दहा वर्षांपूर्वी उमेदवारांची पहिली यादी कोण जाहीर करतो म्हणून पक्षांमध्ये स्पर्धा लागायची. त्यामुळे निर्माण होणारी बंडखोरी मिटविण्यासाठी पक्षनेत्यांना रक्ताचे पाणी करावे लागत होते. हे अनुभव गाठीशी असलेल्या सर्व पक्षांमधील नेत्यांनी या वेळी कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी यादी जाहीर न करताच, घरोघरी इच्छुक उमेदवारांना संपर्क करून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना अर्ज वाटप केले.

शिवसेनाही पालिका निवडणुकीची यादी प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर न करता आपल्या मुखपत्रातून यादी जाहीर करीत होती. यादी मुखपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर भल्या सकाळीच एकमेकांची उणीदुणी काढण्यात पक्षात सुरुवात होत होती. ते प्रसंग टाळण्यासाठी या वेळी शिवसेनेने कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी मुखपत्रातून यादी जाहीर न करता, घरोघरी संपर्क करून उमेदवारांना कार्यालयात या आणि पक्षाचा अधिकृत अर्ज घेऊन जाण्यासंबंधी संदेश दिले. काँग्रेसने सोमवारी संध्याकाळी मुंबईतून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. रात्री बारा वाजल्यानंतर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उमेदवारी यादीत नाव असलेल्या इच्छुकांशी संपर्क साधला. भाजपचे निवडणूक प्रमुख खासदार कपिल पाटील यांच्या निवासस्थानी बोलावून भाजप उमेदवारांना मंगळवारी रात्री बारा वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज वाटप करण्यात येत होते. पहाटेपर्यंत हे काम सुरू होते. शिवसेनेनेही इच्छुक उमेदवारांना संपर्क करून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरून टाकण्याचे आदेश दिले. मनसेनेही यादी जाहीर न करता तोंडी संपर्क करून अर्ज वाटप केले.

उमेदवाऱ्या वर्तमानपत्रातून एक ते दोन दिवस अगोदर जाहीर केल्या की पक्षात बंडखोरांची संख्या वाढते. याचा अनुभव असल्याने सर्व पक्षांच्या नेत्यांनी या वेळी उमेदवारी जाहीर न करता याद्या गुप्त ठेवण्यात आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर करून बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या, पण आयत्या वेळी उमेदवारी कापलेल्या उमेदवारांनी तात्काळ दुसऱ्या पक्षाशी संपर्क करून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विष्णुनगर प्रभागात मनसेतून भाजपमध्ये आलेल्या एका उमेदवाराला तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. आयत्या वेळी त्याचा पत्ता कापण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळीच या उमेदवाराने थेट शिवसेनेशी संपर्क करून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. १६ ऑक्टोबपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने या कालावधीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेमधील अनेक नाराज इच्छुक बंडखोरी करून अन्य पक्षांमध्ये जाणे, अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे गुजराथी उमेदवार?

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही गुजराती, मारवाडी, संघाच्या उमेदवारांना भाजपकडून ठेंगा दाखवण्यात आला आहे. कधीच कोणी नाव न ऐकलेल्या गुजराती समाजाच्या उमेदवाराला रामनगर प्रभाग, आनंदनगर प्रभागात उमेदवारी देण्यात आली आहे. शिवमार्केट गुजराती समाजाचे प्राबल्य आहे. या प्रभागातून गुजराती समाजाचे गिरीश वाडेल इच्छुक होते. ते आमदार रवींद्र चव्हाण यांचे कट्टर विरोधक असल्याने त्यांचा पत्ता या प्रभागातून कापण्यात आला आहे. गुजराती समाजाला उमेदवारी दिली हे दाखवण्यासाठी रामनगर प्रभागातून नवखा गुजराती उमेदवार देण्यात आला आहे. रामनगरमध्ये संघाच्या एका उमेदवाराचा पत्ता कापण्यात आला आहे.