महापालिकेकडून ‘व’चा ‘ते’; चुकीच्या पत्रकामुळे रहिवाशांत संताप

जैन पर्युषण काळात शहरातील चिकन, मटण आणि मासळी बाजार सात दिवस नाही तर केवळ दोनच दिवस बंद राहणार आहे. महापालिकेने काढलेल्या पत्रकात ६ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या काळात चिकन-मटणाची दुकाने बंद राहतील, असे नमूद केल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. मात्र या पत्रकात चुकून ‘व’चा ‘ते’ झाल्याची सारवासारव महापालिकेने केली आहे. ६ सप्टेंबर व १३ सप्टेंबर या दोनच दिवशी ही दुकाने बंद असतील, असे पालिकेने स्पष्ट केले.

सध्या जैन धर्मीयांचा पवित्र पर्युषण काळ सुरू आहे. या काळात जैन धर्मीय उपवास करतात. या काळात कुठल्याही प्रकारची हिंसा होऊ  नये, अशी अपेक्षा असते. त्यामुळे राज्य शासन दरवर्षी पर्युषण काळात दोन दिवस शहरातील चिकन, मटणाची दुकाने आणि मासळी बाजार तसेच कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देते. या वर्षीही राज्य शासनाने तसे परिपत्रक काढले होते. मात्र वसई-विरार पालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ने काढलेल्या पत्रकात ६ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या काळात चिकन, मटणाची दुकाने बंद ठेवावीत, असे नमूद करण्यात आले होते. या पत्रामुळे वसईत तीव्र संताप पसरला होता. समाजमाध्यमांवरही या पत्रामुळे महापालिकेवर टीका होऊ  लागली.

प्रभाग समिती ‘ब’चे प्रभारी साहाय्यक आयुक्त वसंत चव्हाण यांनी या पत्रात ‘व’च्या ऐवजी ‘ते’ असे टाइप झाल्याने गैरसमज निर्माण झाल्याचे सांगितले. त्यामुळे नव्याने पत्र तयार करून ६ सप्टेंबर व १३ सप्टेंबर हे दोन दिवस दुकाने बंद राहतील, अशी दुरुस्ती करण्यात आली. केवळ दोन दिवसच ही दुकाने बंद राहतीत, असे आरोग्य विभागाचे प्रभारी साहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांनीही स्पष्ट केले.