यंत्रबिघाडामुळे समुद्रात अडकलेल्या बोटीला तटरक्षक दलाचे मदतकार्य

वसई : वादळामुळे खवळलेल्या समुद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने उत्तन येथील एक बोट जीवघेण्या स्थितीत अडकली. या बोटीवरील सर्व मच्छीमारांची सुटका करण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. या मच्छीमारांना घेऊन तटरक्षक दलाची बोट मुंबईच्या किनाऱ्याच्या दिशेने निघाली असून लवकरच हे मच्छीमार मुंबईच्या किनाऱ्यावर उतरतील. मात्र, मच्छीमार नौका समुद्रात नांगरलेल्या स्थितीत ठेवण्यात आली आहे.

उत्तन कोळीवाडय़ाच्या पाली परिसरातील नेस्टर मुनीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मालकीची ‘देवसंदेष्टा’ ही बोट १ ऑगस्टला मासेमारीकरिता समुद्रात गेली होती. दुसऱ्या दिवशी खोल समुद्रात मासेमारीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बोटीच्या यंत्रामध्ये बिघाड निर्माण झाला आणि यंत्र बंद पडले. तेव्हापासून बोटीवरील १५ मच्छीमार समुद्रात अडकले होते. मंगळवारी हवामानात अचानक बदल होऊन वादळ सुरू झाले. यामुळे अन्य सर्व बोटी किनाऱ्याच्या दिशेने निघाल्या. समुद्र इतका खवळला होता की देवसंदेष्टा बोटीला टोईंग करून किनाऱ्यावर आणणे शक्य नव्हते.

समुद्रातून परत आलेल्या मच्छीमारांनी ही बाब उत्तन येथील युवा मच्छीमार नेते माल्कम कासूघर यांना सांगितली. कासुघर यांनी त्वरित तटरक्षक दलाच्या वरळी येथील अधिकाऱ्यांशी संपर्क करून मदतीचे आवाहन केले. तटरक्षक दल आणि मरीन रेस्क्यू को-ऑर्डिनेशन टीम यांच्या संयुक्त बचाव पथकातील जवानांनी समुद्रात जाऊन बोटीवरील मच्छीमारांची सुखरूप सुटका केली.

वादळामुळे समुद्रातील हवामान अत्यंत खराब आणि भयावह बनले होते. अशा परिस्थितीत मच्छीमारांना हेलिकॉप्टरने आणणे शक्य नव्हते. शिवाय समुद्राच्या लाटांची उंचीही प्रचंड होती. पाण्याच्या प्रवाहाचा वेगही भयानक होता. अशा स्थितीत बोटीला टोईंग करून आणणे शक्य नसल्यामुळे बचाव पथकाने बोटीतील सर्व मच्छीमारांना आपल्या बोटीत घेतले. गुरुवारी संध्याकाळी उशिरा मच्छीमारांना घेऊन तटरक्षक दलाचे जवान मुंबईच्या किनाऱ्यावर येतील. त्यानंतर या मच्छीमारांना यलोगेट पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल. तेथून ओळख पटवून या मच्छीमारांना त्यांच्या बंदरात नेले जाईल, अशी माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आली.

देवसंदेष्टा बोट वादळात बंद पडल्याची माहिती मिळताच आम्ही तटरक्षक दलाशी संपर्क केला. दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण सहकार्य केले.

– माल्कम कासूघर, मच्छीमार नेता, उत्तन