* नागरी समस्यांऐवजी शिवसेना-भाजपकडून अस्मिताविषयक मुद्दय़ांवर प्रचारात भर
* अन्य पक्षांकडून दिखाऊ उपक्रम
गेल्या १५ वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीकरांचे मूलभूत प्रश्न सोडवू न शकलेल्या सत्ताधारी शिवसेना-भाजपने संस्कृती, अस्मिता अशा भावनिक मुद्दय़ांचा बुरखा पांघरून आगामी पालिका निवडणुकीत मतदारांसमोर जाण्याची पद्धतशीर आखणी केली आहे. शहरातील नागरी प्रश्नांवर आपली भूमिका मांडण्याऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी, २७ गावांचा प्रश्न असे भावनिक मुद्दे मांडून तसेच मुख्यमंत्र्यांना राखी पाठवण्यासारखे नौटंकीबाज कार्यक्रम भरवून निवडणुकीचा प्रचार त्याभोवती फिरवण्याचे सेना-भाजपचे प्रयत्न आहेत. या भावनिक प्रचारामुळे यंदाच्या निवडणुकीतही कल्याण-डोंबिवलीकरांच्या जगण्याशी संबंधित मुद्दय़ांना प्रचारातून हद्दपार केले जाईल, असे चित्र आहे.
कचरा, रस्ते, प्रदूषण, वाहतूक कोंडी, वाहनतळांचा अभाव, फेरीवाले या प्रश्नांनी कल्याण-डोंबिवलीकर अक्षरश: हैराण आहेत. विकासाच्या नावाखाली सुरू करण्यात आलेली कोटय़वधी रुपयांची कामे रखडली आहेत. बेकायदा बांधकामांमुळे शहरांना बकाल करून सोडले आहे. या गोष्टींचा फटका यंदाच्या पालिका निवडणुकीत बसण्याची सत्ताधारी सेना-भाजपला भीती आहे. या पाश्र्वभूमीवर या मुद्दय़ांपासून मतदारांचे लक्ष वळवण्यासाठी अस्मिता, धर्म, संस्कृती, परंपरा यांच्याशी संबंधित भावनिक मुद्दे मांडायची व्यूहरचना या पक्षांनी आखली आहे.
कल्याण डोंबिवली शहरात हिंदुत्व, संघ विचारसरणीबद्दल जवळीक वाटणाऱ्या परंपरागत मतदारांची संख्या लक्षणीय आहे. विशेषत डोंबिवली शहरात अशा मतदारांचा प्रभाव मोठा आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मतदार भाजपच्या बाजूने उभा राहिल्याने शिवसेनेला येथे मोठा फटका बसला. हे लक्षात आल्यानंतर सेनेने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाले पाहिजे, अशी मागणी पुढे आणली. यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत जोरदार स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. डोंबिवलीतील आचार्य अत्रे ग्रंथालयाच्या अर्धवटावस्थेत तयार असलेल्या वास्तूचा शुभारंभ सोहळा, शहरातील १२०० विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप अशा मतदारांना जिव्हाळा वाटणाऱ्या कार्यक्रमांचा धडाकाच सेनेच्या मंडळींनी लावला होता. दुसरीकडे, भाजपनेही २७ गावांचा मुद्दा मांडून त्या पट्टय़ातील मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. श्रावण महिन्यात मुख्यमंत्र्यांना राखी पाठवण्याचा कार्यक्रम भाजपने उरकला. केंद्र सरकारने आखलेल्या विविध योजनांच्या जाहिराती करण्यातही भाजपची मंडळी आघाडीवर आहेत. हे सर्व सुरू असताना मनसेसारख्या विरोधी पक्षानेही जनतेच्या मुद्दय़ांना हात घालण्याऐवजी गणेशोत्सवात ‘सेल्फी विथ बाप्पा’ यासारखे फुटकळ दिखाऊ उपक्रम राबवून नागरी प्रश्नांचे गांभीर्य नसल्याचे दाखवून दिले. या पाश्र्वभूमीवर निवडणुकीच्या रणधुमाळीत तरी प्रचाराचे योग्य मुद्दे येणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.