्हे दाखल
शनिवार-रविवार जोडून आलेल्या सुट्टीचा गैरफायदा घेत खाडीतून अनधिकृतपणे रेती उत्खनन करणाऱ्या माफियांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी जोरदार कारवाई करून कोटय़वधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
नागला बंदर, गायमुख, गांधी प्लॉट, कावेसर, कळवा आणि मुंब्रा येथे एकाच वेळी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ४०९ ब्रास रेती, तसेच रेती वाहून नेण्यासाठी आणण्यात आलेले दहा ट्रक, एक जेसीबी आणि दोन सक्शन पंप जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची अंदाजे किंमत एक कोटी २० लाख रुपये आहे. जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि इतर कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.
कल्याणपासून भाईंदपर्यंत खाडीत ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने जोरदार मोहीम उघडली आहे.
मध्यंतरी जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या धडक कारवाईत अनेक ठिकाणी वाळू माफियांना रंगेहाथ पकडून त्यांची कोटय़वधींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

माफिया पुन्हा सक्रिय
गेल्या काही दिवस खाडीतील रेती माफियांची लुडबुड बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. मात्र अलीकडे पुन्हा प्रशासनाचा डोळा चुकवून सलग सुट्टीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात रेती उत्खनन होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत शनिवारी तातडीने ही कारवाई करण्यात आली.