महापालिकांमार्फत नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी विविध वास्तूंची उभारणी केली जाते. या वास्तूंचे पुढे योग्य प्रकारे जतन केले जात नाही. त्यामुळे लोकांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या वास्तू सामाजिक संस्थांकडे सुपूर्द कराव्यात, अशी सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी डोंबिवली येथे केली. या वास्तूंचा देखभाल दुरुस्तीचा आकडा दिवसेंदिवस केवळ फुगत जातो आणि नागरिक त्याचा पुरेपूर लाभ घेऊ शकत नाही. या वास्तू योग्य व्यवस्थापन असलेल्या संस्थेकडे चालविण्यास द्याव्यात जेणेकरुन रहिवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
डोंबिवली जिमखाना म्हैसकर क्रीडा संकुलाचा शुभारंभ डोंबिवली जिमखाना येथे सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार निरंजन डावखरे, रवींद्र चव्हाण, सुभाष भोईर, रमेश पाटील, आयुक्त मधुकर अर्दड, महापौर कल्याणी पाटील, उपमहापौर राहुल दामले, जिमखाना अध्यक्ष दीपक मेजारी, डॉ. अच्युत नाईक, दिलीप भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. देसाई पुढे म्हणाले, महापालिकेने अत्यावश्यक सोयी सुविधांसोबत नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आरोग्य रक्षणासाठी शहरात जलतरण, जिमखाना, नाटय़गृह अशा वास्तूंची उभारणी करणे आवश्यक आहे. मात्र त्या चालविणे महापालिकेचे काम नाही. अशा वास्तूंची देखभाल करणे पुढे महापालिकेस जमत नाही, असा अनुभव आहे. ज्यांना या कामात रुची तसेच आत्मियता आहे, ज्यांच्याकडे योग्य व्यवस्थापन आहे त्यांना चालविण्यास द्यावे. औद्योगिक विकास हे महामंडळाचे धोरण असले तरी केवळ कारखान्यांची संख्या वाढविण्याऐवजी जनतेच्या सोयी-सुविधा निर्माण करण्याचाही प्रयत्न असायला हवा, असेही ते म्हणाले.