हत्येचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची बदली

वसई किल्ल्याजवळील जेट्टीजवळ मृतावस्थेत आढळलेल्या अर्भकाच्या प्रकरणाने वसई पोलीस दलात नवीन वाद निर्माण झाला आहे. या अर्भकाच्या मृत्यूमागे हत्येचा संशय यावा इतपत सकृद्दर्शनी पुरावे असतानाही वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप साहाय्यक पोलीस निरीक्षकाने केला आहे. विशेष म्हणजे, अर्भकाच्या मृत्यू प्रकरणात हत्येचे कलम लावल्याप्रकरणी या साहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आल्याने या प्रकरणाबाबतचे संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे.

वसई किल्ल्याच्या जेट्टीजवळील गाळात २६ जानेवारी रोजी एक नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी या अर्भकाला कापडात गुंडाळून व शरीराला दगड बांधून गाळात फेकण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा तपास वसई पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत वायदंडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. वायदंडे यांनी तपास केला असता अर्भकाच्या पायाला शाईची खूण व नाभीला क्लिप असल्याचे त्यांना आढळून आले. यावरून एखाद्या रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यानंतर तेथून त्याला आणून येथे टाकण्यात आले असावे, असा संशय आल्याने वायदंडे यांनी याप्रकरणी न्यायालयाची परवानगी घेत हत्येचा गुन्हा दाखल केला.

परंतु, ही बाब वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांना समजताच त्यांनी आपल्याकडून तडकाफडकी तपास काढून घेतला, असा आरोप वायदंडे यांनी केला आहे.

हा सरळ सरळ हत्येचा गुन्हा होता. त्यामुळे मी हत्येचे ३०२ आणि पुरावा नष्ट करणे २०१ आदी कलमे दाखल केली होती; परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी ही दोन्ही कलमे काढून नवजात अर्भक फेकण्यासंबंधीचा कलम ३१८ अन्वये गुन्हा दाखल केला. शवविच्छेदन अहवालात जन्मत: मृत्यू असे कारण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जर बालकाचा रुग्णालयातच मृत्यू झाला असता तर तिथेच नोंद झाली असती. त्याला दगड बांधून फेकून का दिले याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचे ते म्हणाले.

याबाबत वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप फेटाळले. या अर्भकाची हत्या झालेलीच नाही. त्यामुळे हत्या आणि पुरावा नष्ट करणे हे कलम काढून टाकले असून त्याबाबत न्यायालयाला कळवल्याचे ते म्हणाले.

माझ्यावर अन्याय झालेला आहे; पण बदलीचे दु:ख नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी फायदा व्हावा म्हणून हत्येचे कलम काढून गुन्ह्य़ाची तीव्रता कमी करून टाकली आहे. मी हत्येचे कलम दाखल करताना वरिष्ठांना ई-मेलने कळवले होते. ही हत्याच आहे. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत.

– वसंत वायदंडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक, वसई

या प्रकरणाची चौकशी मी विभागीय पोलीस उपअधीक्षकांकडे दिली आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच खरे काय ते समोर येईल आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल.

– योगेश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई