कल्याण डोंबिवली पालिका अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे शहरातून दररोज जमा करण्यात येणाऱ्या ६५० मेट्रिक टन कचऱ्यात ७३.५९ टक्के घटक रासायनिक असतात. धातूविषयक घटक १६ टक्के असतात, असे महापालिकेने केलेल्या एक विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. कचऱ्यातील हे रासायनिक घटक व धातूविषयक घटकांचा संयोग होऊन आधारवाडी क्षेपणभूमीला उन्हाळ्याच्या दिवसात आग लागते, असा वरवरचा निष्कर्षही यानिमित्ताने काढण्यात आला.

विघटनाचे नियोजनच नाही?

पालिका प्रशासन ३२० मेट्रिीक टनाची दहा ते बारा बायोगॅस संयंत्र शहराच्या विविध भागांत कचऱ्याच्या विघटनासाठी बसविणार आहे. शहरात दररोज ४२९ टन ओला कचरा तयार होतो. ११० टन कचऱ्याचा वापर बायोगॅस संयत्रांमध्ये झाल्यानंतर उरलेल्या ३२० ओल्या कचऱ्याचे विघटन प्रशासन कसे करणार, असा प्रश्न या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित होत आहे. संयंत्रांची क्षमता कमी आणि ओला कचरा मात्र जास्त असणार आहे, हे गणित प्रशासन कसे जुळविणार असा नवीन पेच या विश्लेषणामुळे निर्माण झाला आहे.

पालिकेची कचराभूमी अद्याप तयार नाही. काही नियोजित कचराभूमींना स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे. त्यामुळे महापालिकेचे कचराविषयक प्रकल्प रखडले आहेत. काही प्रकल्पांना ठेकेदारांकडून प्रतिसाद दिला जात नाही. क्षेपणभूमीवर मोठय़ा प्रमाणात आगी लागतात. कचऱ्यातील रासायिक घटकांमुळे असे प्रकार घडतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

महापालिका हद्दीत दररोज ६५० मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. २००९ ते २०१५ या कालावधीत पालिकेच्या सात प्रभागांमधून किती कचरा दररोज जमा करण्यात आला, याविषयीची कोणतीही माहिती पालिकेच्या घनकचरा विभागाकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका हद्दीत दररोज ४२९ टन ओला व २२१ टन सुका कचरा जमा होतो. सर्वाधिक कचरा डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभागात तयार होतो. या प्रभागात ९६ मेट्रिक टन कचरा दररोज तयार होतो. त्यानंतर ‘ब’ प्रभागातून ७७ मेट्रिक टन कचरा दररोज उचलला जातो. ५० टन ते ७० टन या प्रमाणात दररोज प्रत्येक प्रभागात कचरा तयार होतो. टाकाऊ भाजीपाला, हाडे, मांस, फळांमधील टाकाऊ घटक, रद्दी पेपर, लाकडी साहित्य, ताग, काचा, धागा, प्लॅस्टिक, धातू अशा प्रकारचा सुमारे १०० टन कचरा दररोज कचऱ्याच्या माध्यमातून पालिका हद्दीत जमा केला जातो.