स्पर्धेसाठी निधी मिळत नसल्याने उपनगराध्यक्षांचे भीक मांगो आंदोलन

अंबरनाथ : नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच आठवडय़ात अंबरनाथमधील शिवसेना नेत्यांचे अंतर्गत वादावरून कान उपटले होते. त्यानंतरही अंबरनाथ नगरपालिकेतील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यातील वाद कायम आहे. स्पर्धेसाठी निधी मिळत नसल्याच्या रागातून उपनगराध्यक्षांनी गुरुवारी रात्री अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर भीक मांगो आंदोलन केले. पालिकेतील सत्तेतील एक गट आणि प्रशासनाचा थेट निषेध त्यांनी या वेळी केला. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत धुसफुस कायम असल्याचे चित्र आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेतील गटबाजी आणि अंतर्गत वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आणि उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्यात विविध कारणांवरून वाद सुरू आहेत.

दोन्ही गटांकडून शहरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात असताना या कार्यक्रमांत एकमेकांना दूर ठेवण्याचे प्रकार समोर आले होते. त्यावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही दुफळी पाहायला मिळाली होती. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेत काहीही आलबेल नसल्याचेच चित्र होते. त्यातच गेल्या आठवडय़ात राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुफळीवरून नेत्यांचे कान उपटले होते. विकासासाठी एकत्र येण्याचेही आवाहन त्यांनी या वेळी केले होते. मात्र एकनाथ शिंदे यांचा हा सल्ला शहरातील नेत्यांनी दुर्लक्षित केल्याचे दिसत आहे.

शिंदे यांनी सल्ला देऊन आठवडा उलटत असतानाच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांतील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. अंबरनाथच्या उपनगराध्यक्षांनी शिक्षण मंडळाकडून २९  फेब्रुवारी रोजी दिवंगत शिवसैनिक रमेश गोसावी यांच्या नावाने शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी १० लाखांचा निधीही ठराव करत मंजूर करण्यात आला होता. मात्र, शिवसेनेतील अंतर्गत वादातून स्पर्धेसाठी मंजूर झालेला निधी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केला आहे. रमेश गोसावी यांच्या कुटुंबीयांनीही गोसावी यांच्या नावे स्पर्धा घेण्यास पत्राद्वारे नकार दिला होता. मात्र गोसावी कुटुंबावर शिवसेनेतील एक गट दबाव टाकत असल्याचा खळबळजनक दावा अब्दुल शेख यांनी केला आहे. त्यामुळे याविरोधात उपोषण करण्याचा इशारा अब्दुल शेख यांनी दिला होता. मात्र परवानगी न मिळाल्याने गुरुवारी रात्री अब्दुल शेख यांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत भीक मांगो आंदोलन करत स्पर्धेसाठी मदत करण्याचे आवाहन केले. या आंदोलनामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. येत्या काळात या वादावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.