वसईत आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या प्रजातीबद्दल माहिती देणारे ‘वसई बर्ड्स अॅप’ पक्षिप्रेमींच्या भेटीला आले आहे. यामुळे मोठय़ांपासून लहानांपर्यंत सर्वाना पक्ष्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळणार आहे.
वसईमध्ये स्थलांतरित पक्षी मोठय़ा प्रमाणावर आढळून येतात. आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या अनेक पक्ष्यांची नावे, त्याबाबत आपल्याला महिती नसते. यासाठीच वसईतील पक्ष्यांची ओळख सोप्या भाषेत करून देण्यासाठी आणि शहरी जैवविविधता प्रोत्साहन देण्यासाठी अमोल लोपिस, कुलदीप चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘वसई बर्ड्स अॅप’ भेटीस आणले आहे. या अॅपच्या माध्यमातून वसईतील पक्ष्यांची आणि शहरी जैवविविधतेची माहिती मिळणार आहे. जलतरण पक्षी, हिंस्र पक्षी, वन आणि गवताळ प्रदेश पक्षी, बाग आणि शहरी पक्षी अशा २५० सामान्य आणि दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजातीबद्दलची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये त्या पक्ष्याचे नाव, सामान्य इंग्रजी आणि वैज्ञानिक नावे, आकार, आवास आणि आहार प्राधान्ये, ओळख गुण याबाबत माहिती उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे जर एखाद्या पक्ष्याचे नाव माहीत नसल्यास त्याच्या आवाज अॅपमध्ये ऐकून त्याची ओळख पटवू शकतो.

वसईतील जंगल परिसर, समुद्रकिनारी मोठय़ा संख्येने स्थलांतरित पक्षी आढळून येतात. या सर्वाची माहिती अॅपमध्ये मिळणार आहे.
लाल डोक्याचा ससाणा, पर्णवटवटय़ा, परजीवी समुद्र चोर, लगाम सूर, तिरंदाज अशा अनेक पक्ष्यांची माहिती अॅपमध्ये आहे.
पक्षी हा निसर्गाच्या आरोग्याचा निदर्शक असून त्यांच्यामुळे पर्यावरणीय सद्य:स्थितीही कळते. या अॅपमध्ये पक्ष्यांच्या सद्य:स्थितीची आणि त्यांच्या अस्तित्वाबद्दलची माहितीही मिळणार आहे.

तरुणवर्ग आजकाल सर्वात जास्त मोबाइल, टॅबलेट यांचा वापर जास्त प्रमाणात करतो. त्यामुळे तत्काळ घरबसल्या त्यांना सहज आणि उपयोगी अशी वसईतील पक्ष्यांबद्दल माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
– अमोल लोपिस, पक्षिप्रेमी
आम्ही या अॅपमध्ये वसई किल्ला परिसर, निर्मळ तलाव, भुईगाव किनारा परिसर, हिरा डोंगरी, सनसिटी रोड, उमेळा-नायगाव मिठागर परिसर आणि आगाशी-अर्नाळा या परिसरात आढळलेल्या एकूण २५० पक्ष्यांच्या प्रजातींची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती पक्षिप्रेमींना माहीत व्हावी हा आमचा मुख्य उद्देश आहे, तसेच या भागात मोठय़ा प्रमाणावर हे पक्षी आढळत असल्याने या परिसराचे संवर्धन वनविभाग आणि पालिकेमार्फत व्हावे, अशी मागणी आम्ही करीत आहेत.
– कुलदीप चौधरी, पक्षिप्रेमी