आ. केळकर यांचा आरोप

ठाणे : महापालिकेचे नवनियुक्त मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत त्यांची ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच चुकीच्या पद्धतीने नियुक्ती झाल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या खेळखंडोब्यास पालकमंत्रीच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मुरुडकर यांना लाच घेताना अटक झाली. त्यानंतर त्यांच्या रिक्त जागी डॉ. चारुदत्त शिंदे यांची नेमणूक करण्यात आली. परंतु गेल्या वर्षी जुलै महिन्यात मृतदेहांच्या अदलाबदली प्रकरणात दोषी ठरवून डॉ. शिंदे यांना कार्यमुक्त केले होते. असे असतानाही त्यांची पुन्हा नेमणूक करण्यात आल्यामुळे आमदार केळकर यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला असून यासंदर्भात त्यांनी सोमवारी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली. शहरात करोना रुग्णांची संख्या कमी होत नसून सोयी-सुविधांबाबतही गोंधळ आहे. अशावेळी सक्षम आणि पूर्णवेळ आरोग्य अधिकारी नेमण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच चारुदत्त शिंदे यांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती करण्यात आली असून आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या खेळखंडोब्यास पालकमंत्रीच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. चारुदत्त शिंदे हे रजेवर असल्यामुळे आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर आहे. त्यामुळे तातडीने कार्यक्षम आरोग्य अधिकारी नियुक्त करण्याची मागणीही त्यांनी केली.