कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत नव्याने उभारण्यात आलेली सर्व बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश आयुक्त ई. रवींद्रन यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले आहेत. कल्याणमधील चार, डोंबिवलीतील चार प्रभागांनी एकत्रितपणे ही बेकायदा बांधकामे तोडण्याची कारवाई करायची आहे.

पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत शहराच्या विविध भागात बेसुमार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. गेल्या पाच वर्षांत पालिका हद्दीत सुमारे २५ ते ३० हजार नवीन चाळी, गाळे, इमारती, बंगल्यांची बांधकामे उभी राहिली आहेत. बेकायदा बांधकामे तोडतानाच प्रभागातील धोकादायक, अतिधोकादायक इमारती तोडण्याचे काम प्रभाग अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. पालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त, सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांची बैठक घेऊन प्रभागातील सर्व बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत.
कल्याणमधील अ, ब, क, ड या चार प्रभागांतील अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी एकत्रितपणे सर्व ताफा घेऊन एकेका प्रभागात जाऊन बांधकामांवर कारवाई करायची आहे. अशाच प्रकारची कारवा़ई डोंबिवलीतील फ, ह, ग, ई या चार प्रभागांमधील अधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. प्रभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने प्रभागांमध्ये बेकायदा चाळी, गाळे, इमारती, बंगले उभे राहिले आहेत. त्यामुळे हे अधिकारी किती धाडसाने ही बेकायदा बांधकामे पाडतात याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे.