ठाणे – ठाणे लोकसभा मतदार संघात उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे विरुद्ध शिंदेंच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यात आरोप प्रत्यारोपाची लढाई रंगली असतानाच, नरेश म्हस्के यांनी बुधवारी ठाण्यातील प्रचार मिरवणूकी दरम्यान चंदनवाडी येथील उबाठा गटाच्या शाखेत गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या शाखेला म्हस्के यांनी दिलेल्या भेटीमुळे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान,आमची परवानगी घेऊनच म्हस्के हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी शाखेत आले होते, असे सांगत शाखेचे शाखाप्रमुख तानाजी कदम यांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाच चंदनवाडी शाखा आहे. महापालिका मुख्यालयापासून पाच मिनिटांच्या अंतरावर ही शाखा आहे. ठाण्यातील सर्वात जुनी शाखा म्हणून चंदनवाडी शाखेची ओळख आहे. शिवसेनेतील बंडानंतर ठाणे शहरातील आमदार, नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली तर, राजन विचारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. १५ ऑगस्टच्या पुर्वसंध्येला शिवसेनेतर्फे तलावपाळी येथील जिल्हा शाखेजवळ झेंडावंदन करून स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील सुयोग हाॅल गल्लीतील बेकायदा बांधकाम निवडणुकीनंतर भुईसपाट, सहा महिन्यांपूर्वीच बांधकाम अनधिकृत घोषित

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही सुरू आहे. शिवसेनेतील बंडानंतर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान शिंदेची शिवसेना आणि उबाठा गटाचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाले होते. या वादानंतर गेल्यावर्षीपासून राजन विचारे यांनी चंदनवाडी शाखेजवळ स्वातंत्र्यदिन कार्यक्रम करण्यास सुरूवात केली असून हि शाखा आजही उबाठा गटाच्या ताब्यात आहे. असे असतानाच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान, शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी चंदनवाडी शाखेला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघात उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे विरुद्ध शिंदेंच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यात आरोप प्रत्यारोपाची लढाई रंगली आहे.

हेही वाचा >>> कल्याण-सीएसएमटी सकाळची १५ डबा लोकल तीन महिन्यांपासून गायब

दोन्ही नेत्यांकडून शहरात प्रचार मिरवणुका काढल्या जात आहेत. अशाचप्रकारे बुधवारी ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात नरेश म्हस्के यांची प्रचार मिरवणुक काढण्यात आली. हि मिरवणुक चंदनवाडी शाखेजवळ येताच म्हस्के यांनी मिरवणुक थांबवली आणि त्यानंतर शाखेत जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी शाखेतील उबाठा गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे म्हस्के यांनी शाखेला दिलेल्या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, शाखेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला म्हस्के यांना पुष्पहार अर्पण करायचा होता. याबाबत त्यांनी आमच्याकडे विचारणा केली असता, आम्ही त्यांना शाखेत जाण्यास परवनगी दिली, असे शाखेचे शाखाप्रमुख तानाजी कदम यांनी सांगितले. म्हस्के हे शाखेत येऊन गेले असले तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.