डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात अनेक कंप न्यांमध्ये नियमबाहय़ बॉयलरची उभारणी करण्यात आली आहे. अनेक बॉयलर जुनाट आहेत. अशा सगळ्या बॉयलरची तपासणी करून सदोष बॉयलर वापरणाऱ्या कंपनी चालकांवर कारवाई करण्याची मागणी डोंबिवली एमआयडीसीतील एका दक्ष रहिवाशाने एमआयडीसीकडे सहा महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले असल्याचे या रहिवाशाने सांगितले.

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात चारशेहून अधिक प्रकारच्या कंपन्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी वाफ (स्टीम) तयार करण्यासाठी बॉयलरचा वापर करतात. या बॉयलरचा वापर अनेक वेळा अकुशल कामगारांमार्फत होत असतो. बॉयलर अ‍ॅटेनडेंट नावाचे पद असते. पण ते अनेक वेळा खर्च कपातीच्या नावाखाली कंपनी चालक भरणा करीत नाहीत.

अनेकदा परप्रांतातून आलेल्या अकुशल कामगारांचा या पदावर भरणा असतो. त्यामुळे ते यातील काही गोष्टी हाताळू शकत नाहीत. याचा परिणाम मग अशा दुर्घटना घडण्यात होतात. यावर विचार होणे आवश्यक आहे. यासाठी सरकारने विशेष यंत्रण उभारणे आवश्यक आहे. तरच अशा घटनांना आळा घातला जाऊ शकतो, असेही मत या रहिवाशाने व्यक्त केले. विशेष म्हणजे औद्योगिक वसाहतीतून रहिवाशी वसाहती दूर करणे आवश्यक आहे.

अशा वेळी बॉयलरमधील वाफेचे उष्णतामान योग्य प्रमाणात पाळले गेले नाही तर स्फोट होतो. या दुर्घटनेत कंपनीची वित्तहानी काही वेळा जीवित हानी होते.

यासाठी कंपन्या कोणत्याही प्रकारची सुरक्षा नियम काटेकोरपणे पाळताना दिसत नाहीत. यासाठी त्यांच्यावरील निरीक्षण ठेवणारी यंत्रणाही कार्यरत नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

एमआयडीसीत काही कंपनी मालक, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, औद्योगिक निरीक्षक, पोलीस आणि दलाल यांची अभद्र युती सक्रिय असल्याने ही यंत्रणा औद्योगिक क्षेत्रात गैरप्रकार करण्यास प्रोत्साहन देते.  हे प्रकार रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील बॉयलर असणाऱ्या कंपन्यांची नियमित तपासणी करावी. सदोष बॉयलरचा वापर करणाऱ्या कंपनी मालकांवर कारवाई करण्याची मागणी एमआयडीसी निवासी महासंघाचे राजू नलावडे यांनी केली होती. गेल्या सहा महिन्यांत एकाही अधिकाऱ्याने या पत्राची दखल घेतली नाही, अशी खंत नलावडे यांनी व्यक्त केली.