विमानाच्या दारात नटूनथटून कृत्रिम हसून स्वागत करणारी हवाईसुंदरी आणि घराच्या उंबरठय़ात कानशिलावर बोटं मोडत आपल्याला मायेनं डोळे भरून बघणारी आई यांच्या स्वागतात केवढा फरक असतो! नेमका तोच फरक आहे मुद्दाम सुशोभित करून सुंदर बनवलेल्या ठिकाणात आणि साधेपणातही नैसर्गिक सौंदर्य असलेल्या ठिकाणात! आज जिथली सफर तुम्हाला घडवणार आहे, ते स्थानही असेच आईच्या मायेचं आहे. ‘कोणाचे अश्रू थांबवता येत नसतील, तरी पुसता तरी नक्कीच येतात’ इतकं साधं आणि तरीही माणुसकीचं सखोल तत्त्वज्ञान सांगणारे आणि आचरणातून त्याचा आदर्श ठेवणारे सत्पुरुष श्री नारायण स्वामी यांचा शके १८४७ पासून वास असलेली स्वामीवाडी भुईगाव इथे आहे. १९२५ साली स्वामींनी समाधी घेतली, त्याला शतक पूर्ण व्हायला आलं असलं तरी हे ठिकाण अजूनही साधंच आहे.

सुमारे सात एकर जागेत स्वामींनी स्वहस्ते लावलेली आंबा, चिकू, नारळ यांसारखी झाडे अजूनही फळे आणि गर्द सावली देतात. केळीची लागवडही आहे. आमराईच्या थंड सावलीत स्वामींचा साधासा मठ देवघरातल्या नंदादीपासारखा शांत स्निग्ध तेजानं विराजमान आहे. सुमारे शतकभराच्या उपासनेचे तरंग या परिसरात असल्यानं नामस्मरण, जप वा एखादे पारायण करायला हे स्थान अत्यंत अनुकुल आहे. बाह्य दिखाव्याकडून अंतरंगाकडे ज्यांना वळायचे आहे, त्यांनी जरूर या ठिकाणी यावे. आपल्या सद्गुरूंचे स्मरण इथे आल्यावर खचितच होईल.

मठाच्या मागे थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत कुठलाही अडथळा नसलेली जमीन आहे. समुद्राचे खारे पाणी कुठे कुठे आत येते. थोडय़ा किनाऱ्याशी दूरवर दिसणारी माडांची गच्च हिरवी गर्दी, त्यांच्या शेंडय़ांचा विशिष्ट आकाराचा तो समूह, माथ्यावर पसरलेले निळेभोर आकाश आणि त्यात स्वच्छंद विहरणाऱ्या शुभ्र मेघमाला हे दृश्य भान हरपून टाकणारं आहे. बांध घालून गोडय़ा पाण्याचं राखलेलं एक विस्तीर्ण तळंदेखील इथे आहे. वाऱ्याच्या मंद लहरींमुळे त्याच्या पाण्यात उठणारे तरंग, खंडय़ाने आपले निळे पंख झळकवत मारलेली भरारी, दूरवर पसरलेली खारफुटीची आणि उंच बारीक गवताची हिरवी बिछायत आणि या सर्व लोभसवाण्या चित्राला माडाच्या झावळ्यांच्या अखंड सळसळीचे पाश्र्वसंगीत..

मुद्दाम निर्माण केलेली सुंदर स्थळे आपण शहरात खुपदा अनुभवतो, पण मनोरंजनासाठी कोणताही दिखावा केलेला नसताही मन एका निव्र्याज आनंदानं भरून जाण्याचा आनंद अगदी अनोखा आहे. इंग्रजीत ज्याला नॉन मॅनिप्यूलेटेड म्हणता येईल, असा स्वाभाविक स्थितीत कुठलीही ढवळाढवळ न झालेला निसर्ग अनुभवायला मिळणं हा एक भाग्ययोग आहे.

आंब्याच्या मोहोराचा वास सुटलेला असताना वा लगडलेल्या कैऱ्या बघत आंब्याच्या सावलीत आप्तेष्टांसोबत निवांत गप्पा मारत बसावं, पोरांनी आमराईत हुंदडावं, पोरीबाळींनी माहेरवाशिणींसारखा झाडाला बांधलेल्या झुल्यांचा आनंद लुटावा आणि सोबत खास स्थानिक गरमागरम वालाच्या शेंगा, पानगी असे पदार्थ असावेत. या स्थानिक लज्जतीच्या आनंदासाठी आधी पूर्वसूचना दिल्यास नाश्ता-भोजन यांचीही सोय होते. एरवी पौष पौर्णिमा आणि गुरू पौर्णिमेला इथे उत्सव व महाप्रसाद असतो.

ज्येष्ठांची साठी, सहस्रचंद्रदर्शन, पंच्याहत्तरी असे कार्यक्रम करायला ही जागा निवांत असल्यानं ज्येष्ठांना आवडण्याजोगी आहे. नातवंडांनासुद्धा आजोळच्या वाडीत स्वच्छंद बागडल्याचं सुख द्यायला ही जागा छानच आहे. लहान-मोठय़ा गटांना सामूहिक अध्यात्म साधना, पारायण इत्यादी करायला इथला प्रसन्न एकांत अनुकूल आहे.

या परिसराची एक दिवसीय सहल काढल्यास वाघोलीचे शनिमंदिर, भुईगावचाच श्री स्वामी समर्थ मठ, स्वामीवाडी आणि सायंकाळी भुईगावच्या रमणीय समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका असा सुंदर कार्यक्रम आखता येईल.

स्वामीवाडी, भुईगाव

  • कसे जाल? : वसई, नालासोपारा स्थानकांवरून भुईगावसाठी बस सुटतात. बस थांब्यापासून रिक्षाने स्वामीवाडी येथे जाता येते.